
पुढारी ऑनलाईन डेस्क : AUS vs WI ODI Series : ऑस्ट्रेलियाने कॅनबेरा येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा अवघ्या 6.5 षटकांत म्हणजेच 41 चेंडूंमध्ये पराभव केला. ऑस्ट्रेलियन मैदानावरील हा सर्वात लहान एकदिवसीय सामना ठरला आहे. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना विंडिजचा संघ 24.1 षटकांत अवघ्या 86 धावांवर ऑलआऊट झाला. त्यानंतर स्मिथच्या नेतृत्वाखालील कांगारू संघाने 8 गडी राखून लक्ष्य गाठले आणि कॅरेबियन संघाला मालिकेत 3-0 असा क्लिनस्वीप दिला. या मालिकेत कांगारू संघासाठी पदार्पण करणाऱ्या झेवियर बार्टलेटला (4/21) दोन सामन्यांमध्ये 8 विकेट्स घेतल्याबद्दल सामनावीर आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि विंडिजला दे धक्के देण्यास सुरुवात केली. डावाच्या तिसऱ्या षटकात सलामीवीर केजॉर्न ओटली 8 धावा काढून झेवियर बार्टलेटचा बळी ठरला. त्यानंतर किसी कार्टी 10 आणि कर्णधार शाई होप 4 धावा करून बाद झाले. 13व्या षटकात 44 धावसंख्या असताना कॅरेबियन संघाला चौथा धक्का बसला. टेडी बिशप खाते न उघडता तंबूत परतला. ॲलेक अथानाझेने काही काळ टिकण्याचा प्रयत्न केला पण त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. तो 60 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. त्यावेळी विंडिजची धावसंख्या 20 षटकात 71 होती.
विकेट्सची पडझड अशीच सुरू राहिली आणि उर्वरित फलंदाजांमध्ये फक्त रोस्टन चेस (12) दुहेरी आकडा गाठू शकला. उर्वरित फलंदाज केवळ मैदानावर हजेरी लावून गेले. परिणामी कॅरेबियन संघाचा डाव 24.1 षटकांत 86 धावांवर संपुष्टात आला. अशाप्रकारे वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेतील आपली दुसरी सर्वात कमी धावसंख्या केली. ऑस्ट्रेलियाकडून झेवियर बार्टलेटने चार, लान्स मॉरिस आणि ॲडम झाम्पाने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने स्फोटक सुरुवात केली. जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि जोश इंग्लिश या जोडीने चौथ्याच षटकात ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 50 च्या पुढे नेली. मॅकगर्कने आक्रमक खेळ करत झटपट धावा काढल्या. तो 18 चेंडूत 41 धावा करून अल्झारी जोसेफचा बळी ठरला. त्यानंतर आलेला ॲरॉन हार्डी काही विशेष करू शकला नाही आणि 2 धावांवर थॉमसच्या चेंडूवर बाद झाला. कर्णधार स्टीव्ह स्मिथने 3 चेंडूत नाबाद 6 धावा केल्या आणि सामना संपवला. इंग्लिश 16 चेंडूत 35 धावा करून नाबाद राहिला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने 259 चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला. जो चेंडूंच्या बाबतीतही त्यांचा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी त्यांनी 2004 मध्ये अमेरिकेविरुद्धचा सामना 253 चेंडू शिल्लक असताना जिंकला होता.
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील 7 वा सर्वात मोठा विजय
वनडे क्रिकेट्च्या इतिहासात चेंडू शिल्लक ठेवून सर्वात मोठा विजय मिळवण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडने 1979 मध्ये 277 चेंडू शिल्लक असताना कॅनडाचा पराभव केला होता. त्या सामन्यात इंग्लंडने 13.5 षटकात 46 धावांचे लक्ष्य गाठले. पण तो वनडे सामना 60 षटकांचा होता.
वनडेमध्ये सर्वात मोठे विजय (चेंडू शिल्लक असताना)
277 चेंडू राखून इंग्लंडचा विजय : विरुद्ध कॅनडा
274 चेंडू राखून श्रीलंकेचा विजय : विरुद्ध झिम्बाब्वे
272 चेंडू राखून श्रीलंकेचा विजय : विरुद्ध कॅनडा
268 चेंडू राखून नेपाळचा विजय : विरुद्ध अमेरिका
264 चेंडू राखून न्यूझीलंडचा विजय : विरुद्ध बांगलादेश
263 चेंडू राखून भारताचा विजय : विरुद्ध श्रीलंका
259 चेंडू राखून ऑस्ट्रेलियाचा विजय : विरुद्ध वेस्ट इंडिज
भारताच्या क्लबमध्ये ऑस्ट्रेलियाचा समावेश
ऑस्ट्रेलियाने आपल्या वनडे इतिहासातील 1000 वा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. यासह ऑस्ट्रेलिया 1000 एकदिवसीय सामने खेळणारा दुसरा संघ बनला आहे. या यादीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या 1055 एकदिवसीय सामन्यांमध्ये 559 सामने जिंकले आहेत. याशिवाय टीम इंडियाला 443 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. 9 सामने टाय झाले असून 44 सामन्यांचा निकाल लागलेला नाही. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 609 एकदिवसीय सामने जिंकले असून 348 गमावले आहेत. त्यांचे 9 सामने टाय झाले आहेत आणि 34 सामने निकाली लागलेले नाहीत. ऑस्ट्रेलिया हा एकदिवसीय इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा संघ आहे.







