Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्ररसिक स्पेशल: संमेलन अन् नाट्यभान

रसिक स्पेशल: संमेलन अन् नाट्यभान

रसिक स्पेशल: संमेलन अन् नाट्यभान

[ad_1]

डॉ. सतीश साळुंके12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलनाचा आरंभ काल ६ जानेवारीला पिंपरी – चिंचवड येथे झाला. जवळपास ११८ वर्षांपासून नाटक आणि रंगकर्माला बांधील राहून एखादी नाट्य संघटना सातत्याने कार्यरत असणे, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. परिषदेने शतक महोत्सवी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आपला पारंपरिक संमेलनाचा बाज बाजूला ठेवून हे शंभरावे संमेलन अधिकाधिक रंगकर्मीभिमुख कसे होईल, याचा गांभीर्याने विचार केल्याचे दिसत आहे. मराठी नाटकाची गंगोत्री जिथे सुरू झाली, त्या तंजावरला जाऊन तंजावरी मराठी नाटकांच्या संहितांचे पूजन करणे, हे अत्यंत आगळेवेगळे पाऊल म्हणता येईल. १६७६ ते १८५५ च्या कालखंडात लिहिल्या गेलेल्या बहुतांश तंजावरी नाटकांची लिपी ही तामिळ आहे. मात्र, त्यांचे वाचनरूप मराठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजेंच्या वंशातील शाहूराजे, प्रतापसिंहराजे आणि सरफोजीराजे यांनी ही नाटके लिहिली.

शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नाट्यकलेचा जागर करतानाच, नाटकाच्या विविध घटकांचे स्पर्धात्मक उपक्रम घेणे, वेगवेगळ्या ठिकाणी संमेलन भरवणे हेही एक वैशिष्ट्य म्हणायला हवे. त्यामुळे नाट्य संमेलन म्हणजे ‘मोजक्या सेलिब्रिटींचे बागडण्याचे ठिकाण’ हा मतप्रवाह दूर होऊ शकेल. १९०५ मध्ये ग. श्री. खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पहिले नाट्य संमेलन झाले. आता २०२४ मध्ये प्रख्यात दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली शंभरावे संमेलन होत आहे. मध्यंतरीच्या काळात काही कारणाने संमेलने झाली नाहीत.

शंभरव्या संमेलनाच्या निमित्ताने परिषदेच्या नाट्यकर्मावर दृष्टिक्षेप टाकला, तर संमेलन ‘सातत्य’ हे वैशिष्ट्य ठरते. या सातत्यात परिषदेच्या स्वतःच्या उपक्रमातून किंवा प्रयत्नांतून काही कलावंत घडले का? याचा अभ्यास करायला हवा. महाराष्ट्रभर कार्यरत असणाऱ्या असंख्य हौशी नाट्य संस्थांसाठी परिषदेने कोणते उपक्रम राबवले? एकूणच मराठी नाटकाची उंची वाढावी म्हणून परिषद कोणता विचार करते? यांसारख्या काही प्रश्नांची चिकित्सा होणे क्रमप्राप्त ठरते. मुळात परिषदेच्या कोणत्याही शाखांचे पदाधिकारी किंवा कलावंत हे स्वतंत्रपणे परिषदेचे नसतातच; तर ते त्या-त्या शहरातील विविध संस्थांचे कलावंत असतात आणि विशेष म्हणजे त्यात जे सक्रिय असतात, ते परिषदेच्या तुलनेत स्वतंत्र रंगव्यवहार करणे जास्त सोयीस्कर मानतात, असा अनुभव आहे. नाट्य परिषदेचा सदस्य असल्याने एखाद्या कलावंताच्या रंगमंचीय व्यक्तिमत्त्वावर काय परिणाम होतो? तसेच तो परिषदेचा सदस्य नसल्याने कोणता तोटा होतो, या प्रश्नांची उत्तरे या निमित्ताने मिळतील, असे कलावंतांना वाटणे साहजिक आहे.

शंभरावे नाट्य संमेलन साजरे करीत असताना, नाट्य परिषदेला तिचा पारंपरिक ढाचा बदलावा लागेल. परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणुका साखर कारखान्याच्या निवडणुकांप्रमाणे होतात, हे सर्वश्रुत आहे. त्याऐवजी राज्याच्या विविध भागातील प्रतिभावान रंगकर्मींना नियामक मंडळात नियुक्त करून त्यांच्या अनुभवाचा फायदा परिषदेला घेता येईल. त्यामुळे परिषदेची व्याप्ती मर्यादित न राहता ती सार्वजनिक होण्यास मदत होऊ शकते. गेल्या काही वर्षांपासून परिषद ही नाटक करणाऱ्यांच्या तुलनेत नाटकाचे राजकारण करण्याची संघटना जास्त होत आहे, असाही सूर राज्यभरातील कलावंतांमध्ये पसरलेला आहे.

ही प्रतिमा बदलणे हे परिषदेसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. परिषदेच्या अनेक शाखांचे पदाधिकारी हे त्या-त्या शहरातील राजकीय नेते किंवा कथित प्रतिष्ठित लोक असतात. कलावंतांना येथे दुय्यम स्थान दिले जात असल्याची भावना आहे. त्यामुळे ‘संमेलन ते संमेलन’ असे कामाचे स्वरूप बनलेल्या परिषदेने हे स्वरूप बदलून विविध स्तरांवर नाट्य शिबिरे, नाट्य लेखन कार्यशाळा, नाट्य निर्मिती प्रक्रिया, नाट्य अभिवाचन कार्यशाळांचे आयोजन करावे. शिवाय, शाखांना अर्थसाह्य केल्यास कलावंतांनाही परिषदेविषयी आपुलकी वाटू लागेल.

(संपर्क- salunkedrsatish@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments