Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रबुकमार्क: अमोल पालेकरांच्या मनस्वी आत्मकथनाचा मौल्यवान ‘ऐवज’

बुकमार्क: अमोल पालेकरांच्या मनस्वी आत्मकथनाचा मौल्यवान ‘ऐवज’

[ad_1]

स्वप्नील जोशी14 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

“चप्पल पहनने वाले आदमीने यहाँ बंगला खरीद लिया?” अशा हिणकस टिप्पण्या कानावर पडूनही, जुहूतील प्रतिष्ठित फिल्मी मांदियाळीत उभ्या राहिलेल्या मराठमोळ्या, मध्यमवर्गीय कलावंताच्या ‘चिरेबंदी’ बंगल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.. पुढे हीच वास्तू देश – विदेशातून आलेल्या कित्येक मान्यवर कलाकारांचं हक्काचं घर बनली.. तिथं नाटक, साहित्य, संगीत, दृश्यकला क्षेत्रातल्या कलाकार आणि कलासक्त लोकांची वर्दळ वाढली… हे वर्णन आहे अमोल पालेकर यांच्या ‘ऐवज – एक स्मृतिगंध’ या पुस्तकातले.

आपल्या या आत्मकथनात्मक पुस्तकात ते पुढे म्हणतात की, एका वेगळ्या पद्धतीने माणसांची खरी रूपं समजायलाही ‘चिरेबंदी’ने मला शिकवलं. माझी भावनिक गुंतवणूक असूनही मी कधी त्याचा सौदा होऊ दिला नाही. अभिनेते, दिग्दर्शक, नाट्यकर्मी आणि लेखक अशा चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या पालेकरांचे हे पुस्तक कला क्षेत्रातील गेल्या आठ दशकांच्या अनेक आठवणी आणि अनुभवांचा ‘ऐवज’ आपल्यासमोर खुला करते. मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारा कलावंत ते संवेदनशील दिग्दर्शक या प्रवासात विविध कलाकृतींचा आस्वाद घेताना, कलेची मूल्ये, त्यांची निर्मिती प्रक्रिया, तत्कालीन सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ यांचा परामर्श कशाप्रकारे घेतला, हे पुस्तक वाचताना उलगडत जाते.

मुंबईच्या बालमोहन शाळेतून बोर्डीच्या शाळेत जाण्याचा प्रसंग असेल किंवा आईचा विरोध असूनही केलेला विवाह, मुलगी शाल्मलीचे शालेय वयातच असलेले ठाम विचार आणि गुरुस्थानी असलेल्या पं. सत्यदेव दुबेंना केलेला विरोध हे ‘महापाप’ असल्याची प्रांजळ कबुली… हे सगळं दिसतं तेवढ सोपं नव्हतं. केवळ विरोधासाठी विरोध नव्हे, तर त्यातही विवेकी असणं ही शिस्त पालेकरांनी उमेदीच्या काळातच लावून घेतली. ‘गोची’ या नाटकाने झालेली अभिनय कारकिर्दीची सुरूवात असो की वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी ऐंशी मिनिटे रंगमंचावर ‘ए. सी. पी. दंडवते’ हे पात्र साकारताना हाउसफुल्ल झालेले ‘कुसूर’ या नाटकाचे प्रयोग असोत; त्यांचा हा सगळा रोचक प्रवास तितक्यात रंजकपणे पुस्तकातून आपल्यासमोर उभा राहतो.

ज्या काळात एकदा चित्रित झालेल्या दृश्याचे पुन्हा अवलोकन करण्याची सोय नव्हती, कॅमेऱ्याच्या लेन्स आणि चित्रीकरणाची निश्चित परिमाणे विकसित झालेली नव्हती, अशा काळात एक मनस्वी तरुण मराठी मन घेऊन आपल्या स्वतंत्र घडणीची एक वैचारिक दिशा ठरवत होता. अशी दिशा निश्चित करुन वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हाने पेलताना कोणता संघर्ष करावा लागला? अचानक घडणारी अपघातांची मालिका, जे. जे. स्कूल ऑफ आर्टसची पदवी घेतल्यावर चित्रकार म्हणून केलेली सुरूवात, बँक ऑफ इंडियातील नोकरी, याच कालावधीत व्यावसायिक रंगभूमीकडे वळताना विचारप्रवर्तक चित्रपटांच्या दुनियेत झालेला प्रवेश आणि नंतरचा तिथला लक्षवेधी वावर.. या सर्वांवर हे पुस्तक प्रकाश टाकते.

‘बॉलीवूड’ म्हटल्या जाणाऱ्या मुख्यधारेमध्ये आपण कधी मिसळलो नाही, असे पालेकर ठामपणे सांगतात. हिंदी चित्रसृष्टीतील स्टार्सचे ज्या पद्धतीने अवाजवी लाड केले जायचे, त्याविषयीही त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. वेळेचा, पैशाचा अपव्यय करणे हा अव्यावसायिकपणा त्यांना खटकत असे. स्वत:च्या मागण्यांवर ठाम राहणे, प्रसंगी प्रतिकार करणे, डाव्या आणि उजव्या विचारांच्या सांस्कृतिक संघर्षात प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आग्रही राहणे असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी विशेष पैलू लक्षवेधी ठरतात. कातडी सोलून सांगतानाही आपल्या कथनाला काही एक मर्यादा आहे, हे भान राखतानाच नामदेव ढसाळ यांच्या.. “प्रत्येक कलावंताला स्वत:चं एक वर्गचित्र असतं..” या वाक्याचा संदर्भ पालेकर देतात.

या कोलाहलात सगळं सांगूनही कलावंताच्या मनात काही रानोमाळ उरतो का? याचा धांडोळा घेण्यासाठी पालेकरांचं हे पुस्तक वाचायला हवं. संध्या गोखले यांनी या पुस्तकाच्या संकल्पनेपासून ते संस्करण आणि सजावटीपर्यंतची साधना उत्तमपणे साध्य केली आहे. नरसिंह बालाजी यांची रेखाटनेही अप्रतिम आहेत. एकूणच, सतत नव्या अनुभवाची भुरळ घालणाऱ्या अमोल पालेकरांनी स्वत:च्या आयुष्याच्या कॅनव्हासवर हे एक सुरेख चित्र रेखाटलं आहे. रसिक वाचकांना त्याची मोहिनी पडली नाही तरच नवल!

– पुस्तकाचे नाव : ऐवज – एक स्मृतिगंध – लेखक : अमोल पालेकर – संस्करण : संध्या गोखले – प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन – पाने : २९६, किंमत : रू. ७५०

(संपर्कः swapnilkashi566@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments