- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Rasik Special Artical Write By Dnyaneshwar Rakshak On Real Diwali
ज्ञानेश्वर रक्षक9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सणाच्या नावावर केवळ अतिउत्साह दाखवणाऱ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून बोध दिला आहे. एक दिवस सकाळी उठून अभ्यंगस्नान करणे म्हणजे दिवाळी नाही, दिखाऊ स्नेहभाव जपणे म्हणजे दिवाळी नाही, अशा दिखाऊपणामुळे तुमच्या आयुष्यात अवदशा निर्माण होईल. त्यामुळे रोजच्या दिनक्रमामध्ये दिवाळी जगा, म्हणजे या जगण्याचा खरा आनंद कळेल, असे राष्ट्रसंतांनी सांगितले आहे.
भारतीय संस्कृतीचे मूळ कृषी संस्कृतीमध्ये आहे. आज आपण प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहतो. भारतीय संस्कृती ही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक संस्कृतीचा सुंदर मिलाफ आहे. मुळातच भारतीय जनमानस उत्सवप्रिय आहे. पाश्चात्य संस्कृतीमध्ये महापुरुषांची जयंती आणि निर्वाणदिन सार्वजनिक उत्सव – सण म्हणून साजरे करतात. भारतीय संस्कृतीत येणारे सण – उत्सव हे ऋतु संक्रमणाच्या मध्यावर येतात. ऋतु परिवर्तनातून होणारे नैसर्गिक बदल, त्यांचे मानवी आरोग्यावर, परिणामी जीवनावर होणारे परिणाम याविषयीची जाणीव आणि सजगता अशा सण – उत्सवांच्या, तर कधी व्रतांच्या माध्यमातून जनमनात रूजवण्याचा प्रयत्न आपल्या परंपरेने केला आहे.
स्वच्छतेतून आरोग्याचा संदेश
दिवाळी हा त्या दृष्टीने भारतीय जनजीवनातील अत्यंत महत्त्वाचा उत्सव. पावसाळा संपलेला असतो. या काळात सर्वदूर घाण पसरते. वातावरणातील कीडे, मुंग्या, विविध जीवजंतू मोठ्या प्रमाणात आपल्या घरात, परिसरात आश्रयाला असतात. दमट वातावरणामुळे घरांमध्ये कोळिष्टके तयार होतात. कितीही स्वच्छता करा, हे जाळे पुन्हा तयार होते. अशा स्थितीत दिवाळी स्वच्छतेचा संदेश घेऊन येते. मानवी आरोग्यासाठी निसर्गाने धाडलेला हा सांगावा असतो. आपण सारे घर आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ करतो. कचरा, धूळ, जाळ्याजळमटे दूर होतात. अवतीभवती फुलझाडे बहरतात. परसबाग फुलते. पूर्वीच्या काळी चुन्याने, शेणा – मातीने घर सारवण्यामागे घर निर्जंतुक करण्याचे विज्ञान होते. आजही अनेक ठिकाणी, विशेषत: ग्रामीण आणि निमशहरी भागात स्त्रिया घराभोवतालचा परिसर स्वच्छ करून, अंगणात शेणाचा सडा टाकून सुंदर रांगोळ्या काढतात. जीवजंतूंचा संसर्ग टाळून आरोग्य जपण्यासोबतच, मन प्रसन्न करण्याचा आणि निसर्गातील बदलाचा आनंद घेण्याचा भाव यामागे असतो. दीपोत्सव अंध:काराचा नाश करीत संपूर्ण परिसर लख्ख करतो, आपल्या मनाला आनंद अन् उत्साहाचे दान देतो.
शेती – निसर्गाविषयीची कृतज्ञता
शेतीत निर्माण होणारे धान्य किंवा शेतमाल हे शेतकऱ्याचे वर्षभराच्या उदरनिर्वाहाचे साधन. दिवाळीतील लक्ष्मीपूजनातून त्या शेतीविषयीचा आणि निसर्गाप्रतिचा कृतज्ञभाव व्यक्त होतो. आपण लक्ष्मीच्या प्रतिमेसोबत पैसे, सोनेनाणे, दागदागिने अशा स्वरुपातील धनाचे पूजन करतो. पण, आजही बहुसंख्य शेतकरी कापसाची बोंडे, तुरीच्या शेंगा, धानाच्या ओंब्या आदी शेतीत येणारे उत्पादन पुजेत ठेऊन निसर्गातील लक्ष्मीची आराधना करतात. चित्रकार, कुंभार बांधवांच्या उदरनिर्वाहाला मदत व्हावी म्हणून पुजेतील लक्ष्मीच्या कागदी प्रतिमा तसेच मातीच्या लक्ष्मीमूर्तीच्या प्रतिकांना परंपरेने स्वीकारले. त्यामुळे आपण साऱ्यांनीच कृषी संस्कृतीचे जतन म्हणून धनासोबत धान्याला, शेतीतील उत्पादनाला लक्ष्मी मानून पुजेचा मान दिला पाहिजे. असे झाले तर पुढची पिढीही कृषी संस्कृतीविषयी आदर बाळगेल. अन्नधान्याविषयी आणि अन्नदात्याविषयी कृतज्ञता ठेवण्याचे संस्कार त्यांच्यावर होतील.
