आंबेडकर जयंती विशेष: तुझ्यामुळेच मार्ग हा आम्हाला लाभला, तुझ्यामुळेच सूर्यही पुन्हा प्रकाशला; जाणून घेऊ बाबासाहेब आणि शाहू महाराजांमधील ऋणानुबंध…!

0
4
आंबेडकर जयंती विशेष:  तुझ्यामुळेच मार्ग हा आम्हाला लाभला, तुझ्यामुळेच सूर्यही पुन्हा प्रकाशला; जाणून घेऊ बाबासाहेब आणि शाहू महाराजांमधील ऋणानुबंध…!


  • Marathi News
  • Opinion
  • Dr. Babasaheb Ambedkar And Chhatrapati Shahu Maharaj Relation; Ambedkar Jayanti Special | Bhimjayanti

अनुराधा पाटील1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

‘फुले-शाहू-आंबेडकर’ ही त्रयी म्हणजे भारतातील सामाजिक न्याय, समता आणि मानवमुक्तीच्या चळवळीचे तीन महान स्तंभ आहेत. यामधील शाहू आणि आंबेडकर या द्वयींमधील मैत्री स्नेह आणि समतेचा इतिहास अजरामर आहे. माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारलेल्या अस्पृश्य समाजाला हक्क मिळवून देणे, ज्ञानाची कवाडे त्यांच्यासाठी खुली करणे, अस्पृश्यता निवारण करणे ही या दोघांच्या कार्यामध्ये असलेली समानता. आज डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊ बाबासाहेब आणि शाहू महाराज यांच्यातील ऋणानुबंध…

‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ असे आवाहन डॉ. बाबासाहेबांनी केले. त्यामुळे दलित आणि वंचित वर्ग अन्यायाविरुद्ध पेटून उठला. बाबासाहेब महात्मा फुले यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत होते. शाहू महाराज नेहमीच त्यांचे पाठीराखे राहिले. शाहू महाराजांना नेहमी वाटे की, अस्पृश्य समाजाने स्वावलंबी व्हावे. आपल्या जातीचे पुढारी निवडावेत. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रगती करावी. ते नेहमी जातीपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य दिले. अशातच भीमराव आंबेडकर नावाचा तरुण मुलगा परदेशात जाऊन, इतक्या उच्च पदव्या प्राप्त करून आला. ही बातमी समजतात महाराजांना विलक्षण आनंद झाला.

शाहू महाराजांना डॉ. बाबासाहेबांना भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली. आंबेडकरांचा पत्ता मिळताच, हा कोल्हापूर संस्थानाचा राजा कोणत्याही मानापमानाचा विचार न करता, त्यांची भेट घेण्यासाठी मुंबईमधील परळ चाळीमध्ये गेला. शाहू महाराजांनी आंबेडकरांना मिठी मारली आणि म्हणाले, ‘आता माझी काळजी दूर झाली, अस्पृश्यांना पढारी मिळाला.

स्नेहाचे नाते…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्यात कमालीचा स्नेह होता. मैत्री आणि आपुलकी कशी असावी, याचे ते उत्तम उदाहरण होते. जातिव्यवस्थेविरुद्ध लढा देणारा आणि डॉ. आंबेडकरांच्या शिक्षणाला आकार देणारा हा राजा होताच. सोबतच त्यांनी महिला आणि मुलांच्या हक्कांचेही समर्थक केले. त्यांच्या सुधारणांमुळे वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेल्या पुरातन संस्थांमध्ये अनेक बदल झाले. महाराजांच्यातील ही गोष्ट आंबडकारांना खूप आवडली. शाहू महाराजांचेच नाही तर संपूर्ण करवीर संस्थानांचे आंबेडकरांसोबत असणारे ऋणानुबंध वेगळे होते. हे ऋणानुबंध केवळ सामाजिक नव्हे, तर जिव्हाळ्याचे होते.

