
बारामती : तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात प्रेमी युगुलावर कोयत्याने हल्ला करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी Baramati Taluka Police Station यांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली असून लुटलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काय घडले नेमके?
दि. २६ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी विमानतळ रोडलगत असलेल्या एलसी कंपनी लेक परिसरातील मोकळ्या जागेत संतोष रायनवार (बदलेले नाव, वय २६, मूळ रा. नागपूर, सध्या बारामती) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत बसले होते.
त्यावेळी तोंडाला मास्क व रुमाल बांधलेल्या तिघा इसमांनी त्यांच्याजवळ येत लोखंडी सत्तूर आणि कोयत्याचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. विरोध केल्यावर एका आरोपीने फिर्यादीच्या डाव्या पायावर कोयत्याने वार करून जखमी केले.
जबरदस्तीने दागिने व रोख रक्कम लंपास
आरोपींनी फिर्यादीकडून खालील मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला:
सुमारे २१ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (किंमत अंदाजे ३ लाख रुपये)
चांदीची अंगठी (५ हजार रुपये)
चांदीची चैन (१५ हजार रुपये)
आणखी एक चांदीची अंगठी (२ हजार रुपये)
२ हजार रुपये रोख
एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून आरोपींनी “परत इकडे यायचं नाही” अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांची जलद कारवाई
या प्रकरणी बी.एन.एस. कलम ३०९ (६), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत खालील आरोपींना २८ फेब्रुवारी रोजी अटक केली:
प्रसाद गणपत भोसले (वय २४)
धैर्यशील प्रशांत आगवणे (वय १९)
कृष्णा नाना गाडेकर (वय २१, सर्व रा. तांदुळवाडी, ता. बारामती)
न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून कोठडीदरम्यान त्यांच्याकडून संपूर्ण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.



