महापुरुषांच्या विचारांचा जागर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचा अभिनव उपक्रम

0
6
महापुरुषांच्या विचारांचा जागर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचा अभिनव उपक्रम

फलटण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२५ च्या वतीने सामाजिक जागृतीसाठी एक आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. १ एप्रिल २०२५ पासून दररोज एका महापुरुषास अभिवादन करून त्यांच्या विचारांची पुस्तके मोफत वितरित करण्याचा संकल्प या उपक्रमातून राबवला जात आहे. या माध्यमातून महापुरुषांचे विचार विशिष्ट चौकटीत अडकून न राहता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.

दि. १ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर महापुरुषांच्या विचारांचे पुस्तक वितरण करण्यात आले. आज, २ एप्रिल रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन समोर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुढील टप्प्याचे पुस्तक वितरण करण्यात आले. यावेळी शिवप्रतिष्ठान फलटण आणि मोती चौक तालीम शिवजयंती महोत्सव फलटण यांच्या पदाधिकाऱ्यांना महापुरुषांच्या विचारांची पुस्तके देण्यात आली.

यावेळी जयंती महोत्सव समितीचे गणेश अहिवळे, अजय काकडे, गोविंद काकडे, सुरज काकडे, सिद्धार्थ अहिवळे, भूषण बनसोडे, चंद्रकांत मोहिते, मंगेश सावंत, कपिल काकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. हा उपक्रम संपूर्ण एप्रिल महिनाभर चालणार असून, समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत प्रेरणादायी विचार पोहोचवण्याचा संकल्प समितीने केला आहे.