Wednesday, September 2, 2026
Homeमहाराष्ट्रडायरीची पाने: सावलीचा मांडव

डायरीची पाने: सावलीचा मांडव

डायरीची पाने:  सावलीचा मांडव

[ad_1]

इंद्रजित भालेराव2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आता मांडव बाजारात तयार मिळतो. कामापुरता घालून परत नेला जातो. त्याला दररोज किती माणसांचे स्पर्श होत असतील, तो कुणाला आपला वाटत असेल माहीत नाही.

रानावनातल्या रखरखत्या उन्हात तोंड लपवण्यासाठी सगळे जण सावली शोधत असतात. दिसेल त्या सावलीचा आधार घेत ऊन टाळण्याचा प्रयत्न करतात. रानावनात चरणारी गुरं जसजसं ऊन वाढेल तसतशी झाडाझुडपाच्या बुडाला एकत्र येतात. एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली पुष्कळ गुरं बसलेली आहेत अन् माणसंही त्यांच्यासोबत ऊन टाळण्यासाठी तिथंच बसली आहेत अशी छायाचित्रं सध्या अनेक जण समाजमाध्यमावर टाकत असतात. पण, सगळ्यांच्या शेतात असं डेरेदार आंब्याचं झाड असेलच याची खात्री नसते. रानावनात गर्द सावली देणारं आंब्याशिवाय दुसरं मोठं झाड नसतं. वड, पिंपळ कुणी आपल्या शेतात लावत नाहीत. लिंबाची सावली पुरेशी नसते. बाभळीची सावली तर नसल्यातच जमा असते. अशा वेळी ज्यांच्या शेतात झाडझुडूप नाही असे लोक जनावरांना उन्हापासून वाचवण्यासाठी मांडव घालतात.

चारण्यासाठी दिवसभर गायी रानात गेलेल्या असतात. पण, काम संपल्यावर रिकामे झालेले बैल रानात गायीसोबत नेता येत नाहीत. वासरंही गायीसोबत नेता येत नाहीत. अशा वेळी या जिवांना उन्हाच्या तलखीपासून वाचवण्यासाठी उघड्या रानात मांडव घातला जातो. खरं तर जनावरांसाठी वर्षात तीन प्रकारचे निवारे केले जातात. पावसाळ्यात ती झोपडीत बांधली जातात. हिवाळ्यात त्यांना रानात, उघड्यावरच बांधलं जातं आणि उन्हाळ्यात ती मांडवात बांधली जातात. हा मांडव तात्पुरता असतो. बाभळीच्या डिळ्यांवर शेवरीची आडवी लाकडं टाकून तो तयार केला जातो. फक्त उन्हापासून संरक्षण म्हणून उन्हाळाभर हा मांडव ठेवला जातो. म्हणून त्याची बांधणी पक्की नसते. डिळ्या फार खोल घातलेल्या नसतात. वर छतावर सुरक्षेसाठी फार मजबूत असं काही केलं जात नाही. पराठ्यांचे विरळ ताटपे केले जातात आणि त्यावर कडब्याच्या पेंढ्या किंवा उसाचे पाचट अथवा तणसाच्या पेंढ्या टाकून सावली केली जाते.

अशा मांडवांना राखण्यासाठी आडनीड वयाची मुलं शेतात ठेवली जातात. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात ही कामं आम्ही करायचो. दोन बैल, दोन-तीन वासरं आणि आम्ही घरातली दोन-तीन लेकरं ऊन तापू लागल्यापासून ते ऊन उतरेपर्यंत या मांडवात असायचो. नदीकाठच्या झिऱ्यावरून बिनगी भरून आणलेली असायची. तिच्यातलं गार पाणी झाकणीनं प्यायचो अन् दिवसभर तिथंच खेळायचो. गावातल्या जत्रेत पाहिलेल्या नाटकाची, सोंगांची नक्कल करायचो. मोठ्या माणसांनी सांगितलेल्या वेळी वासरांना नि बैलांना चारा टाकायचो, त्यांना नदीवर पाणी पाजवून आणायचो. दिवसभर आमचं हेच काम असायचं. असा मांडव घालण्यापासून तो मांडव मोडण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही सहभागी असायचो. मुलं असलो, तरी पडेल ते छोटंमोठं काम करायचो. कारण हा मांडव म्हणजे आम्हाला आमचं स्वतः बांधलेलं घरच वाटायचं. मोठी माणसं डिळ्या रोवत असतील, तर आपण बंधाट्या आणून ठेवणं, उसाचे पाचट किंवा कडब्याच्या पेंढ्या आणून ठेवणं अशी कामं आम्ही करायचो. मांडवाला विरळ स्वरूपाचा कूड घेतला जायचा. हवा खेळती राहील असा हा कूड असल्यानं त्यातून छान हवा यायची, त्यामुळं गुदमरायचं नाही.

