गोष्ट सांगतो ऐका…: मताबद्दलचं मत!

0
3
गोष्ट सांगतो ऐका…:  मताबद्दलचं मत!




ती : अहो, काय चाललंय हे?
तो : जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं मतदान चालू आहे. तुम्ही विचारताय काय चाललंय हे..?
ती : तसं नाही हो.. पण, माझं मतदार यादीत नावच नाही.
तो : काय सांगता? कमाल आहे.
ती : अहो, जाताय कुठं? खरंच नाव नाही माझं.
तो : अहो, मी कुठं खोटं म्हणतोय.. खरंच नसेल नाव तुमचं.
ती : तुम्हाला काहीच वाटत नाही? मतदार यादीतून माझं नाव काढलंय चक्क.
तो : मला सांगा, घरात मुलांनी काही मोठी कामगिरी केली की आपण काय म्हणतो, ‘नाव काढलं पोरानं!’ तसं तुम्ही पण आज नाव काढलं असं समजा..
ती : हा गमतीचा विषय नाही. माझं नाव का नाही सांगा..
तो : मला सांगा, समजा मतदार यादीत तुमचं नाव असतं, तर तुम्ही काय केलं असतं?
ती : मतदान केलं असतं.
तो : कुणाला?
ती : तुम्हाला का सांगू?
तो : बरं नका सांगू. पण, या उमेदवारांपैकी एकालाच केलं असतं ना?
ती : हो.
तो : मला सांगा, एक तरी धड आहे का हो ह्याच्यात?
ती : पण, आता निवडणूक आहे म्हणजे मतदान केलं पाहिजे.
तो : दवाखाना जवळ आहे म्हणून कुणी आजारी पडत का? किंवा गरिबांना अन्न-धान्य मोफत मिळणार म्हणून आपण गरीब व्हायचं का? किंवा पोलिओचा डोस फुकट असतो, म्हणून मुलासोबत आपणही पितो का?
ती : अहो, पण मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. एका मताने फरक पडू शकतो.
तो : बरोबर. मत टाकल्यानं फरक पडू शकतो, तर न टाकल्यानंही पडणारच. फरक पडण्याशी मतलब आहे ना..
ती : तुम्ही का डोकं लावताय? माझं नाव यादीत का नाही ते सांगा. मी किती लांबून आलेय उन्हातान्हात माहितीय?
तो : पण, का आलात? तुम्हाला काय वाटलंं, तुम्ही आला नसता तर निवडणूक झाली नसती? देशाला पंतप्रधान मिळाला नसता?
ती : आईवडिलांनी या बोटाला धरून वाढवलं मला. आज त्या बोटावर मतदानाची शाई बघून उर भरून येईल त्यांचा..
तो : बस. बस.. रडू बिडू नका. फक्त एवढं सांगा, कोणत्या पक्षाची विचारधारा आवडते?
ती : मला काही पोलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही. ते सगळे म्हातारे नेते बघायला मला जाम कंटाळा येतो. म्हणून मी नवरा सांगतो, त्या पक्षाला मत देते.
तो : तुम्ही तुमच्या नवऱ्याने सांगितलेली भाजी घेता?
ती : नाही. त्यांना भाजीतलं काही कळत नाही.
तो : ज्याला भाजीतलं कळत नाही, त्याला देश कुणी चालवायला पाहिजे, हे कळतं असं वाटतं का तुम्हाला?
ती : बरं नसेल कळत. पण आम्ही ठरवलंय, बाकी कुठल्या बाबतीत आपलं एकमत होत नाही ना, मग निदान एकाच उमेदवाराला मत देऊ. एवढ्या बाबतीत तरी एकमत..
तो : धन्य झाली असेल आज भारतमाता हे ऐकून.
ती : तुम्ही चेष्टा नाही ना करत?
तो : नाही. नाही.. मला फक्त एवढाच प्रश्न आहे की, या देशाला खरंच तुमच्यासारख्या लोकांचं मत गरजेचं आहे?
ती : हे बघा, माझी खूप लहानपणापासून इच्छा होती की, माझ्या बोटाला ती काळी शाई लागावी..
तो : बाजारातून शाई घ्या अन् एका नाही दहाही बोटांना लावा..
ती : तसं नाही हो. ही शाई स्पेशल आहे ना.. खूप दिवस निघत नाही म्हणे. एकदा बघू तरी म्हटलं कशी असते ही शाई..?
