Ganpati Special Bus For Konkan: लालपरीची गणेश तयारी

0
7
Ganpati Special Bus For Konkan: लालपरीची गणेश तयारी



Ganpati Special Bus For Kokan updates पनवेल – गणेशोत्सवासाठी कोकणाकडे होणाऱ्या यात्रेकरूंच्या प्रचंड गर्दीचा अंदाज घेत राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) यंदा आगाऊ नियोजन केले आहे. कोकणातील गणेशभक्त मुंबई आणि उपनगरांतून मोठ्या संख्येने निघणार असल्याने रविवारी (ता. २४ ऑगस्ट) होणाऱ्या गर्दीचा भार सांभाळण्यासाठी लातूर जिल्ह्यातून तब्बल १९५ बसगाड्या मुंबईकडे रवाना करण्यात आल्या.

शनिवारी दुपारपासून या गाड्यांचे मुंबईकडे आगमन सुरू झाले. मात्र, अचानक एवढ्या बसगाड्या शहरात दाखल झाल्यास होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य परिवहनने एक वेगळाच पर्याय निवडला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाशेजारील उलवे–करंजाडे रस्त्यावर या लालपऱ्यांना थांबविण्याचे नियोजन करण्यात आले. शनिवारी सायंकाळपर्यंत सुमारे १२० बसगाड्या येथे दाखल झाल्या होत्या. त्यामुळे विमानतळ परिसरात लालपरींची रांग पाहून प्रवाशांमध्ये ‘गणेशोत्सवाची तयारी एसटीनेही सुरू केली’ अशी चर्चा रंगली.या गाड्यांचे नियंत्रण पनवेल आगार व्यवस्थापक ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हाती सोपविण्यात आले असून विद्याविहार आगाराचे अधिकारीही या सर्व नियोजनावर स्वता लक्ष्य ठेऊन होते.

बसचालक आणि कर्मचाऱ्यांच्या निवास-जेवणाची व्यवस्था शनिवारी रात्री पनवेल आगारात करण्यात आली.प्रवाशांनी ग्रुप बुकींग केलेल्या गाड्या रविवारी सकाळपासून मुंबईतील विविध उपनगरांतील निश्चित ठिकाणी सोडण्यात येतील. तसेच मुंबई सेंट्रल आगारासह इतर आगारांमध्ये नियोजनानूसार या गाड्या सकाळी घेऊन जाण्यासाठी चालकांची नेमणूक करण्यात आली आहे.  त्यामुळे मुंबई–कोकण दरम्यानचा प्रवास सुरळीत पार पाडण्याचा प्रयत्न एसटीकडून होत आहे.मुंबईला खेटून असणा-या नवी मुंबईच्या आधारावर मुंबईची कोंडी टाळण्यासाठी प्रथमच या पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. लालपरींच्या ताफ्यामुळे कोकणप्रेमी भक्तांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.



Source link