Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रलोक-संचित: देवाची ती खूण...

लोक-संचित: देवाची ती खूण…

[ad_1]

प्रवीण दशरथ बांदेकर10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात सगळीकडेच गावाचं रक्षण करणाऱ्या देवता दिसतील. बऱ्याचदा गावाच्या सीमेवर उघड्यावरच या देवाचं वस्तीस्थान असतं. वर्षानुवर्षांपासून उन्हापावसात, थंडीवाऱ्यात उघड्यावर या राखणदार देवता उभ्या असतात. लोकमानसामध्ये त्यांना खूप श्रद्धेचं आणि विश्वासाचं स्थान असतं. पण, आपल्याकडून काही दुराचार झाला, नीतिमत्ता सोडून उन्मत्तपणे वागलो, तर त्यांचा कोप होऊ शकतो, ही भीतीही मनात असते.

स्वातंत्र्य मिठाच्या सत्याग्रहासाठी प्रसिद्ध असलेलं कोकणातलं शिरोडा गाव. तिथल्या आरवलीच्या वेतोबाचं – श्री देव वेताळाचं देवस्थान दक्षिण कोकणासह गोव्यातही प्रसिद्ध. सुप्रसिद्ध लेखक जयवंत दळवींचं हे गाव. दळवी म्हणायचे, माझा देवावर विश्वास नाही, पण मी वेतोबाला मानतो. त्यांच्या वडिलांना आणि खुद्द दळवींना स्वतःलाही वेतोबाचे काही अनुभव आले होते, असं त्यांनी सांगितलं आहे. वेतोबाच्या मंदिरातील समई तेल संपल्यानं विझली, तरी त्यांच्या वडिलांना घरात झोपलेले असतानाही ते जाणवायचं. लगेचच मग अगदी अपरात्रीही उठून ते देवळात जायचे, तेव्हा खरोखरच समई विझलेली दिसायची. एकदा विमान प्रवासात जयवंत दळवींनाही असाच अनुभव आला होता. अर्थात, या श्रद्धाभावामागे कोणतेही लॉजिक नाही. वैज्ञानिक आधार नाही. तरीही दळवींप्रमाणेच वेतोबाला मानणारे अनेक लोक या भागात आहेत.

वेतोबा माझ्या आजीच्या माहेरचा देव. उठता बसता तिच्याही तोंडात वेतोबाचं नाव असायचं. वेतोबा ही रक्षक देवता. त्याचा संचार सर्वत्र असतो. त्याला नवसादाखल चामड्याच्या भल्या मोठ्या वहाणा वाहण्याची प्रथा आहे. वेतोबाच्या या वहाणा सततच्या चालण्यामुळे झिजतात. अशा झिजलेल्या वहाणाही देवळात ठेवलेल्या दिसतात. कोकणात अनेक ठिकाणी अशी रक्षक देवतांची किंवा राखण्या देवांची देवळं दिसून येतील. त्यांच्या पायात जाडजूड वहाणा असतात, तशीच हातात भलीमोठी काठी असते. काठीच्या एका टोकाला घुंगरं असतात. रात्री सगळीकडे सामसूम झालं की हा राखणा देव संचारासाठी बाहेर पडतो. त्याच्या वहाणा चर्र चर्र वाजतात आणि काठीच्या घुंगरांचाही आवाज घुमत राहतो. पण, तो सगळ्यांनाच ऐकू येईल असं नाही. काही ठराविक लोकांनाच तो आवाज ऐकू येतो. हा आवाज कानी आलेला माणूस मग देहभान विसरतो, आवाजाच्या नादानं भरकटत कुठच्या कुठे जातो. पार धानाधिस्पट होऊन जाते त्यांच्या आयुष्याची. ‘धानाधिस्पट’ हा खास आजीच्या तोंडचा कोकणी बोलीतला शब्द. त्याचा अर्थ वाताहत होणे, पुरता सत्यानाश होणे, आयुष्यातून उठणे.