महाराजांनी रमाबाईंना ‘बहीण’ म्हणून माहेरपणासाठी नेण्याची तयारी दाखविणे किंवा महाराजांचे पुत्र राजाराम महाराज व कन्या आक्कासाहेब यांनी बाबासाहेबांना ‘मामा’ म्हणून संबोधणे. यावरून शाहू महाराज व बाबासाहेब यांच्यामधील नाते कसे होते, ते समजते. यांची भेट खूप कमी वेळा झाली. पण बाबासाहेब इंग्लंडला जरी असले, तरी देखील यांच्यातील जिव्हाळ्याचे पत्रव्यवहार राहिले. शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात पहिल्यांदा मागासवर्गीयांसाठी आरक्षण सुरू केले. याच विचारसरणीचा पुढे डॉ. आंबेडकरांनी भारताच्या संविधानात समावेश केला.

महाराजांकडून आर्थिक मदत…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परदेशातील उच्चशिक्षणासह जनजागृतीच्या कार्यासाठी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी आर्थिक पाठबळ दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या एका भेटीत आपण मूकनायक हे वृत्तपत्र चालवत असल्याचे सांगितले. पण काही आर्थिक अडचणींमुळे मूकनायक हा मूक झालाय याची खंत व्यक्त केली. त्यानंतर हा बंद पडलेले मूकनायक पुन्हा सुरू झाले. त्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी अडीच हजार रुपयांची मदत केली. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिक्षणासाठी लंडनला गेले, तेव्हा त्यांनी शाहू महाराजांना पत्र लिहले. त्यांनी त्या पत्रातून शिक्षणासाठी 200 पौंडची आर्थिक मदत मागितली आणि शाहू महाराजांनी ती त्वरित पाठवली. जातीय लढाईत शिक्षणाच महत्त्व माहित असलेल्या शाहू महाराजांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण खूपच महत्त्वाचे वाटत होते. त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येता कामा नये, यासाठी महाराज नेहमी प्रयत्नशील राहिले. त्यानंतर 26 जानेवारी 1922 ला बाबासाहेबांनी शाहू महाराजांना पुन्हा पत्र पाठवले. मला भारतात येण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे घरी खर्चाची अडचण होणार आहे, तरी महाराजांनी 750 रुपयांची मदत केल्यास मी त्यांचा ऋणी राहीन, असे कळले. या पत्रानंतर लगेचच महाराजांनी 750 रुपयाची मनीऑर्डर पाठवण्याची व्यवस्था केली. बाबासाहेबांनी त्यांच्या शिक्षणात कोणत्या ही प्रकारचा अडथळा येऊ नेऊ ही जबाबदारी शाहू महाराजांनी घेतली. बाबासाहेबांच्या जडणघडणीत महाराजांचे योगदान हे खूप मोलाचे होते.

माणगाव परिषदेची तयारी…

अस्पृश्य समाजात शिकून तयार झालेल्या एवढ्या मोठ्या विद्वानास कोल्हापुरात नेऊन, त्यांच्या हस्ते आपल्या संस्थानातील अस्पृश्यांची सुधारणा व उद्धार करावा असे शाहू महाराजांना वाटले. मात्र, सुरुवातीला आंबेडकरांनी यामध्ये कणभर ही रुची दाखवली नाही. डॉ. आंबेडकर म्हणाले की, ‘आपल्यासाठी कुणी काही करत नाही. सर्वजण सारखे आहेत.’ तेव्हा बहिष्कृत जातीतील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी दत्तोबा पवार यांनी आंबेडकरांना सांगितले की, महाराज त्यातले नाहीत. त्यांनी आपल्या संस्थानात अस्पृश्यांबद्दल कळवळ्याने काम चालू केले आहे.’ त्यानंतर आंबेडकरांनी कोल्हापूर भेटीचे आमंत्रण स्वीकारले. डॉ. आंबेडकर कोल्हापूरस आले, तेव्हा महाराजांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत त्यांचे स्वागत केले. त्यांची आपल्या खास गेस्ट हाऊसमध्ये त्यांची राहण्याची सोय केली. या भेटीत दोघांमध्ये अस्पृश्यांच्या सुधारणांवर चर्चा झाली. त्यांनी एक सभा घेण्याचे ठरवले. या भेटीनंतर डॉ. आंबेडकर हे दोन दिवस कोल्हापुरात राहून मुंबईत परतले. त्यानंतर दत्तोबा पवारांनी पुढाकार घेऊन शाहू महाराज व कोल्हापुरातील अस्पृश्यांचे पुढारी डॉक्टर रमाकांत कांबळे, गंगाराम कांबळे या सर्वांशी चर्चा केली. त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर डॉ.आंबेडकरांशी पत्रव्यवहार करून 21 मार्च 1920 या दिवशी माणगावमध्ये अस्पृश्यांची पहिली सभा घेण्याचे ठरले. तशी पत्रके छापली.

