अरविंद जगताप36 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
दामले काका आता सत्तरीत आहेत. सोसायटीत राहणाऱ्या एका मित्राने निनादला फोन केला आणि सांगितलं की, काकाचं लक्षण काही ठीक दिसत नाही. निनाद भडकला… दामले काका एकटेच राहतात. पुण्यातल्या कितीतरी म्हाताऱ्या माणसांसारखे. मुलगा युरोपात आहे. चांगली नोकरी आहे. सून आणि नातू मुलासोबत युरोपात आहेत. इकडे काका थ्री बीएचकेमध्ये एकटे. त्यातली फक्त एक बेडरूम आणि हॉल एवढंच त्यांचं आयुष्य. पण, एकदा बेडरूममध्ये चक्कर आली. खूप आवाज दिला, पण बेडरूममधून आवाज बाहेर जात नाही. त्या बाजूला पार्किंग एरिया आहे. काकांना दरदरून घाम सुटला होता. आपला शेवट जवळ आलेला दिसू लागला होता. पण, अचानक स्वयंपाकवाली बाई आली. तिचा मोबाइल विसरला म्हणून. तिच्याकडं एक चावी ठेवलेली असतेच घराची. ती आली आणि डॉक्टरांना बोलावलं. बीपी लो झाला होता. बाकी काही टेन्शन नव्हतं. पण, त्या दिवसापासून दामले काका हॉलमध्येच झोपतात. तिन्ही बेडरूम बंद असतात. हॉलच्या खिडकीतून ते सोसायटीतल्या लोकांना बघत बसतात. खाली छोट्या गार्डनमध्ये योगासनं करत असलेल्या पाटलांना त्यांची सून नाश्त्याला बोलवते, मुळे काकूंचा नातू त्यांचा हात धरून फिरत असतो. हे सगळं बघून काकांना उगाच निराश व्हायला होतं. त्यामुळं आजकाल ते फारसे कुणात मिसळत नाहीत. कारण लोक भेटले की घरगुती गोष्टी बोलतात. वय झालेली माणसं सारखी आपल्या सुना-नातवंडावर बोलतात. वैताग येतो काकांना. त्यात वर्तमानपत्रातल्या बातम्या. कुणीतरी वृद्ध स्त्रीचा मृतदेह घरात तीन दिवस तसाच पडून होता, वास आला म्हणून शेजाऱ्यांनी तक्रार केली, मग कळले.. किंवा शेजारच्या सोसायटीतले आजोबा गेले, तेव्हा अमेरिकेतल्या नातवाने सांगितलं की अंत्यसंस्कार करून टाका, मी पैसे पाठवतो; पण येऊ शकत नाही.. असल्या गोष्टी ऐकून दामले काका हैराण होतात. खूपदा न जेवता तसेच झोपी जातात.
आपला मुलगा कष्टाळू आहे, असं काका सगळ्यांना सांगत असतात. आणि सून पण एकदम चांगली आहे, तिनं नातवाला शुभंकरोति शिकवलीय, एकही सण चुकवत नाही वगैरे वगैरे सांगताना त्यांच्या डोळ्यात कौतुक असतं. मुलाला आता आणखी दोन प्रमोशन मिळाले की, तो युरोपातल्या कंपनीचा ‘सीइओ’ होणार आहे. त्याच्या आयुष्यातली ती सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असणार आहे. मुलाचे त्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत. पण, अशात तो जरा वैतागलाय. कारण इकडं पुण्यातून फार बऱ्या गोष्टी त्याच्या कानावर पडत नाहीत. सोसायटीतले दोन-चार लोक त्याच्या संपर्कात असतात. त्यांच्याकडून त्याला आपल्या पप्पाच्या म्हणजे दामले काकांच्या अपडेट मिळत असतात. खरं तर या लोकांच्या तो संपर्कात आहे, ते त्यांची सोसायटी री-डेव्हलपमेंटला जाणारंय म्हणून. तो पाच-सात लोकांचा ग्रुप आहे. त्यात आधी दामले काका होते. पण, त्यांचा या री-डेव्हलपमेंटला विरोध आहे. म्हणून त्यांना काढून सोसायटीच्या लोकांनी मुलाला म्हणजे निनादला ग्रुपमध्ये सामील केलं. त्यावर, बिल्डरशी काय बोलणं चालू आहे, तो किती जागा द्यायला तयार आहे वगैरे अपडेट असतात. पण, त्यातल्याच काही लोकांनी या महिन्यात निनादला पर्सनल मेसेज केले. प्रकरण जरा गंभीर होतं. निनादला आपले पप्पा असं काही करतील, यावर विश्वासच बसला नाही.