शेतात हे मांडव घातले जायचे, तसे गावातही मांडव घालावे लागायचे. कारण पूर्वी लग्नासाठी तयार शामियाने नसायचे. लग्नासाठी मांडव घातला जायचा, तोही शेतातल्या मांडवासारखा तात्पुरताच असायचा. लग्न झालं की तोही मोडला जायचा. फक्त बोहलं आणि बोहल्यावरचा मांडव ठेवला जायचा. या मांडवासाठी बाभळीच्या डिळ्या आणि शेवरीच्या बंधाट्या आणल्या जायच्या. छतावर पाचट, तणस किंवा कडबा टाकला जायचा. रानातल्या आंबा, जांभूळ, उंबर या झाडांच्या हिरव्या फांद्या आणून बांधल्या जायच्या, त्यामुळं सगळा मांडव हिरवागार, शोभिवंत दिसायचा. मांडव सजवण्यासाठी यापेक्षा दुसरा पर्याय तेव्हा गावकऱ्यांना माहीत नसायचा. आमच्या बहिणींचे असे मांडव लहानपणी आम्ही सजवले होते. त्यामुळे मांडव घालणे आणि मोडणे हे प्रकार पुष्कळ वेळा पाहायला मिळायचे. या मोठ्या माणसांच्या मांडवात सहभागी होऊन, आम्ही त्या शेजारीच खेळण्यातले, आमचे टिपऱ्यांचे मांडवही घालायचो. कारण मोठ्यांचं अनुकरण मुलं आपल्या खेळण्यात करत असतातच.

आणखी एका कारणासाठीही मांडव घातला जातो. अर्थात तो आकाराने लहान असतो आणि त्या मांडवावर फुलवेली चढवल्या जातात. अशा मांडवाला शाकारण्याची गरज नसते. आपोआपच त्या वेली मांडवावर पसरत राहतात आणि त्यांचा छत तयार होतो. असे मांडव मंदिरासमोर, महानुभावांच्या आश्रमासमोर आणि हौशी गोरगरिबांच्या झोपडीसमोरही घातले जायचे. त्यावर चमेलीची वेल चढवली जायची. अशा मांडवाखाली बसायला खूप मजा यायची. कारण सावलीसोबत फुलांचा सुगंधही दरवळत असायचा. चमेलीच्या फुलांचा वास घेत त्या मांडवाखाली पुस्तक वाचताना खूप आनंद वाटायचा. जुन्या हिंदी चित्रपटातलं एक गाणं आहे.. ‘एक चमेली के मंडवे तले..’ म. रफी – आशा भोसले यांनी ते गायलं होतं. हिंदी चित्रपट गीतांमध्ये चमेलीच्या मांडवाचे असे संदर्भ यायचे. पण, मराठीतील असं कुठलं गाणं माझ्या आठवणीत नाही.

आता हे कुठलेच मांडव घातले जात नाहीत. शेतात जनावरच राहिलेली नाहीत त्यामुळं तिथंही मांडव घालण्याची गरज उरली नाही. छोट्या-मोठ्या घरच्या लग्नातही आजकाल कनातीचे आयते मांडव टाकले जातात. ज्याच्या शेतात एखाद-दुसरी जनावरं आहेत, तिथं मांडव उभा केला जातो. पण, त्याला ना बाभळीच्या डिळ्या नि शेवरीच्या बंधाट्या असतात, ना तुराटीचा कूड असतो. बाजारात जो हिरवा कपडा मिळतो, तोच लावून असे मांडव तयार केले जातात. त्याला पन्नी असं म्हटलं जातं. हे पन्नीचे मांडव करणं सोपं जातं. मात्र, त्या काळातली मजा या मांडवात येत नाही, असं आपल्याला वाटत राहतं. पण, नव्या शेतकऱ्याला काय वाटतं, ते जास्त महत्त्वाचं. शेतात शेवरी नाहीत, बांधावर बाभळी नाहीत. मग या शेतकऱ्यानं काय करावं? तर बाजारातून रेडिमेड कपडा आणावा आणि आपली गरज भागवावी हेच खरं. ज्याची त्याची गरज आणि काळाचा महिमा हेच शेवटी महत्त्वाचं.

निसर्गातल्याच वस्तूंपासून निसर्गात निवारा करण्याची जुन्या शेतकऱ्यांची पद्धत आता राहिली नाही. जागतिकीकरणाच्या जमान्यात सगळीकडे बाजार शिरला आहे. त्यामुळं शेतकऱ्यालाही बाजारात जाऊन प्रत्येक वस्तू आणावी लागते. मांडवही आजकाल बाजारात असाच तयार मिळतो आणि कामापुरता घालून तो परतही नेला जातो. त्याला दररोज किती माणसांचे स्पर्श होत असतील आणि तो कुणाला आपला वाटत असेल माहीत नाही. वेळ साजरी होते, याला जास्त महत्त्व दिलं जातं. आणि यात काही चूक आहे असं म्हणता येणार नाही.

(संपर्कःinbhalerao@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments