फलटणच्या न्यायइतिहासात सुवर्णक्षण : वरिष्ठ स्तर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे भव्य उद्घाटन

0
6
फलटणच्या न्यायइतिहासात सुवर्णक्षण : वरिष्ठ स्तर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे भव्य उद्घाटन


फलटण : फलटणच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी असा ऐतिहासिक क्षण आज अनुभवायला मिळाला. वरिष्ठ स्तर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या उद्घाटन सोहळ्यामुळे फलटणच्या न्यायलढ्याला नवे बळ प्राप्त झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या उपस्थितीत झालेल्या या दिमाखदार कार्यक्रमाने फलटणच्या न्यायप्रवासात नवे पर्व सुरू झाले.
कार्यक्रमास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम, नगरसेवक संदीप चोरमले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे संचालक कोंडे देशमुख व भोसले यांनी न्यायालय मंजुरी प्रक्रियेचा सविस्तर आढावा मांडला.
साताऱ्याच्या फेऱ्यांना पूर्णविराम
फलटण वकील संघाचे अध्यक्ष एन. एम. जाधव यांनी प्रास्ताविकात गेल्या अनेक वर्षांतील संघर्षाची भावनिक कहाणी सांगितली.
“फलटण ते सातारा 70 ते 80 किलोमीटरचा प्रवास करताना वकील आणि पक्षकारांना अपघात, वेळेचा अपव्यय, आर्थिक खर्च आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. आता हे न्यायालय सुरू झाल्याने फलटणकरांचा मोठा भार हलका झाला आहे,” असे त्यांनी नमूद केले.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हे स्वप्न साकार झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व न्यायालये एकाच प्रशस्त इमारतीत असावीत, तसेच धर्मादाय कार्यालय व सहकार न्यायालय फलटणमध्ये सुरू व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दोन दिवसांत 2045 प्रकरणांचे वर्गीकरण
जिल्हा प्रमुख न्यायाधीश वाघमारे यांनी माहिती दिली की, न्यायालयाला मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत 2045 प्रकरणे साताऱ्यावरून फलटण येथे वर्ग करण्यात आली. ही मोठी प्रशासकीय कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यायालयात ई-सुविधा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध असून तत्काळ कामकाज सुरू होणार आहे. “आता फलटणकरांना न्यायासाठी इतरत्र भटकंती करावी लागणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“कोर्ट सॅल्युटसाठी नाही, न्यायासाठी आहे” — न्यायमूर्ती संजय देशमुख
मुंबई उच्च न्यायालयचे न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत सांगितले की, “न्याय देण्यास होणारा उशीर हा व्यवस्थेवरील काळा डाग आहे. तो पुसून काढणे आपले कर्तव्य आहे. कोर्ट हे साहेबांना सॅल्युट करण्यासाठी नसते; ते पक्षकारांसाठी असते.”
ग्रामीण भागातील शेतकरी हा अन्नदाता असून त्याला वेळेत न्याय देणे ही पवित्र जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. फलटणच्या उद्घाटनासाठी उच्च न्यायालयाचे पाच न्यायमूर्ती उपस्थित राहणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
“आमची माती, आमची माणसं” — न्यायमूर्ती ए. एन. पानसरे
न्यायमूर्ती ए. एन. पानसरे यांनी फलटणशी असलेले आत्मीय नाते व्यक्त करत आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला. “सरकारी वकील आणि न्यायाधीशांनी पक्षकार व साक्षीदारांना सुसंवादातून विश्वास द्यावा. प्रकरणे जलदगतीने निकाली काढणे हीच खरी सेवा आहे,” असे त्यांनी सांगितले.
“उद्घाटन केलेले कोर्ट बंद होऊ देऊ नका” — न्यायमूर्ती नितीन बोरकर
न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी सांगितले की, जिल्हा न्यायालय दूर असल्यास पक्षकार व साक्षीदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. “आज फलटणमध्ये कोर्टाची साखळी पूर्ण झाली आहे. मात्र हे उद्घाटन केलेले कोर्ट भविष्यात कधीही बंद होऊ नये,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रलंबित 30 ते 40 वर्षांची प्रकरणे जलद निकाली काढण्यासाठी न्यायाधीशांसह वकिलांनीही नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध
फलटणचे पहिले दिवाणी न्यायाधीश एस. पी. सय्यद यांनी सर्व न्यायमूर्तींचे आभार मानत, “जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असून न्यायदान अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील राहू,” अशी ग्वाही दिली.
फलटणमध्ये वरिष्ठ स्तर जिल्हा न्यायालयाच्या स्थापनेने अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. हा दिवस फलटणच्या स्वाभिमानाचा आणि न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणाचा ठरला आहे. न्यायाचा दरवाजा आता फलटणमध्येच उघडल्याने सर्व स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे.