Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रगोष्ट सांगतो ऐका...: लाडाचा घोडा

गोष्ट सांगतो ऐका…: लाडाचा घोडा

[ad_1]

अरविंद जगताप2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

खूप वेळ गायत्रीचा आरडाओरडा सुरू होता. पण, फोन कुणी फोडला ते सांगायला बापलेक तयार नव्हते. अधूनमधून दोघं एकमेकांकडं बघायचे. तेवढंच…

गायत्रीने लग्नाच्या पंधराव्या वाढदिवसाला विनोदला नवीन मोबाइल घेऊन दिला. विनोदचा मोबाइल चांगलाच होता. पण, खूप वर्षांपासून तिला नवऱ्याला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं. तिनं विनोदचा जुना मोबाइल स्वतः घेतला. नवा स्मार्ट मोबाइल विनोदला दिला. विनोदने खूश होऊन त्या रात्री बायको आणि मुलासाठी स्वतः बिर्याणी बनवली. स्मार्टफोनमुळं त्यांचा मुलगा सोहम जास्त आनंदी होता. त्याला आता त्याचे आवडते गेम खेळायला मिळणार होते. सोहम बारा वर्षांचा गुणी मुलगा. पण, मोबाइल हातात येईपर्यंत. एकदा मोबाइल हातात आला की त्याच्या अंगात यायचं. गेम खेळताना तो भान हरवून जायचा. मग कितीही आवाज दिले तरी त्याचं लक्ष नसायचं. गायत्री किंवा विनोदला कळत नाही तेवढं त्याला मोबाइलमधलं कळतं. नवीन मोबाइल घेऊन आठवडा झाला नाही अजून, पण सोहम तीन-चारदा तरी म्हणाला असेल की, तुम्हाला हा मोबाइल वापरताच येत नाही, तर मला का नाही देऊन टाकत? विनोद आणि गायत्रीने गमतीने तो विषय टाळला. खरं तर सोहम एकुलता एक असल्यानं त्यांना त्याच्या प्रत्येक हट्टाचं कौतुक वाटतं. पण, आज घडलेली गोष्ट भयंकर होती.

गायत्री आठवडी बाजारात गेली होती. नेहमीप्रमाणं तिला तासभर वेळ लागला. ती थकून-भागून घरी आली. घरात विनोद आणि सोहम दोघं होते. पण, एकदम शांतता होती. एरवी टीव्ही चालू असतो. गायत्री बाहेर गेली की सोहम अभ्यास सोडून मोबाइलवर गेम खेळत असतो. पण, आता असं काही घडताना दिसत नव्हतं. बापलेक दोघेही दोन कोपऱ्यात शांत बसलेले होते. त्यांचे चेहरे बघून गायत्रीने ओळखलं होत की काहीतरी बिनसलंय. उन्हातान्हात बाजारात फिरून आणि पिशव्यांचं ओझं उचलून ती खूप थकलेली होती. काही बोलली नाही. काही वेळ बसून राहिली. खरं तर तिनं नवऱ्याला फोन केला होता बाजारातून.

आंबेमोहोर तांदूळ चांगला होता म्हणून दहा किलो घेतला. ओझं जास्त झालं म्हणून नवऱ्याला बोलवायला फोन केला. पण, फोन लागलाच नाही. तांदूळ घ्यायचा बेत रद्द केला. तिला ते आठवलं. तिनं विनोदला विचारलं, ‘फोन का नाही लागत?’ विनोद काहीच बोलला नाही. सोहमने तर तोंड फिरवलं आणि किचनमध्ये गेला. गायत्री आता कुठं जरा निवांत श्वास घेत होती, तेवढ्यात तिचा पारा चढू लागला. ती इकडंतिकडं बघू लागली. फोन कुठं दिसत नव्हता. गायत्री ओरडली.. ‘फोन कुठंय?’ विनोदने इशारा केला. टीव्हीसमोरच्या टेबलवर फोन ठेवलेला होता. ती रागात उठली आणि फोन उचलला. फोन बघून तिला धक्का बसला. तो फुटलेला होता. त्याच्या स्क्रीनचे तुकडे तुकडे झाले होते. गायत्रीला काही क्षण काय बोलावं, काहीच सुचेना. सोहम किचनमध्ये जाऊन पाणी प्यायला आणि परत आला. आईकडं बघितलं आणि बेडरूमकडं निघाला. पण, गायत्री जोरात ओरडली.. ‘फोन कुणी फोडला?’

