हेमकिरण पत्की2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आपल्याला प्रेमाचा लाभ झालेला असतो, होत असतो. आपला जीव कुणा जीवात गुंतलेला असतो, गुंतत असतो. आजोबा-आजी, आई-बाबा, बहीण-भाऊ, नवरा-बायको किंवा मित्र-मैत्रिणी यांतल्या कुठल्या न कुठल्या नात्याचं प्रेम आपल्याला लाभलेलं असतं. या प्रेमलाभातून प्रेम करण्यासाठीची मन:स्थिती आपण जाणून घेत असतो का? प्रेमासाठी पात्र असण्याची स्थिती आपल्याला कधी जाणवते का? प्रेमाचा लाभ दैवी असतो की सुकृताचा परिणाम असतो? याविषयी आपण कधी चिंतन करतो का? माणसांच्या जगातलं खरं प्रेम आपल्या हृदयाला कळालं, तर अज्ञाताविषयी आपल्याला ओढ वाटेल. देव, भक्ती आणि अध्यात्म हे आपल्यासाठी नुसते बोलायचे विषय असणार नाहीत, तर ती आपल्या चित्ताची प्रेमस्थिती होऊन राहील. कबीरांची चित्तस्थिती परमप्रेमावेगळी नाहीच. त्यामुळं त्यांच्या चित्तात प्रभूप्रेमाचे भावतरंग उठतात. तरंगांना सहजच शब्दरूप प्राप्त होते… समझ देख मन मीत पियरवा, आसिक होकर सोना क्या रे। आपला जीव कुणावर जडतो तेव्हा आपल्या मनाची स्थिती कशी असते? घर खायला उठतं. काळ पुढं सरकत नाही. अन्नाचा घास घशाखाली उतरत नाही. जीव जडलेल्या माणसाशिवाय अन्य कशात रस वाटत नाही. अंथरुणावर पाठ टेकवली, तरी डोळ्यांत झोप कशी ती उतरत नाही. ही तर माणसांच्या जगातल्या दोन प्रेमी जीवांची स्थिती असते. या प्रेमाच्या अनुभवानं दोन्ही जीव शांतपणे झोपू शकत नाहीत. या प्रेमातही दुसऱ्याच्या विचारानं मन हळुवार होतं. त्याची काळजी वाहण्यानं भरून येतं. भेटीची आस तीव्र होते. विरहानं काळीज आर्त होतं. मग ‘त्या’ पियरव्याच्या आठवणींची व्याकुळता शब्दांतून कशी व्यक्त व्हावी? कबीर म्हणतात, त्या पियरव्यावर तर जीव जडलाय, केवळ त्याच्याशीच काळीज जोडलं गेलंय, त्याच्यावरच प्रेम, त्याचाच विरह आणि केवळ त्याचीच वाट पाहणं आहे. हे वाट पाहणंही किती तरल मनाचं! साधी हवेची झुळूक अंगाला बिलगली, तरी त्याचीच चाहूल मनात असते. झाडाचं एखादं पान देठातून गळून पडलं, तरी त्याच्याच पावलांचा स्वर कानांत प्रवेशतो. एवढंच नाही, तर दूर आकाशात ढग गरजला, तरी ती पियरव्याची हाक ऐकू येते. एकच गोष्ट श्वासांच्या लयीत असते की ‘तो’ कधी येईल? कबीरांचा ‘पियरवा’ हा असा उत्कट प्रेमाच्या वाटेवरून भेटत राहतो. पियरव्याच्या प्रेमाचा लाभ झालेलं कबीरांचं काळीज अमृतघन होतं… पाया हो तो दे ले प्यारे, पाय पाय फिर खोना क्या रे। त्या परमप्रेमाचा लाभ झाल्यावर काळीज अमृतघन होतंच. कबीर म्हणतात, ही न मिळणारी वस्तू प्रेमसाधनेतून हाती पडल्यावर ती केवळ आपल्यापाशीच कशाला ठेवायची? साऱ्या वंचितांना तिचा लाभ घडवून द्यायचा. प्रेमाचा लाभ जड वस्तूच्या लाभासारखा थोडाच असतो? या लाभानं जीव मनापलीकडं जाऊन काळजाच्या मोकळ्या प्रदेशात पोहचतो. तिथलं अवकाश बंदिस्त नसतं. अंधारलेलं नसतं. विशिष्ट नसतं. साऱ्या जीवांच्या अपार करुणेनं भारलेलं असतं. म्हणून परमप्रेमाचा लाभार्थी प्रेम वाटत राहतो. हे त्याचं वाटणं म्हणजे पुन्हा पियरव्याकडं परतणंच असतं. जसं जलाशयातल्या पाण्याची वाफ होते, ती आकाशात पोहचते, त्या वाफेचे ढग होतात आणि अनुकूल वायूभेटीनंतर बरसतात. अगदी तसंच हे प्रेम वर्तुळाकार असतं. देता – देता घेणारं, घेता – घेता देणारं. कबीर म्हणतात… जब अंखियन में नींद घनेरी, तकिया और बिछोना क्या रे। या दोह्याच्या शब्दांतून कबीर सांगताहेत की, जेव्हा प्रेम अनन्यनिष्ठेतून जन्मलेलं असतं, शुद्ध भावाचं असतं, तेव्हा ते नुसत्या उपचारांनी बांधलेलं नसतं. ते व्यक्त करण्यासाठी काळजाबाहेरच्या कुठल्याही साधनांचा आधार घ्यावा लागत नाही. भक्तीसाठी सुरूवातीला पूजा, प्रार्थना यांसारख्या कर्मांचा आधार लागतो. पण, पियरव्यावरील प्रेम खरं नि उत्कट झाल्यावर कशाला साधनांचं अवलंबन? अगदी तसंच झोपेनं घेरल्यावर अंथरूण – पांघरूणाची कसली काळजी? झोपेचं ठिकाण महाल आहे की झोपडी याची कसली चिंता? यांतून कबीर सुचवताहेत की, जेव्हा प्रेम चेतनेच्या उच्च स्तरावरचं म्हणजे देहापलीकडचं असतं, तेव्हा शब्द – नि:शब्दातून व्यक्त होणाऱ्या विधींचं, उपचारांचं काहीही महत्त्व नसतं. आता उपचारांच्या शब्दांखाली दडून राहिलेल्या, रीतिरिवाजांमध्ये अडकलेल्या आणि साधनांचं अवडंबर माजवून परमप्रेमाला वंचित झालेल्या आपल्या मनांसाठी कबीरांचा हा प्रेम संदेश खूप मोलाचा आहे.
(संपर्क-hemkiranpatki@gmail.com)






