फलटण ( साहस Times) :कामाच्या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडत असलेल्या पेट्रोल पंप कामगाराला केवळ सूचना दिल्यामुळे एका चालकाने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना फलटण शहरात उघडकीस आली आहे. ही घटना फलटण येथील एसटी स्टँड जवळील पेट्रोल पंपावर घडली असून, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित चालक स्वतःच्या वाहनात डिझेल भरत असताना पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने त्यास विनम्रपणे रोखण्याचा प्रयत्न केला. कारण मालकाच्या सूचनेनुसार कामगारांशिवाय इंधन भरण्यास मनाई होती. मात्र, चालकाने या सूचनेची थट्टा करत, कामगारास शिवीगाळ केली व त्याला कानाखाली आणि छातीवर अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत कामगाराच्या कानातून रक्तस्राव झाला.
या घटनेनंतर कामगारांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दिला असून, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (SC/ST Atrocities Act) कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच हा तपास उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याकडे (SDPO) सोपवावा, अशी विनंतीही अर्जात नमूद करण्यात आली आहे.
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षेची आणि प्रतिष्ठेची गरज असल्याचे स्पष्ट करत कामगारांनी प्रशासनाकडे तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.