Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रखलनिग्रहणाय: पोलिसांचे मनोबल कसे वाढेल?

खलनिग्रहणाय: पोलिसांचे मनोबल कसे वाढेल?

खलनिग्रहणाय:  पोलिसांचे मनोबल कसे वाढेल?

[ad_1]

डॉ. भूषणकुमार उपाध्याय8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

देशाची अंतर्गत सुरक्षा पोलिसांच्या हातात असते. कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हेगारी प्रतिबंध, सामाजिक सलोखा राखणे, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा, वाहतूक नियंत्रण, देशविघातक शक्तींचा बीमोड आदी पोलिसांची प्रमुख कर्तव्ये आहेत. ही सर्व कामे योग्य प्रकारे व्हावीत, यासाठी पोलिस यंत्रणा सक्षम असणे आवश्यक असते. आणि सक्षम पोलिस यंत्रणेसाठी पोलिसांचे मनोबल उंच असणे तितकेच आवश्यक असते.

सध्याचा काळात अनेक कारणांनी पोलिसांच्या मनोबलावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसते. अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने ही परिस्थिती निश्चितच चांगली नाही. यामध्ये बदल होण्यासाठी काही गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष देण्याची, त्यात सुधारणा करण्याची गरज आहे.

पारदर्शक भरती, दर्जेदार प्रशिक्षण
सगळ्यात आधी पोलिसांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आली पाहिजे. योग्य प्रकारे भरती झालेला पोलिस कर्मचारी आणि अधिकारीच पुढे चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. महाराष्ट्र त्या दिशेने सकारात्मक वाटचाल करीत आहे. काही अपवाद वगळता महाराष्ट्राची पोलिस भरती प्रक्रिया व्यवस्थित आणि पारदर्शी बनते आहे. भरतीनंतर पोलिसांसाठी प्रशिक्षण खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे ते सुद्धा योग्य रीतीने होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशिक्षण केंद्रात तरुण, उच्च प्रशिक्षित आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक व्हायला हवी. बऱ्याचदा इच्छा नसलेल्या अधिकाऱ्यांना तिथे नेमले जाते. या संदर्भात सरकारने एक धोरण निश्चित करावे. त्यानुसार सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना आळीपाळीने तेथील जबाबदारी दिली जावी. प्रशिक्षण केंद्रांमध्ये काम करणारे अधिकारी, अंमलदारांना विशेष वेतन आणि सुविधा दिल्या जाव्यात. पोलिस प्रशिक्षण केंद्र हे ज्यांच्यावर काही आरोप आहेत, ज्यांची विभागीय चौकशी सुरू आहे किंवा जे राजकारण्यांच्या मर्जीप्रमाणे काम करीत नाहीत वा त्यांच्या मागे-पुढे करीत नाहीत अशा अधिकाऱ्यांच्या नेमणुकांची जागा होऊ नये. असे होत राहिले, तर या केंद्रांतील प्रशिक्षणाचा दर्जा आणि तिथून बाहेर पडणाऱ्या पोलिसांचे मनोबलही उंचावणार नाही.

‘फायद्या’च्या पोस्टिंगचे दुष्टचक्र
भरती आणि प्रशिक्षणानंतर पोलिसांची नेमणूक फार महत्त्वाची असते आणि याच टप्प्यावर बऱ्याच भानगडी होतात. अनेक अधिकारी, कर्मचारी वशिल्याच्या, पैशाच्या जोरावर फायद्याची, सोयीची पोस्टिंग मिळवतात आणि तिथूनच भ्रष्टाचाराची मालिका सुरू होते. या प्रकारामुळे चांगले आणि प्रामाणिक पोलिस अधिकारी, अंमलदार मागे पडतात. इतरही पोलिसांच्या मनोबलावर या गोष्टीचा अत्यंत वाईट परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या कामाची गुणवत्ता खालावते आणि त्याचे परिणाम शेवटी जनतेला भोगावे लागतात. नेमणुका, पोस्टिंगच्या बाबतीत महाराष्ट्राच्या पोलिस दलातील परंपरा अतिशय चांगली राहिली आहे. पण, गेल्या काही वर्षांत ती खंडित झाल्याचे दिसते. पोलिसांच्या मनोबलावर आणि त्यातूनच त्यांच्या कार्यक्षमतेवर याचा मोठा दुष्परिणाम झाला आहे.