तो : अच्छा. म्हणजे शाई कशी आहे, हे बघण्यासाठी तुम्हाला मतदान करायचंय. धन्य झाली आज लोकशाही..
ती : तुम्ही लेक्चर देऊन माझा वेळ घालवू नका. तुम्हाला माहितीय? माझ्या सगळ्या मैत्रिणींनी मतदान केलेल्या बोटाचे फोटो फेसबुकवर टाकले पण..
तो : निवडणुकीत अर्ध्या देशाला पोटाचा विचार पडलेला असतो आणि अर्ध्या देशाला बोटाचा. कधी एकदा बोटाचा फोटो टाकू..
ती : माझ्या मैत्रिणीच्या बोटावर तर इतकं छान डिझाइन आलंय ना.. तिनं रेड नेलपॉलिश लावलं होतं. रेडवर ती काळी शाई इतकी सूट होते म्हणून सांगू..
तो : उमेदवार सूट होतो का पण आपल्याला?
ती : तुम्ही काय नतद्रष्ट आहात हो? किती त्या उमेदवाराचा विचार करायचा? नवरा निवडताना तरी एवढा विचार करतात का बायका आपल्या देशात? दिसायला बरा आणि कमावणारा असला की बस..
तो : नवऱ्याला वठणीवर आणू शकतात बायका. तो जाऊन जाऊन कुठं जाणार? मध्यरात्री का होईना घरीच येतो. पण, हे उमेदवार एकदा निवडून आले की पुन्हा सापडत नाहीत.
ती : आपण तरी का जायचं त्यांना शोधायला? पेपर वाचत नाही का तुम्ही? बायकांच्या बाबतीत कसे आहेत हे राजकारणी..
तो : तरी तुम्हाला मतदान करायचंय?
ती : हो. कारण मी खास नवऱ्यालाही सोबत आणलंय फोटो काढायला. माझ्या बोटाचा फोटो मी असा गालावर बोट ठेवून काढणार आहे. आणि आमच्या दोघांचा असा बोटात बोट अडकवून. अजून असा फोटो एकीनेही नाही टाकला..
तो : किती त्या बोटाच्या फोटोची चिंता आहे. मतदार बोटाभोवती फिरतात आणि उमेदवार बोटावर फिरवतात..
ती : पार्लरमधून नखांची ट्रिटमेंट, फिनिशिंगही केलीय मी..
तो : एखाद्या उमेदवाराएवढाच खर्च केलेला दिसतोय तुम्ही..
ती : नाही हो. पण, पाच वर्षात एकदा निवडणूक येते म्हटल्यावर एवढं तर केलंच पाहिजे ना..?
तो : खरंय तुमचं.. साडी पण नवीन दिसतेय..
ती : अहो, ही खास वोटिंग साडी आहे. हिच्यामुळं बोटावरची शाई खूप उठून दिसते. आणि मी ऐकलंय की, या बूथवर खूप सेलिब्रिटी येतात ना वोटिंग करायला. म्हणून जरा मेकअप करून आलेय..
तो : म्हणजे सेलिब्रिटी येतात म्हणून तुम्ही इकडं आलात?
ती : हो.
तो : एरवी मतदान केंद्र कुठं असतं तुमचं?
ती : त्या प्राथमिक शाळेत. पण, तिथं कुठं जाणार? सगळे झोपडपट्टीचे लोक येतात तिथं. म्हणून इकडं आले. आणि इथं येऊन पाहते तर काय, यादीत नावच नाही माझं. टू मच! किती होपलेस कारभार आहे. इरिटेटिंग..
तो : खरंच इरिटेटिंग आहे. झोपेत कानातले पडले तर तुम्ही कुठं शोधता? तुमच्या बेडरूममध्ये? की शेजाऱ्यांच्या?
ती : काही पण काय बोलता?
तो : खरं तेच बोलतोय. अहो, आपलं मतदान केंद्र जिथं आहे तिथंच मतदान करता येतं. आणि फेसबुकवर फोटो टाकण्यासाठी जेवढी मेहनत त्या बोटावर घेतलीय, त्यापेक्षा दोन टक्के मेहनत दहा दिवस आधी यादीत आपलं नाव आहे की नाही, ते तपासायला घेतली असती तर? आणि बोटाएवढाच उमेदवाराच्या चारित्र्याचा, त्याच्या कार्याचा विचार केला तर बरं झालं असतं. फक्त फेसबुकवर फोटो टाकण्यासाठी मतदान करणाऱ्यांनो, लोकशाही तुम्हााला माफ करणार नाही!



Source link