IRAN-AMERICA | अमेरिका इराणचे ‘प्रॉक्सी वॉर’ | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16
IRAN-AMERICA  | अमेरिका इराणचे ‘प्रॉक्सी वॉर’ | Navarashtra (नवराष्ट्र)


अमेरिका इराणचे ‘प्रॉक्सी वॉर’

इस्रायल हमास यांच्यात गाझापट्टीत सुरू झालेल्या युद्धाचे पडसाद जगाच्या इतर भागात उमटू लागले आहेत. तांबडा समुद्र, येमेन, सीरिया, इराक, इराण आणि आता पाकिस्तान येथे त्याच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत. अमेरिका-इराण यांच्यात गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या शीतयुद्धाचा हा परिणाम. या दोन देशांमधील ‘प्रॉक्सी वॉर’ सध्या कशाप्रकारे लढलं जातय त्याविषयी…

७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने इस्रायलमध्ये घुसून मोठा दहशतवादी हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. याशिवाय इस्रायलच्या दोनशेहून अधिक नागरिकांना पळवून नेण्यात आलं. सहाजिकच लगोलग इस्रायलने हमासच्या कार्यक्षेत्रावर म्हणजे गाझापट्टीवर जबरदस्त हल्ला केला तो हमासची संपूर्ण यंत्रणा मोडून काढण्याच्या इराद्याने. अमेरिका आणि युरोपियन देश इस्रायलच्या बाजूने उभे राहिले तर कुवेत, इराण यासारखे काही देश सोडता हमासच्या बाजूने उघड उघड पाठिंबा देण्याचे त्याच्या नेहमीच्या पाठीराख्यांनी टाळले. सौदी अरेबिया, जॉर्डन, युएई इजिप्त यासारख्या देशांनी आजवर इस्रायल विरुद्ध नेहमीच पॅलेस्टाईन लोकांना साथ दिली आहे; परंतु गेल्या काही वर्षात बदललेली भूराजकीय परिस्थिती आणि आर्थिक हितसंबंध यामुळे हे देश पूर्वीच्या आक्रमकतेने इस्रायल विरोधात उभे असलेले दिसत नाहीत. याउलट इराणने मात्र हमासला आधी छुपा आणि आता उघडपणे पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे. इस्रायल हमास यांच्यात नव्याने सुरू झालेला संघर्ष हा खरंतर पूर्वनियोजित आणि विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी मुद्दामहून उकरून काढलेला असल्याचं चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळापासून सुरु असलेल्या शीतयुध्दामुळे पश्चिम आशियाई प्रदेश सातत्याने युद्धाच्या छायेत राहिला आहे.

१९७९ मध्ये इराणमध्ये सत्ता बदल झाला आणि देशाची सत्ता शहा रझा पेहेलवी यांच्याकडून खोमेनी या इस्लामिक धर्मगुरूच्या हाती गेली. इस्लामिक कट्टरतावाद आणि अमेरिका विरोध ही खोमेनींच्या कारकिर्दीची ठळक वैशिष्ट्ये. इराण हा प्रामुख्याने मुसलमानांमधील शियापंथीय लोकांचा देश. आजूबाजूच्या इराक, सीरिया, येमेन, पाकिस्तान, भारत इथे शियापंथीय लोकांचे वास्तव्य पण एकुणातच शियापंथीय मुस्लिमांची संख्या सुन्नीपंथीय मुस्लिमांच्या तुलनेत फारच कमी. फार पूर्वीपासून शिया आणि सुन्नी पंथांमध्ये तीव्र संघर्ष होत आला आहे. त्यामुळे शिया इराण विरुद्ध अमेरिकेने आधी सद्दाम हुसेनच्या सुन्नी इराकला हाताशी धरलेलं होतं. सद्दाम हुसेन अमेरिकेला नकोसा झाल्यावर इराण विरोधाची प्रमुख धुरा सौदी अरेबियाकडे आली. सतत युद्धाच्या छायेत राहणाऱ्या इराणने आपल्या विरोधी गटांना हैराण करण्यासाठी ठिकठिकाणच्या शिया मुस्लिमांना पैसा आणि शस्त्रांच्या रूपाने भरपूर मदत करायला सुरुवात केली. याचा परिणाम म्हणून लेबेनॉन येथे हिजबुल्ला, येमेन येथे हौथी हे दहशतवादी गट उभे राहिले आणि प्रबळ झाले. पॅलेस्टिनी लोकांची हमास ही संघटना इराणच्या मदतीने शक्तिशाली बनली. गंमत म्हणजे हमासमध्ये मोठ्या प्रमाणात सुन्नी मुस्लिम आहेत; पण इस्रायल हा दोघांचा सामायिक शत्रू या नात्याने या दोघांमध्ये सहकार्याचे वातावरण तयार झाले.






Source link