आजीच्या या बोलण्यामागेही तसंच कारण होतं. झालेलं असं की, माझ्या वडिलांची थोरली बहीण – आमची आक्का आत्या – पंधराव्या-सोळाव्या वर्षीच बालविधवा होऊन माहेरी परतलेली. तिच्या नवऱ्याला नदीत पोहायचं वेड होतं. पावसाळी दिवसांत नदीला पूर आलेला असताना वाहून जाणारं वासरू वाचवायला म्हणून तिच्या नवऱ्यानं नदीत उडी घेतलेली. पण, फुफांडत वाहत्या नदीनं त्याला पोटात घेतलं. चार – पाच दिवसांनी पूर ओसरल्यावर कुठं तरी रुमडाच्या झाडाच्या मुळ्यांना अडकलेला त्याचा मृतदेह सापडला. आजी म्हणायची.. ‘वासराचं फक्त निमित्त. त्येका राखण्यानंच बोलावून घेतल्यान्. त्येच्या काठीच्या घुंगराचो नाद ह्येच्या कानांवर इलो आणि पिसावल्यासारखी ह्येना भरल्या नदीत उडी घातल्यान्. हेरशी इतको पट्टीचो पेवणारो बापयो, असल्या हवुरात त्येका काय जातलां व्हतां..?’ ज्या वेतोबावर आजीची इतकी नितांत श्रद्धा, त्यानेच तिच्या लेकीचा संसार उद्ध्वस्त का करावा? आजीला असं विचारल्यावर ती तुकोबांचा हवाला देत सांगायची.. देवाची ती खूण, जेच्या घरात रिघलो, तेच्या संसारावर शिरा पडाकच व्हयी रे… राखण्या देवाच्या कोपाच्या, संकटकाळी धावून येऊन मदत केल्याच्या, घुंगराच्या काठीच्या नादानं आयुष्याला चूड लावून भरकटत गेल्याच्या अशा सांगोवांगीच्या गोष्टीही आमच्याकडे भरपूर प्रचलित आहेत.

खरं तर, महाराष्ट्रात सगळीकडेच गावाचं रक्षण करणाऱ्या अशा देवता दिसतील. बऱ्याचदा गावाच्या सीमेवर उघड्यावरच या देवाचं वस्तीस्थान असतं. वर्षानुवर्षांपासून उन्हापावसात, थंडीवाऱ्यात उघड्यावर या राखणदार देवता उभ्या असतात. नावं वेगवेगळी असतील, पण काम सारखंच. लोकमानसामध्ये त्यांना खूप श्रद्धेचं आणि विश्वासाचं स्थान असतं. आपल्या प्रत्येक अडीअडचणीला हे म्हसोबा, बिरोबा, वेतोबा, सातेरी, सटवाई, भूतनाथच मदतीला धावून येणार, संकटहरण करणार, तारून नेणार याविषयी तिथल्या लोकांच्या मनात जराही शंका नसते. पण, आपल्याकडून काही चूक झाली, दुराचार झाला, नीतिमत्ता सोडून उन्मत्तपणे वागलो, तर त्यांचा कोप होऊ शकतो, ही भीतीही मनात असते. अलीकडे मंदिर संस्कृती वाढीला लागल्यापासून आणि लोकांकडेही जरा बऱ्यापैकी पैसे खुळखुळायला लागल्यापासून कुठल्या ना कुठल्या देवांची मंदिरं बांधायचं खूळ सगळीकडेच बोकाळलं आहे. त्यामुळे वेशीवेशींवर काल-परवापर्यंत उघड्यावर वावरणाऱ्या किंवा एखाद्या बारक्याशा घुमटीत वसलेल्या या देवतांचीही भलीमोठी देवळं उभी राहू लागली आहेत. देवळापाठोपाठ उत्सव, जत्रा, सगळंच धूमधडाक्यात साजरं होऊ लागलंय.

