
पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AFG T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताची सध्या धावसंख्या 10 षटकांत 4 बाद 61 झाली आहे.
भारताला तिसरा धक्का
21 धावांवर भारताला तिसरा धक्का बसला. अजमतुल्ला उमरझाईने शिवम दुबेला यष्टिरक्षक रहमानउल्ला गुरबाजकरवी झेलबाद केले. दुबेला एक धाव करता आली.
फरीद अहमदचा डबल धमाका
फरीद अहमदने तिस-या षटकात भारताला सलग दोन धक्के दिले. त्याने 2.3 व्या षटकात 18 धावांवर यशस्वी जैस्वाल (4) आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर विराट कोहलीला बाद केले.
रोहितचे खाते सातव्या चेंडूवर उघडले
या सामन्यात सात चेंडू खेळून रोहितने आपले खाते उघडले. अजमतुल्ला ओमरझाईच्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली. यापूर्वीच्या दोन्ही सामन्यात रोहितला एकही धाव काढता आली नव्हती. पहिल्या टी-20 मध्ये तो खाते न उघडता धावबाद झाला होता, तर दुसऱ्या टी-20 मध्ये तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.
पहिली धाव काढायला रोहितची धडपड
फरीद अहमदने पहिले षटक टाकले. यशस्वीने पहिल्याच चेंडूवर तीन धावा घेतल्या. यानंतर रोहितने पाच चेंडू खेळून काढले. मात्र त्याच्या बॅटमधून एकही धाव निघाली नाही. यादरम्यान, रोहितच्या पायावर चेंडू आदळून दोन चौकार मिळाले. या धावा अतिरिक्त मध्ये जोडल्या गेल्या.
भारतीय संघात तीन बदल
भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग 11 मध्ये तीन बदल केले आहेत. संजू सॅमसन, आवेश खान आणि कुलदीप यादव यांचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याचवेळी जितेश शर्मा, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांना विश्रांती देण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या प्लेइंग-11 मध्येही काही बदल करण्यात आले आहेत. नवीन उल हक, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी यांना प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले आहे.
सलग दोन सामने जिंकून टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा हा सामना जिंकून पाहुण्या अफगाणिस्तानला क्लिन स्विप देण्याचा जोरदार प्रयत्न करेल.
भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान.
अफगाणिस्तानचा संघ : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी, फरीद अहमद मलिक.








