
फलटण – भारतातील सेंद्रिय शेती, वनस्पतीजन्य कीटकनाशक निर्मिती आणि निर्यातक्षम केमिकल-रेसिड्यू फ्री शेतमाल उत्पादनात अग्रगण्य ठरलेल्या के. बी. बायो ऑरगॅनिक्स व के. बी. एक्सपोर्ट्स या के. बी. उद्योग समूहाच्या फलटण येथील युनिट्सना माजी केंद्रीय कृषीमंत्री मा. शरदचंद्रजी पवार यांनी त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभाताई पवार यांच्यासह दिनांक १९ मे २०२५ रोजी सदिच्छा भेट दिली.
शेती क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनातून नवसंजीवनी देणाऱ्या या संस्थेच्या प्रयोगशाळा, संशोधन प्रक्रिया आणि वनस्पतीजन्य आधारित जैविक कीटकनाशक निर्मितीचा आढावा घेताना पवार यांनी कौतुकाची थाप दिली. यावेळी कंपनीचे संचालक सचिन यादव व त्यांच्या पत्नी सुजाता यादव यांनी त्यांचे स्वागत केले.
शेतकरी बांधवांना शास्त्रशुद्ध मार्गदर्शन देऊन सेंद्रिय व निर्यातक्षम उत्पादनाकडे वळवणाऱ्या या संस्थेचे कार्य पाहताना पवार म्हणाले, “कृषी क्षेत्रात एका नावीन्यपूर्ण आणि वनस्पतींच्या अल्कोलाईड्सपासून रसायनमुक्त कीटकनाशकांच्या निर्मितीमध्ये के. बी. उद्योग समूह अत्यंत मोलाची भूमिका बजावत आहे. ही दिशा शेतकरी आणि पर्यावरण दोघांसाठीही लाभदायक ठरेल.”
हरित क्रांतीनंतर अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली खरी, मात्र रासायनिक वापरामुळे पर्यावरणीय हानी आणि निर्यातीस अडथळा निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर के. बी. उद्योग समूह रसायनमुक्त शेतीसाठी यशस्वी कार्यरत असून, त्यांचं हे कार्य राज्य व देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
यावेळी जैविक शेतीच्या जागतिक बाजारातील वाढता प्रभाव, निर्यातक्षम उत्पादनांची व्याप्ती आणि भारतीय शेतकऱ्यांसाठी सामाजिक बांधिलकी यावर सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
ही भेट केवळ के. बी. उद्योग समूहासाठीच नव्हे तर महाराष्ट्र व देशाच्या कृषी क्षेत्रासाठी सेंद्रिय शेतीच्या नवयुगाची सुरुवात ठरेल, असे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.








