
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल योगेश सूर्यवंशी (वय, १८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल हा आज दुपारी आपल्या दुचाकीने दत्त मंदिर चौकातून घरी जात असताना भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यानंतर राहुल खाली पडल्याने तो ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडला गेला. या घटनेत राहुलचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी पंचवटी परिसरात ट्रक अडवून चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राहुलच्या वडिलांचे विश्वकर्मा गॅरेज नावाचे शहरात प्रसिद्ध दुकान आहे. धुळ्यातील या अपघातामध्ये राहुलचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.