अन् पुढारी गवसला…

जातीव्यवस्थेविरुद्ध लढा देणारा, डॉ. आंबेडकरांच्या शिक्षणाला आकार देणारा राजा. ते महिला आणि मुलांच्या हक्कांचे समर्थक होते. त्यांच्या सुधारणांमुळे वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेल्या पुरातन संस्थांमध्ये अनेक बदल झाले. शाहू महाराजांमधील ही गोष्ट आंबेडकरांना खूप आवडली. शाहू महाराजांचेच नाही तर संपूर्ण करवीर संस्थानांचे आंबेडकरांसोबत असणारे ऋणानुबंध वेगळे होते. अस्पृश्य समाजात शिकून तयार झालेल्या एवढ्या मोठ्या विद्वानास कोल्हापुरात आणावे. त्यांच्या हस्ते आपल्या संस्थानातील अस्पृश्यांची सुधारणा व उद्धार करावे, असे शाहू महाराजांना वाटले. त्यानुसार ही अस्पृश्य परिषद पार पडली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जाणीवपूर्वक काही ठराव प्रत्येक परिषदेत घेत असत. ठराव म्हणजे तत्कालीन समूहाचे लोकमत, असाच त्याचा अर्थ होता आणि सर्वांसमक्ष त्या ठरावाच्या मागण्यांना लोकाश्रय मिळविण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यशस्वी होत असत. त्यामुळे माणगाव परिषदेतही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सल्ल्याने व कुशल मार्गदर्शनाखाली एकूण पंधरा ठराव घेतलेले गेले. या ठरावापैकी पहिले तीन ठराव हे तात्कालीक व औपचारिक स्वरूपाचे होते. ही परिषद ऐतिहासिकदृष्ट्या अंत्यत महत्त्वाची होती. माणगाव परिषदेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. माणगाव परिषदेच्या पहिल्या दिवशी शाहूंनी त्यांच्या रांगड्या भाषेत ‘आता तुम्हाला पुढारी गवसला आहे. दुसऱ्या पुढाऱ्याच्या नादाला लागू नका. आता हाच पुढारी तुमचा उद्धार करणार आहे. सगळ्या भारतातील अस्पृशांचा हा पुढारी होणार आहे यात तीळमात्र शंका नाही.’ असे सांगितले. दलित समाजाला डॉ. आंबेडकर यांच्या रूपाने नेतृत्व मिळाल्याचे राजर्षी शाहूंनी जाहीर केले. माणगाव परिषदेत शाहूमहाराज म्हणाले ‘आंबेडकर हे ‘मूकनायक’ पत्र काढतात व सर्व मागासलेल्या जातीचा परामर्ष घेतात. याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो.’ माणगाव ची परिषद आंबेडकरांच्या उपस्थितीमुळे समृद्ध झाली. अस्पृश्यांना तिच्यामुळे प्रेरणा मिळाली व शाहूंनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर भारताचे फार मोठे नेते बनले.

स्पृश्य-अस्पृश्यांच्या शाळा एकत्र…

दलितांच्या हक्कासाठी माणगाव परिषदेत अनेक ठराव मंजूर केले गेले. यातील पहिले तीन ठराव हे तात्कालिक व औपचारिक स्वरूपाचे होते. ठराव क्रमांक चार बहिष्कृत लोकांच्या मानवी हक्कासाठी होता. सार्वजनिक रस्ते, विहिरी, तलाव, शाळा, धर्मशाळा तसेच लायसन्स खाली असलेल्या करमणुकीच्या जागा, भोजनगृह, वाहने इत्यादी सार्वजनिक सोयींचा उपभोग घेण्याचा त्यांना हक्क आहे. त्याबरोबरच गुणसिद्ध योग्यतेने त्यांना व्यापार करण्याचा व नोकरी मिळण्याचा हक्क आहे. ठराव क्रमांक 5, 6, 7 आणि 8 हे शिक्षणासंबंधी होते. याठिकाणी हे लक्षात घ्यायला हवे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्या काळातील अस्पृश्य वर्गातील एकमेव उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्त्व होते. शिक्षणाचे महत्त्व त्यांना पुरेपूर पटलेले होते म्हणून ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या ब्रीदाची जाहीरपणे वाच्यता करण्यापूर्वीच डॉ. आंबेडकरांनी शिक्षण हीच परिवर्तनाची गुरूकिल्ली आहे, हे माणगावच्या सभेतून स्पष्ट केले. प्राथमिक शिक्षण मुलामुलींना कोणताही भेदभाव न करता मिळावे, बहिष्कृत वर्गाच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून त्याच वर्गातील इन्स्पेक्टर नेमावेत, अस्पृश्यांना शिष्यवृत्ती द्यावी आणि स्पृश्य व अस्पृश्य यांच्या शाळा एकत्र असाव्यात, अशा मागण्या या परिषदेत करण्यात आल्या.