स्नेह – प्रेम जपण्याचा सण
दिवाळीहा आनंद – प्रेम – स्नेह जपण्याचा सण आहे. आजकाल अत्यंत व्यग्र अशा जीवनशैलीमुळे एकमेकांच्या भेटी कमी झाल्या आहेत. ग्रामीण संस्कृतीमध्ये सासरी गेलेल्या मुली दिवाळसणाला माहेरी यायच्या. गावातील सगळे लोक जाती – धर्मापलीकडे जात गावची मुलगी म्हणून, गावचा जावई म्हणून त्यांचा मानपान करायचे. मुलीला घरोघर बोलावून चोळी- बांगडी केली जायची. अनेकदा गरिबीमुळे मायबाप आपल्या लेक-जावयाचा पाहुणचार करु शकत नसत. अशावेळी गाव एकत्र यायचे आणि आपले कर्तव्य म्हणून त्यांचा पाहुणचार करायचे. अलीकडे पैशाच्या श्रीमंतीचा, भौतिक सुखाचा दिखावा करण्याचे दिवस आले आहेत. अशा लोकांना गरिबांचे अश्रू दिसत नाहीत. कालचा स्नेहभाव आज जवळपास संपल्यात जमा आहे. आता गरीब, गरजूंविषयी प्रेम दाखवण्याचे सोहळे होतात अन् ते माध्यमांतून, समाजमाध्यमांतून चर्चेचे विषय होतात.
कालच्या कृषी संस्कृतीतील श्रीमंती गोधनावर, दही- दुभत्यावर ठरवली जायची. आता ज्यांना शेणाचा पोयटा काढता येत नाही, तेही गायीचे, तिच्या जतनाचे महत्त्व सांगतात. खरे तर दिवाळी हा, गाय – गोधनाचे संगोपन करीत, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा, ते आपल्यासोबत असण्याचा आनंद व्यक्त करण्याचाही सण आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेच्या २३ व्या अध्यायात दिवाळीविषयी लिहितात…
दिवाळीचा सण आला। सर्वांनीच पाहिजे केला।
परि पाहवा कोण राहिला। भुकेला घरी ॥४५॥
गावी ज्याने लक्ष्मी नांदे। लोक जगतील आनंदे।
ऐशा प्रयत्नांनीच साधे। खरी दिवाळी ॥५६॥
बारा महिन्यांनी दिवाळी आली। घरेदारे स्वच्छ झाली।
भिंत-ओसरी सारवोनि ठेविली। रंगरंगोटी लावोनि॥५७॥
ऐसी करिता दसरा, दिवाळी। अवदशाचि येई कपाळी।
त्यापेक्षा रोज सकाळी। उठणे हाचि दिवाळसण ॥५९॥
सणाच्या नावावर केवळ अतिउत्साह दाखवणाऱ्यांना राष्ट्रसंतांनी इथे चपराक लगावली आहे. एक दिवस सकाळी उठून अभ्यंगस्नान करणे म्हणजे दिवाळी नाही, दिखाऊ स्नेहभाव जपणे म्हणजे दिवाळी नाही, अशा दिखाऊपणामुळे तुमच्या आयुष्यात अवदशा निर्माण होईल. त्यामुळे रोजच्या दिनक्रमामध्ये दिवाळी जगा, म्हणजे या जगण्याचा खरा आनंद कळेल, असे राष्ट्रसंतांनी सांगितले आहे. एके ठिकाणी ते लिहितात…
‘माझ्या मते तर दिवाळीची सध्या केली जाणारी व्याख्याच चुकीची आहे. दिवाळीचे तीनही दिवस काही संकेतांनी सुरू करण्यात आले आहेत, असे मी समजतो. ग्रामसफाई, शरीरस्वच्छता, बंधु-भगिनींच्या प्रेमाच्या नात्याचा प्रचार, संपत्तीत पावित्र्याचे रक्षण, गोधन – प्रदर्शन इत्यादी गोष्टींचे महत्त्वाचे भाग दिवाळीत एकत्र आणलेले दिसून येतात. रोजच्या जीवनातील शिळेपणा घालवून प्रत्येक सणावाराच्या निमित्ताने ग्रामशुद्धी, शरीरशुद्धी, धनशुद्धी, भावनाशुद्धी आणि रूढीशुद्धी करावयाची असते.
याशिवाय देशशुद्धीही होऊ शकत नाही.’ त्यापुढे राष्ट्रसंत लिहितात… ‘हे सरळपणे सांगून लोकांना पटत नसल्याने, त्याला पाप-पुण्याचे नाव ठेवून आणि कथानकाच्या रूपाने परिणाम दाखवणारे बौद्धिक देऊन, ते लोकांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न धर्म प्रचारकांनी केलेला आहे. धर्माच्या नावाने ते संस्कार लोकांत रूढ करून टाकले आहेत. पण, जनतेने ते सर्व आज झुगारून देऊन, सण म्हणजे खाण्यापिण्याची चैन व इतर चांगल्या गोष्टी म्हणजे माणसामाणसी पार पाडावयाचे दंडक आहेत, अशी खास समजूत करून घेतली आहे. ही भ्रामक समजूत काढून टाकून प्रत्येक सणाचे मानवी जीवनाची उपयोगिता, महत्त्व शाळा – कॉलेजांतून व घराघरातून कळवले जाणे आवश्यक आहे.’
सण – उत्सव कुठल्याही धर्म, पंथ, संप्रदायाचे असोत; त्या पाठीमागे मानव कल्याणाचा विचार असतो. तो मानवी जीवनातील आनंद शोधण्याचा मार्ग असतो, हे ओळखून आपण सारे ही दिवाळी ज्ञानाचा दीपोत्सव म्हणून साजरी करूया!
(संपर्क – drakshak@gmail.com)




