Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रआत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा माने-मुसळे हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा माने-मुसळे हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

सोलापूर : ज्येष्ठ मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (वय ७०) यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा महेश माने-मुसळे (वय ४५) हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तिची पाच दिवसांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपल्यानंतर ती पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आली होती.

पोलीस तपास अधिकाऱ्यांनी पुढील तपासासाठी पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडीची मागणी केली असता, न्यायदंडाधिकाऱ्यांनी ती मान्य केली. यावेळी आरोपीच्या वकिलांना युक्तिवादाची संधीही लागली नाही.

१८ एप्रिल रोजी रात्री डॉ. वळसंगकर यांनी रेल्वे लाईन-मोदी खाना परिसरातील निवासस्थानी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या पत्रात प्रशासकीय अधिकारी मनीषा माने-मुसळे हिला जबाबदार धरले होते.

या पत्राच्या आधारे पोलिसांनी तिला अटक केली होती. सुरुवातीला तीन दिवस आणि नंतर दोन दिवस अशा एकूण पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती.

या कालावधीत पोलीस तपासात समोर आले की, मनीषा माने-मुसळे हिने ईमेलद्वारे डॉ. वळसंगकर यांना धमकावले होते. आर्थिक व्यवहारांवरून डॉ. वळसंगकर यांनी तिचे अधिकार आणि पगार कमी केला होता, यामुळे ती संतापली होती. त्यामुळे तिने मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती.

रुग्णालयातील २७ अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही तिच्याविरोधात तक्रार केली होती. तसेच वळसंगकर कुटुंबीयांचीही सखोल चौकशी करण्यात आली आहे.

तपास अधिकारी : अजित लकडे
वकील : प्रशांत नवगिरे (आरोपी वतीने)

ही कारवाई संपूर्ण शहरात खळबळजनक ठरली असून पोलीस तपास अधिक गतीने सुरू असल्याची माहिती आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments