
पिंपरी चिंचवड : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उमेदवारी जाहीरनामे, प्रवेश-माघार आणि अंतर्गत समीकरणांमुळे मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगताना दिसत आहे. २ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर वातावरण काहीसे शांत झाले असले, तरी त्याची धग अद्यापही राजकीय वर्तुळात जाणवत आहे.
याच बदलत्या राजकीय समीकरणांचा प्रभाव पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे. या प्रभागात सामाजिक आणि राजकीय घडामोडींमुळे निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सामाजिक कार्यकर्ता म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात परिचित असलेले चेतन बेंद्रे हे सुरुवातीला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यांना उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा देखील होती. मात्र अधिकृत उमेदवारी जाहीर होताच त्यात चेतन बेंद्रे यांचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारणाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी चेतन बेंद्रे यांनी केलेले कार्य लक्षवेधी राहिले आहे. त्यामुळेच त्यांना उमेदवारी का नाकारण्यात आली, याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, एका सुशिक्षित आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्त्याला प्रत्यक्ष राजकारणात आणण्याची संधी शिवसेना पक्षाने साधली. शिवसेनेने प्रभाग क्रमांक १५ मधून चेतन बेंद्रे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर या प्रभागातील निवडणूक चित्राला वेगळीच कलाटणी मिळाल्याचे दिसून येत आहे.
या साऱ्या राजकीय घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक १५ मधील लढत अधिकच चुरशीची होणार असल्याचे संकेत आहेत. चेतन बेंद्रे यांच्या उमेदवारीमुळे काही प्रमाणात सकारात्मक, तर काही प्रमाणात नकारात्मक प्रतिक्रिया उमटत असल्या, तरी एकंदरीत वातावरण त्यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे.
विशेष म्हणजे, चेतन बेंद्रे यांचा आजपर्यंतचा सामाजिक प्रवास, नागरिकांशी असलेला थेट संपर्क आणि प्रश्न सोडवण्यासाठीची कार्यपद्धती पाहता, प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांमध्ये त्यांच्या नावाला सध्या पसंती मिळताना दिसत आहे. याबाबतची चर्चा नागरिकांमधून उघडपणे होत असल्याचे चित्र आहे.
आता शिवसेनेच्या उमेदवाराच्या रूपात चेतन बेंद्रे प्रभाग क्रमांक १५ मध्ये बाजी मारणार का, आणि जर त्यांनी यश मिळवले तर ते किती प्रभावी ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








