समकाल: दु:खाचा अंकुश असो सदा मनावर

0
18
समकाल: दु:खाचा अंकुश असो सदा मनावर


  • Marathi News
  • Opinion
  • May The Curb Of Sorrow Always Be On The Mind | Divya Marathi Special Supplement Samkal Sadar By Mahendra Kadam

महेंद्र कदम10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

माणूस हा समाजशील प्राणी असल्याने सगळ्या प्रकारची ऐश्वर्यसंपन्नता आली, तरी तो प्रेमाचा, सहवासाचा भुकेला असतो. परवा एका मित्राशी बोलताना तो सांगत होता की, माणसं आपल्या बाहेर बघायला तयार नाहीत. जरा मनाविरूद्ध घडलं की थेट काडीमोड घेवून रिकामी होतात. त्यांच्या मागच्या पिढीचा ती जराही विचार करत नाहीत. त्यांना विचार करायला वेळही नाही. रोजचं जगणंच इतकं महाग झालं आहे की, तो फार पुढचा आणि माणुसकीचा विचार करत नाही. ही विचाराची पद्धत वेगानं बदलत आली आहे. तिचा वेग इतका मोठा आहे की, त्याला दु:ख करायलाही वेळ नाही.

भालचंद्र नेमाडे म्हणाले होते, गरीब माणसं आपलं दारिद्र्य लपवण्यासाठी माणुसकी अंथरत जातात. आता ते माणुसकीचं अंथरूण गरीबाच्या झोपडीतूनही कधीच गायब झालं आहे. जो तो आपल्या विश्वात रमून गेला आहे. दु:खावर फुंकर घालायला कुणी तरी असावा लागतो. ही जी तगमग आहे, ती त्याला बोलून दाखवता येत नाही. खरं तर माणूस दु:खात जरा जाग्यावर येतो. म्हणून तर ते लिहितात..

दु:खाचा अंकुश असो सदा मनावर

हालाहल पचवल्याबद्दल माथ्यावर चंद्र असो,

चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजार बोटं असोत,

लक्षात राहात नाहीत बिचारी….

माणसं दु:ख सहन करेनाशी झाली आहेत. ते दु:ख आतून फुटलं की, बिचारी आपला प्रवास आटपून घेतात आणि पैलतीराला लागतात. कितीतरी लहान, तरूण पोरं हृदयविकारानं आपला जीव गमावू लागलीत. त्यांच्या दु:खावर कोणी मायेची सावली धरायला तयार नाही. ती एकटी पडतात. त्यांच्या मनात – मेंदूत चाललेल्या लोच्याचं कुणालाच काही कळत नाही. कळतं तेव्हा त्यांचा इथला प्रवास संपलेला असतो. दु:खाचा अंकुश माणसाला माणसात ठेवत असतो, पण तेही त्याला कळेनासं झालं आहे. एकमेकांशी बोलल्यानं अवघड वाट सुद्धा हलकी होते. दु:ख पेलण्याची ताकद मिळते. पण, आपण तो संवाद हरवून बसलो आहोत.

या संवादाच्या अभावाने माणसं एकमेकांपासून कोसो मैल दूर गेली आहेत. त्यामुळं अलीकडच्या काळात मुलींमध्येही व्यसनाचे प्रमाण खूप वाढत चाललं आहे. याचं कारण आपण आपल्या मेंदूतून नात्यांचं सॉफ्टवेअर काढून टाकलं आहे. नाती म्हणजे आता अडगळ वाटू लागली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपली जीवनयात्रा संपवली, तर परवा राजन खान यांच्या मुलाने वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी आपला आयुष्यपट गुंडाळून घेतला. गावांकडे लग्न होत नाही म्हणून शेतकऱ्यांची तरुण पोरं आत्महत्या करू लागलीत. अशी शेकडो उदाहरणं आपल्या भोवती घडत आहेत. त्यांना जगण्याची उमेद देण्यात आपण समाज म्हणून कमी पडत आहोत.

अवतीभवती कुणी मनसोक्त गप्पा मारताना दिसत नाही. भिंतीवर तीन रेषा मारून गल्लीच्या कोपऱ्यात डाव मांडून, खिडक्यांच्या काचा फोडणारी क्रिकेट गँग दिसत नाही. भर उन्हाळ्यात विहिरी शोधत पोहायला जाणारी पोरं दिसत नाहीत. चार मित्र एकत्र आले, तरी दोन – पाच मिनिटांत कुणाचा तरी मोबाइल वाजतो. गप्पा बंद पडून जातात. त्याचं कुणालाही काही वाटत नाही. मोबाइल बंद करून गप्पा माराव्यात, असं आता कुणालाही वाटत नाही. असं का झालं आहे?

हिंदीत एक गाणं आहे… होठों से छू लो तुम.. मेरी प्रीत अमर कर दो… त्या गाण्यातला नायक आपल्या मैत्रिणीला विनंती करतो आहे की, आयुष्यभर मी हरत आलो आहे. जे जे मला आवडले, ते इतरांनी बळकावले. किमान आता.. तुम हार के दिल अपना, मेरी जीत अमर कर दो.. असे आर्जव तो करतो. ती आर्जवाची अलवारता कुठेच दिसायला तयार नाही. प्रत्येकाला जिंकायचं आहे. कुणालाच मागं राहायचं नाही. सभोवती सगळं असंच चालू आहे का? तर त्याचं उत्तर केवळ नकारार्थी नाही. सभोवती मनस्वी संवेदनशील माणसांचा माहोल आहे. ती जीवापाड प्रेम करून माणसांना धरून ठेवू पाहतात. पण, त्यांच्या या तरल दवबिंदूसारख्या हेतूंना व्यवहारी जगातली माणसं कमकुवतपणाचा, स्वार्थाचा, जगरहाटी कळत नसल्याचा शिक्का मारून त्यांनाच वेड्यात काढतात. दुसऱ्याच्या दु:खांनी समूळ हेलावून जाणाऱ्या अशा माणसांना हजारो बोटं असतात. ती बोटं जपण्याचा काळ गेला असला, तरी त्यांच्यामुळं माणुसकीचा माहोल टिकून आहे. त्या माणसांच्या बोटांसाठी आपण आपली ओंजळ मोठी करायला हवी.

(संपर्क- mahendrakadam27@gmail.com)



Source link