फलटण (२६ जून): “आपले युवक विविध क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवत आहेत. हीच शाहू-आंबेडकरी क्रांती आहे,” असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्ध सिद्धार्थ यांनी केले. ते राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित यशस्वी युवकांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते.
सिद्धार्थ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “समता स्थापन्यासाठी शाहू महाराजांनी संधी दिली. ही संधीची समानता बाबासाहेबांनी संविधानात समाविष्ट केली. यामुळेच आपले युवक आज विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक यश संपादन करत आहेत. हीच खरी शाहू-आंबेडकरी क्रांती आहे.” शिक्षण, स्पर्धा परीक्षा, उद्योग व्यवसाय यातूनच आंबेडकरी आर्थिक क्रांती शक्य आहे. संविधानाने दिलेल्या संधीच्या स्वातंत्र्याचा आपण पूर्ण ताकतीने वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन सिद्धार्थ अहिवळे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळ मागील तीन दशकांपासून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कार्यरत आहे. प्रबुद्ध विद्याभवनच्या माध्यमातून मंडळ मोफत प्राथमिक शिक्षण देत आहे. याशिवाय, मंडळ १०वी, १२वी, पदवीधर, आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा नियमितपणे गौरव करत आले आहे. यावर्षी राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त अशाच विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या मान्यवरांचा गौरव सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात अनेक यशस्वी युवकांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते या युवकांना सन्मानित करण्यात आले:
- अमेरिकेतून वैमानिक प्रशिक्षण घेतलेल्या संकेत अंजलीताई सुहास अहिवळे यांचा सत्कार माजी नगरसेवक मधुकर काकडे यांच्या हस्ते झाला.
- आयआयटी वाराणसीचा पदवीधर पराग भीमराव लोंढे यांचा सत्कार गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.
- खासगी बँक संस्थापक दयानंद पडकर यांचा सत्कार विजय येवले यांच्या हस्ते झाला.
- प्राणी वैद्यकीयशास्त्रातून पदव्युत्तर पदवी घेतलेल्या डॉ. अंकिता रमेश भोसले यांचा सत्कार संघमित्रा अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आला.
- उद्योगविश्वात कार्यरत संघराज दिपाली बाळू अहिवळे यांचा सत्कार जे.एस. काकडे यांच्या हस्ते झाला.
- पेट्रोलपंप व्यावसायिक दादासो गायकवाड यांचा सत्कार सचिन अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आला.
- महावीर विठ्ठल मोहिते यांचा सत्कार आर.डी. काळे साहेब यांच्या हस्ते झाला.
- लेबर सप्लाय एजन्सीच्या माध्यमातून कार्यरत वैशालीताई संदीप कांबळे यांचा सत्कार अंजलीताई अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आला.
- राज्यसेवेत निवड झालेल्या शंकेश्वर वंदना हनुमंत अहिवळे यांचा सत्कार नानासो मोहिते यांच्या हस्ते झाला.
- इस्रोमध्ये निवड झालेल्या सुमेध हिरामण आढाव यांचा सत्कार प्रा. शिवाजी सावंत सर यांच्या हस्ते संपन्न झाला.
या सत्कार सोहळ्यात सर्व सत्कारार्थींनी आपल्या यशामागील संघर्षाची गाथा उपस्थितांसमोर मांडली, ज्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळाली.