
कोकणातील रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं वैभववाडी तालुक्यातील शांती, अरूणा, कुसुर, शुक, करूळ आणि गोठणा नद्यांना पूर आला आहे. भुईबावडा गावातील घाणेगडवाडी पुलावरून पुराचं पाणी वाहत आहे, त्यामुळं तेथील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. याशिवाय तिरवडे गावातील मुख्य रस्त्यावर पुराचं पाणी शिरल्याने तेथील वाहतुकही बंद करण्यात आल्याची माहिती आहे. कोकणात पुढील दोन ते तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असल्याने नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.