खूप वेळ गायत्रीचा आरडाओरडा सुरू होता. पण, फोन कुणी फोडला ते सांगायला बापलेक तयार नव्हते. अधूनमधून दोघं एकमेकांकडं बघायचे. तेवढंच. गायत्रीचा संयम संपत चालला होता. पण, दोघं काहीच बोलायला तयार नव्हते. गायत्रीला हळूहळू लक्षात येऊ लागलं की, नेहमीप्रमाणे सोहम मोबाइलवर गेम खेळत असणार आणि विनोदचा राग अनावर झाला असणार. सोहमचं गेमचं वेड आजकाल खूपच वाढलं होतं. तिची आणि विनोदची यावर खूपदा चर्चाही झाली होती. पण, हळूहळू बदल होईल, या आशेवर त्यांनी आजवर त्याला रागवायचं टाळलं होतं. परवाचीच गोष्ट. विनोद सोहमवर ओरडायला सुरूवात करणारच होता, पण तेवढ्यात गायत्रीनेच त्याला अडवलं होतं. जरा पोरानं फोन घेतला की काय एवढं आभाळ कोसळलं? असं काहीतरी म्हणाली आणि ‘माझा लाडाचा घोडा’ म्हणत सोहमला मिठी मारली. ती कायम त्याला लाडाचा घोडा म्हणायची. विनोदने कसाबसा राग आवरला. पण, सोहम सारखाच फोन घेऊन बसायचा, हे काही बरोबर नव्हतं. तरी त्याचा राग म्हणून फोन फोडायचा? आपण दोन वर्षे पैसे जमा करून घेतलेला फोन असा आपटून त्याचे तुकडे तुकडे करायचे? गायत्री ओरडून ओरडून थकली. पण, दोघंही काही बोलायला तयार नव्हते. विनोद फक्त एवढंच म्हणत होता की, मी रिपेअर करून आणतो, फार खर्च येणार नाही. माझ्या ओळखीचा आहे एक जण, तो देईल करून.. वगैरे वगैरे. गायत्रीला हे उत्तर नकोच होतं. फोन फुटला कसा? ते कुणी सांगायला तयार नव्हतं. विनोदला तर ती काही करू शकत नव्हती. संतापून ती सोहम जवळ गेली. त्याचा कान पकडला आणि मोबाइल कसा फुटला? विचारू लागली. तरीही सोहम काही बोलत नव्हता. तिला जास्तच राग आला त्याच्या अशा वागण्याचा. गायत्रीने संतापून त्याच्या एक थोबाडीत ठेऊन दिली. तरी सोहम शांत. तो बोलणार तरी काय?

सोहम सारखा मोबाइल घ्यायचा तो काही गेम खेळण्यासाठी नाही. त्याला वडिलांच्या मोबाइलचा पासवर्ड माहीत होता. तो चोरून त्यांचं एका बाईसोबतचं चॅटिंग वाचत होता. चार-पाच दिवसांत त्याची खात्री झाली की, आपल्या वडिलांचं अफेअर चालू आहे एका बाईसोबत. ते बघून सोहमला खूप राग आला होता. आणि रागाच्या भरात त्याने फोन फोडून टाकला होता. आणि विनोदला धमकी दिली होती की, खबरदार, जर पुन्हा त्या बाईला एक जरी मेसेज पाठवला तर! विनोद खरं तर मोबाइल फोडला म्हणून सोहमला मारायला धावला होता. पण, हे ऐकून तो जागच्या जागीच उभा राहिला होता. थिजल्यासारखा. तेवढ्यात डोअर बेल वाजली होती. गायत्री आली होती. विनोदने फोन टेबलवर ठेवला होता. आता गायत्री सोहमला जोरजोरात थोबाडीत ठेऊन देत होती. सोहम खरं बोलायला तयार नव्हता. विनोदचीही खरं सांगायची हिंमत नव्हती. पण, मुलाला मार खाताना पाहून त्याला राहवलं नाही.

अचानक विनोद म्हणाला, ‘त्यात एका मुलीसोबत चॅटिंग होतं..’ गायत्रीने सोहमकडं पाहिलं. त्याला विचारलं, ‘तू मुलीसोबत चॅटिंग करत होतास?’ विनोद काही बोलणार, तेवढ्यात सोहम ‘हो’ म्हणाला. विनोद हैराण झाला. आता काय होणार? गायत्री अचानक हसायला लागली. विनोदला म्हणाली, ‘त्यात एवढं काय रागवायचं? वय आहे त्याचं.. आजकाल पोरं – पोरी मॉड झालेत. बोलतात बिनधास्त. म्हणून काय फोन फोडायचा..?’ विनोद आणि सोहम दोघेही हैराण होते. गायत्री विनोदला फोन दुरुस्त करून आणायला सांगून स्वयंपाकघरात गेली. विनोदने सोहमला मिठी मारली. त्याला म्हणाला, ‘खूप लागलं का रे..?’ सोहम म्हणाला, ‘तुमचे मेसेज खूप लागले मनाला. पुन्हा असं करू नका..’ तिकडं किचनमध्ये गायत्रीने शिरा करायला घेतला. आपला ‘लाडाचा घोडा’ प्रेमात पडलाय या आनंदात.. कुठला लाडाचा घोडा प्रेमात पडलाय, हे तिला माहीत नव्हतं.

(संपर्कः jarvindas30@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments