
माळेगाव | साहस Times प्रतिनिधी | ३ जुलै २०२५ माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नेतृत्वात मोठा बदल होण्याची घडी आली असून, अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः कारभार सांभाळणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. यामुळे कारखान्याच्या वाटचालीस नवी दिशा मिळणार यात शंका नाही. मात्र, आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते उपाध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागते, याकडे!
शनिवार, दि. ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. अध्यक्षपद अजितदादांकडेच राहणार हे जाहीर झाल्यामुळे, कारखान्याच्या कारभारातील दुसरे महत्त्वाचे स्थान म्हणजे उपाध्यक्षपदासाठी कोण निवडले जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गेल्या निवडणुकीत अजित पवारांनी ‘ब’ वर्गातून स्वतः उमेदवारी जाहीर करत एकतर्फी विजय मिळवला होता. त्याचप्रमाणे, २१ पैकी २० जागांवर निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार विजयी ठरले. सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे हे एकमेव विरोधी सदस्य म्हणून निवडून आले.
या ऐतिहासिक विजयानंतर माळेगावमध्ये अजित पवारांनी मेळावा घेतला आणि सभासदांचे आभार मानले. यावेळी त्यांनी पुढील पाच वर्षांत कारखान्याचा कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त करत, काटकसर, धोरणात्मक निर्णय आणि सभासदांना चांगला दर देण्यावर भर असेल, असे ठामपणे सांगितले.
कारखान्याचे अध्यक्षपद स्वतःकडे ठेवणाऱ्या अजितदादांकडून उपाध्यक्षपदासाठी सभासदांच्या अडचणी समजून घेणारा, कारभारात सक्रिय राहणारा आणि निर्णयक्षम संचालक निवडला जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे शनिवारी उपाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.







