कर्तव्य बजावताना वीरगती; फलटणचा सुपुत्र देशासाठी शहीद

0
86
कर्तव्य बजावताना वीरगती; फलटणचा सुपुत्र देशासाठी शहीद


साहस Times : देशसेवा आणि जागतिक शांततेसाठी प्राणांची आहुती देणारी हृदयद्रावक घटना फलटण तालुक्यात घडली आहे. फलटण तालुक्यातील बरड येथील ११५ इंजिनिअर रेजिमेंटचे जवान नायक विकास विठ्ठलराव गावडे हे सुदान येथे संयुक्त राष्ट्रांच्या (UN) शांती मोहिमेवर कार्यरत असताना कर्तव्य बजावत असतानाच वीरमरण पावले. त्यांच्या शहादतीमुळे बरड गावासह संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
नायक विकास गावडे हे भारतीय लष्करात निष्ठेने सेवा बजावत होते. आफ्रिकेतील सुदान देशात संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेत त्यांची नियुक्ती होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. दुष्काळी भागातून येऊन देशसेवेचा आदर्श घालून देणाऱ्या या जवानाच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पार्थिव उद्या गावी येणार
प्राप्त माहितीनुसार, शहीद नायक विकास गावडे यांचे पार्थिव उद्या (रविवारी) सकाळी त्यांच्या मूळ गावी बरड (ता. फलटण) येथे पोहोचणार आहे. यासाठी लष्करी व प्रशासकीय पातळीवर आवश्यक तयारी सुरू आहे.
लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
भारत मातेच्या या वीर सुपुत्रावर बरड येथे शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी लष्कराचे अधिकारी, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नायक विकास गावडे यांच्या शहादतीने गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे.
शहीद जवान अमर रहे! 