माणगाव परिषदेतला 9 वा ठराव हा महार वतनदारांना होत असलेला त्रासाचा होता. त्यामध्ये महार वतनदारांना पड वगैरे अगदी गलिच्छ कामे करावी लागत. त्यामुळे त्यांच्या वतनदारीवर कमीपणाची छटा उमटली आहे. वतनी जमीन वतनदारांना पिढ्यानपिढा विभागातून जात असल्यामुळे जमिनीचे इतके बारीक तुकडे झालेले आहेत की , दर एक महार वतनदारास पुरेशी पैदास होत नसल्यामुळे त्याची अगदी कंगाल स्थिती होत आहे, तर या परिषदेत यामुळे वतन पद्धतीत फेरफार करणे अगदी जरुरी झाले आहे, असे या परिषदेचे ठाम मत होते. महारकी वतन सर्व महार लोकात विभागून सर्वांनी दारिद्र्य व कंगाल राहण्यापेक्षा ते वतन थोड्या लोकात विभागून त्यांची स्थिती मानास्पद व सुखावह करावे, असा ठराव करण्यात आला. ठराव क्रमांक 10 हा मेलेल्या जनावरांचे मांस कोणत्याही जातीच्या माणसाने खाणे हा गुन्हा आहे, असे कायद्याने मानले जावे हा होता. ठराव क्रमांक 11 तलाठ्यांच्या जाग्यांवर बहिष्कृत वर्गाच्या नेमणुका होत जाव्यात, अशी या परिषदेची मागणी होती. ठराव क्रमांक 12 हा बहिष्कृत वर्गाचा राजकीय किंवा सामाजिक हितसंचय यावर होता. बहिष्कृत संस्थांचे आणि व्यक्तींचे उपाय या बहिष्कृत वर्गात सर्वस्वी मान्य होतात, असे सरकारने समजू नये असे या परिषदेचे आग्रहाचे सांगणे होते. ठराव क्रमांक 13, 14, 15 हे अधिकाऱ्यांनी या परिषदेच्या ठरावाला घेऊन कोणती कामे करावीत यावर होते.

‘लोकमान्य ‘ही पदवी दिली…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यातील पत्रे अभ्यासूंनी जरूर वाचावीत. या पत्रव्यवहारात राजर्षी शाहूंनी डॉ. आंबेडकर यांना ‘लोकमान्य’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता. त्याकाळी लोकमान्य ही पदवी फक्त बाळ गंगाधर टिळक यांना होती. शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीची पारख काळाच्या पुढे जाऊन विचार करणारी होती, याची प्रचिती अस्पृश्य समाजाच्या परिषदेच्या भाषणातून येते. शाहू महाराज बाबासाहेबांच्या प्रतिभेचा गौरव करताना म्हणतात, ‘लोकहो तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला. यासाठी मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो. इतकंच नव्हे, तर एक वेळ अशी येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, अशी माझी मनोदेवता मला सांगत आहे.’ पुढे जाऊन बाबासाहेबांनी संपूर्ण विश्वात ओळख बनवली. दलितांचा स्वतंत्र राजकीय आवाज निर्माण केला. अस्पृश्यता निर्मूलणासाठी लढा दिला. दलित समाजातील तरुणांना शिक्षणासाठी प्रेरित केले. राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी सर्व भारतीयांना समान हक्क मिळवून दिले आणि शाहूनी म्हटल्या प्रमाणे ते त्यांचे पुढारी देखील बनले.



Source link