दामले काका सत्तरीत आहेत. सोसायटीत राहणाऱ्या एका मित्राने निनादला फोन केला आणि सांगितलं की, काकाचं लक्षण काही ठीक दिसत नाही. निनाद भडकला. पण, आणखी दोन-तीन लोकांनी तीच तक्रार केली. शेवटी सोसायटीचे कोषाध्यक्ष असलेल्या वैद्य काकांनी निनादला खरा प्रकार सांगितला. गेल्या महिन्यापासून दामले काका जरा विचित्र वागताहेत. त्यांनी बाजूच्या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मेडिकलवाल्याला, ‘व्हायग्रा मिळेल का?’ म्हणून विचारलं. बिचारा घाबरून गेला. काका त्याच्या चांगल्या ओळखीचे. अगदी शांत, सज्जन. कधी कुणाशी उगाच बोलणार नाहीत का वेळ वाया घालवणार नाहीत. आपल्या कामाशी काम. फार तर रस्त्यावरच्या कुत्र्याला बिस्कीट विकत घेऊन खाऊ घालतील. पण, एरवी कुठं टाइमपास नाही. आणि ते असे अचानक पंधरा मिनिटं मेडिकलसमोर उभे राहतात काय, बाकी कुणी गिऱ्हाईक नाही बघून आपल्याजवळ येतात काय आणि हळूच कानात असा प्रश्न विचारतात काय.. सगळ्याच गोष्टी मेडिकलवाल्याला हैराण करणाऱ्या होत्या. बरं, काकांना तो ओळखत असला, तरी फार बोलणं नसायचं. त्याने ‘नाही’ म्हणून सांगितल्यावर काकांनी आपल्या चेहऱ्यावरची निराशा अजिबात लपवली नाही. ते गेल्या क्षणी मेडिकलवाल्याने त्यांच्या सोसायटीत राहणाऱ्या आपल्या दोन-तीन मित्रांना फोन करून घडला प्रकार सांगितला. ते दोघे तिघे ‘काय? काय?’ म्हणत पुन्हा पुन्हा घडला प्रकार ऐकत राहिले. गमतीची गोष्ट म्हणजे, कुणालाच मेडिकलवाल्यावर विश्वास बसला नाही. मेडिकलवाल्याला वाटलं की, आता पुन्हा काही दामले काका येणार नाहीत. पण, दुसऱ्या दिशी काका मेडिकलवर हजर. पुन्हा दहा मिनिटं बाकीचे गिऱ्हाईक जायची वाट बघत राहिले. कुणीच नाही असं पाहून मेडिकलवाल्याजवळ गेले. हळूच विचारलं, ‘व्हायग्रा आलं?’ त्याला कालचा प्रकार चुकून झाला, असं वाटलं होतं. कदाचित काकांना व्हायग्रा म्हणजे भलतंच काही वाटत असेल, असंही वाटलं एक क्षण त्याला. पण, आता तसा प्रकार दिसत नव्हता. कारण तो आजही नाही म्हणाला तेव्हा काका भडकले. ‘कशाला मेडिकल उघडलं?’ म्हणाले. मेडिकलवाला संतापला असता एरवी. पण, आज तो शांत बसला. काकांना ते का हवंय? हा विचार करत राहिला.
पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच वेळी काका आले. आज मात्र सोसाटीचे कोषाध्यक्ष मेडिकलमध्ये आधीच येऊन बसले होते. आतमध्ये, कुणाला दिसणार नाही असे. मेडिकलवाल्याने आज विचारलंच. ‘का हवाय व्हायग्रा?’ काका म्हणाले, ‘तुला माहीत नाही? या वयातल्या लोकांसाठी जालीम इलाज आहे तो..’ आत बसलेल्या वैद्यांना हसूही आलं आणि रागही. काका चिडचिड करत निघून गेले. वैद्यांनी तडक निनादला फोन लावून सांगितलं. त्याला हा मोठा धक्का होता. तो तातडीने फ्लाइट पकडून भारतात आला. थेट घरी. काका काहीच न घडल्यासारखे त्याच्याशी बोलत होते. तो आल्याने आनंदात होते. निनादचा मात्र संताप वाढत होता. त्याने एका क्षणी विचारलंच. ‘व्हायग्रा कशाला हवाय?’ काका म्हणाले, ‘या वयातल्या लोकांसाठी जालीम इलाज आहे तो..’ निनाद आणखी संतापला. पण, काका हसून म्हणाले, ‘तीन वर्ष झाले, तू भारतात आला नाहीस. पण, आपला म्हातारा बाप व्हायग्रा शोधतोय हे ऐकून लगेच आलास ना? झाला इलाज! तुला भेटायचं होतं रे.. माझी विनंती ऐकून तर आला नाहीस तीन वर्ष. म्हणून जरा जालीम इलाज केला. मला माहीत होतं, ही बातमी पोचेल तुझ्यापर्यंत. आपली सोसायटी तेवढं काम बरोबर करते. एरवी कुणी चौकशी करत नाही. पण, रिकाम्या चौकशा फार असतात सोसायटीला..’ निनादला काय बोलावं सुचत नव्हतं. त्यानं सोबत आणलेली वाइन त्यांना दिली. आणि लटक्या रागात त्यांच्याकडं बघत बसला. दामले काका मात्र आपल्या आयडियावर खुश होते.
अरविंद जगताप
jarvindas30@gmail.com







