मुंबई – बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राचीन कान्हेरी लेण्यांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी केली. शुक्रवारी कान्हेरी लेण्यांना भेट दिल्यानंतर त्यांनी उद्यान आणि पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना विविध सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
गोयल यांनी लेण्यांच्या जतनासाठी माहिती केंद्र, ध्यानधारणा केंद्र, तसेच प्रदर्शन सभागृह उभारण्याचे निर्देश दिले. तसेच कान्हेरी लेण्यांची प्रतिकृती उद्यानात साकारण्याची कल्पनाही त्यांनी मांडली, जेणेकरून उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना या ऐतिहासिक वारशाची माहिती मिळेल. राजस्थान अथवा गुजरातमध्ये यासाठी योग्य पाषाण उपलब्ध होतो का, याचा शोध घ्यावा, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. त्यांनीही कान्हेरी लेण्यांच्या पर्यटन विकासावर भर देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
वनराणी मिनी ट्रेनचे पुनरुज्जीवन
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटकांचे आकर्षण असलेली ‘वनराणी’ मिनी ट्रेन सध्या डागडुजीसाठी बंद आहे. मात्र, पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी येत्या १६ जुलै रोजी इलेक्ट्रिक मिनी ट्रेनचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली.
पर्यटकांसाठी सुधारणा आणि सुविधा
- लेण्यांच्या अभ्यासक आणि ध्यानधारणा करणाऱ्या भाविकांसाठी माहिती केंद्र उभारले जाईल.
- पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि उत्तम खानपान सेवा उपलब्ध करून दिली जाईल.
- पर्यटकांसाठी आकर्षक आणि माहितीपूर्ण प्रदर्शने भरवली जातील.
या सुधारणा केल्यास कान्हेरी लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल आणि हा ऐतिहासिक ठेवा भविष्यातील पिढ्यांसाठी अधिक चांगल्या प्रकारे जतन केला जाईल.