अडचणी सोडवणारी ‘परेड’
अलीकडे अनेक पोलिस घटकांमध्ये परेड होताना दिसत नाही. वास्तविक घटक प्रमुख प्रत्येक शुक्रवारी पोलिस मुख्यालयाला स्वतः हजर राहून परेडचे निरीक्षण करतो. अधिकारी – अंमलदारांशी बोलतो. चांगल्या कामांसाठी त्यांना बक्षिसे देतो. या गोष्टींमुळे पोलिसांचे मनोबल खूप वाढते. परेडनंतर दरबार घेण्याची प्रथा आहे. पण, आता तेही नियमितपणे होताना दिसत नाहीत. या दरबारामध्ये अनेक अडचणी सुटतात आणि एक चांगले वातावरण तयार होते. पोलिस दलात दर मंगळवार आणि शुक्रवारी ऑर्डर्ली रूमची परंपरा आहे. या ऑर्डर्ली रूममध्ये कनिष्ठ अधिकारी आणि अंमलदारांच्या अनेक व्यक्तिगत समस्या सुटतात. अलीकडे अनेक घटकांमध्ये हे होताना दिसत नाही. मी पोलिस अधीक्षक असताना महिन्यातून दोनदा पोलिस लाइनला भेट द्यायचो. पोलिसांच्या क्वार्टरमध्ये अनेक समस्या असतात. अशा भेटीमुळे त्यातील काही सुटतात. आमचा कोणी तरी वाली आहे, असे तिथे राहणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना वाटते.

वरिष्ठांची वर्तणूकही महत्त्वाची
पोलिस दलातील कनिष्ठ अधिकारी आणि अंमलदारांसाठी वरिष्ठ अधिकारी हे आदर्श असतात. म्हणून वरिष्ठांचा वर्तन – व्यवहार योग्य आणि प्रेरक असायला हवा. काही वरिष्ठ अधिकारी आपल्या कनिष्ठांना हीनभावनेने वागवताना दिसतात. त्यामुळे त्या व्यक्तीबरोबरच अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनोबलावरही विपरीत परिणाम होतो. ‘बेस्ट कॉप ऑफ द मंथ’ अवॉर्ड देण्याची चांगली प्रथा पोलिस दलात आहे. पण, बऱ्याच घटकांमध्ये ती नियमितपणे पाळली जात नाही. राष्ट्रपती पदकासाठी नाव पाठवतानाही दिरंगाई केली जाते किंवा अनेकदा नाव पाठवलेही जात नाही. त्यामुळे योग्य अधिकारी आणि अंमलदार या पदकांपासून वंचित राहतात. असे प्रकार न होण्याची खबरदारी घ्यायला हवी.

सेवानिवृत्तीनंतरचा सन्मान
प्रदीर्घ सेवेनंतर पोलिस दलातील कनिष्ठ अधिकारी आणि अंमलदार निवृत्त होतात, तेव्हा परिवारासोबत त्यांचा उचित सन्मान व्हायलाच हवा. मी घटक प्रमुख असताना अशा कार्यक्रमाला आवर्जून हजर राहायचो. संपूर्ण पोलिस दलाचे मनोबल उंचावण्याची ही एक मोठी संधी असते. पण, अनेक घटक प्रमुख या कार्यक्रमाकडे पाठ फिरवतात. निवृत्तीनंतरही अनेक महिने पेन्शन मंजूर होत नाही. निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्याला कार्यालयाच्या घिरट्या घालाव्या लागतात, ही अत्यंत क्लेशदायी गोष्ट आहे. खरे तर, एखाद्याच्या सेवानिवृत्तीच्या सहा महिने आधी पेन्शनचे काम सुरू व्हायला हवे. त्यासाठी घटक प्रमुख जबाबदार असतात.

कौटुंबिक जिव्हाळ्याची जपणूक
आम्ही १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १ मे या दिवशी विशेष कार्यक्रम घेऊन चांगली कामगिरी केलेल्या अधिकारी, अंमलदारांचा त्यांच्या कुटुंबासोबत सत्कार करायचो. या उपक्रमाचा चांगला संदेश पोलिस दलात जायचा. एखादा अधिकारी वा कर्मचारी आजारी पडला, तर वरिष्ठ अधिकारी त्याची भेट घ्यायचे. दुर्दैवाने आता असे नाते फारसे जपले जात नाही. वार्षिक क्रीडा स्पर्धांच्या वेळी होणारा ‘बडा खाना’ही खूप महत्त्वाचा असतो. यावेळी सगळे वरिष्ठ, कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी एकत्र जेवण करतात. मी जेव्हा वार्षिक निरीक्षणासाठी पोलिस स्टेशनला जायचो, तेव्हा दुपारचे जेवण तिथल्या अधिकारी आणि अंमलदारांसोबतच करायचो. पोलिस लाइनमधल्या मुलांनाही आमच्यासोबत जेवायला बोलावायचो.

सध्याचा काळात यातील अनेक उपक्रम बंद पडल्याचे दिसते. पारदर्शक भरती, परिपूर्ण प्रशिक्षण, गुणवत्तेनुसार पोस्टिंग, समस्यांची सोडवणूक, वरिष्ठांकडून चांगली वागणूक, निवृत्तीनंतरही सेवेचा सन्मान आणि कौटुंबिक जिव्हाळा अशा गोष्टींतून पोलिसांचे मनोबल उंचावू शकेल. पोलिस दलाचे नेतृत्व करणारे वरिष्ठ अधिकारी आणि राज्यकर्त्यांनी या गोष्टीचा आर्वजून विचार केला पाहिजे.

(संपर्कः bhushankumarupadhyay@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments