
अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी गेले अनेक दिवस विविध लोकप्रतिनिधी तसेच नागरी संघटनांनी केली होती. अहमदनगर महानगरपालिकेने नाव बदलण्यासंदर्भात ठराव पारित करून राज्य शासनाला पाठवला होता. या संदर्भात विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून राज्य सरकारने माहिती मागविली होती. या अनुषंगाने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. हा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिकेचे ‘अहिल्यानगर’ असे नामांतरण करण्यात येणार आहे. नामांतरणाची प्रक्रिया राज्याच्या महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येणार आहे.