गावापुरतेच मर्यादित असलेले हे रक्षक देव आता काळाच्या रेट्यामुळे ग्लोबल बनू लागले आहेत. असंही दिसू लागलंय की, गावागावांतले पिढ्यान् पिढ्यांपासून आपल्या जगण्याशी एकरूप होऊन गेलेले देव बाजूला सारले जाऊन भलतेच कुणी तरी श्रीमंत आणि आक्रमक रूपागुणांचे देव आजकाल आपल्यावर थोपवले जाऊ लागलेत. लहानपणापासून आपल्या परिचयाच्या असलेल्या मारुती, श्रीराम, श्रीकृष्ण या देवांचं मायाळू, गोजिरं, शांत, प्रसन्न आणि आत्यंतिक निरागस रूप आपल्या नजरेसमोरून हटवलं जाऊन त्यांचंही अत्यंत उग्र, करारी, प्रसंगी हिंसक म्हणता येईल, असं रूप आपल्यासमोर सातत्यानं आणलं जाऊ लागलंय. जणू आमच्या आज्या-पणज्यांच्या वेळचे देव आता आउटडेटेड झाले आहेत. आधुनिक काळातील माणसांच्या संकटांचं हरण करण्याच्या बाबतीत ते कुचकामी ठरू लागलेत. नव्या जगण्याचे प्रश्नच मुळी त्यांना कळू शकत नाहीत. त्यांचं ते शांत, प्रसन्न नजरेनं सर्वांकडे पाहणंच त्यांना कालबाह्य बनवत आहे. आजकालच्या दिवसांत त्यांना असं निरागस राहून भक्तांचं कल्याण करता येत नसावं. त्यासाठी कमावलेल्या शरीरानं, धास्ती वाटेल अशा नजरेनंच सगळ्यांकडं पाहणं गरजेचं झालं असावं कदाचित. असे पिळदार देहाचे, उरात धडकी भरवणाऱ्या नजरेचे आधुनिक देवच आजच्या भक्तांचे प्रश्न नेमकेपणाने समजून घेऊन, त्यांचा चुटकीसरशी निपटारा करू शकत असावेत. साहजिकच, या नव्या राखण्या देवांच्या हातात घुंगुरकाठी असण्याची गरज नाही की त्यांना गावभर फिरून जागून पहारा देण्याचीही आवश्यकता उरलेली नाही. आता आधीच्यांसारख्या दंतकथा, लोकांच्या सांगोवांगीच्या गोष्टी, काठीच्या आवाजाच्या नादानं भरकटत जाऊन आयुष्य बरबाद करून घेणं असल्या कशाचीच गरज उरलेली नाही. नव्या काळातील समाजमाध्यमं पुरेशी आहेत त्यांचा गवगवा करायला, भक्तांना त्यांचं माहात्म्य पटवून द्यायला.

भक्तांच्या रक्षणाची अहोरात्र चिंता वाहणारे असे नवे राखणदार गावोगावी जन्माला आले आहेत. त्यामुळे आमच्या तुकोबांनी कितीही कानीकपाळी ओरडून सांगितलं की… नाहीं देवापाशीं मोक्षाचे गांठोळें, आणूनि निराळें द्यावें हातीं। इंद्रियांचा जय साधुनिया मन, निर्विषय कारण असे तेथे।। तरीही कुणीही त्यांचं आज ऐकण्याच्या मनःस्थितीत राहिलेले नाहीत. उलट लोक आज तुकारामबुवांना ऐकवतील, तुमचा काळ वेगळा होता महाराज, तेव्हाचे देवही तुमच्यासारखेच गरीब होते. त्यांच्यापाशी भक्तांना द्यायला मोक्षाचं गाठोड नव्हतं. त्यामुळेच इंद्रिये काबूत राखून मनावर, वासनांवर जय मिळवायला तुम्हाला आणि तुमच्या देवालाही भक्तांना सांगावं लागत होतं. आज तुमचं ते मोक्षाचं गाठोडं तरी हवंय कुणाला? गेली त्याची जाण, तोचि ब्रह्म झाला। अंतरी निवाला, पूर्णपणे। किंवा देवाची ती खूण, आला ज्याच्या दारा। त्याच्या पडे चिरा, मनुष्यपणा… हे शब्द किती निरर्थक होऊन गेलेत या नव्या काळात, महाराज!
(संपर्क-samwadpravin@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments