
चेन्नई : महाराष्ट्राच्या धावपटूंनी दोन सुवर्ण व दोन रौप्य पदक जिंकून धडाकेबाज प्रारंभ केला. अलिझा मुल्ला हिने शंभर मीटर्स अडथळा शर्यतीत सुवर्णपदक जिंकले तर भाग्यश्री महल्ले हिने पदार्पणातच तीन हजार मीटर्स धावण्याची शर्यत जिंकून शानदार कामगिरी केली. आर्य कंदकुमार व संदीप गोंड यांनी अनुक्रमे लांब उडी व ११० मीटर्स अडथळा शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली.
चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे आजपासून सुरू झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेतील शंभर मीटर्स अडथळा शर्यतीत अलिझा हिने सुरुवातीपासूनच अडथळे पार करतानाचे अप्रतिम कौशल्य दाखविले आणि सातत्यपूर्ण वेग ठेवला होता. तिने ही शर्यत चौदा सेकंदात पार केली. ती मुंबई येथील विनायक वझे महाविद्यालयात शिकत आहे.










