- Marathi News
- Opinion
- Author Dr Satish Salunke On Divya Marathi Rasik Special Over Marathi Theater Drama
डॉ. सतीश साळुंके3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आपण सगळेच तसे औपचारिकताजीवी माणसं असतो. त्यामुळं रंगभूमी दिनाची औपचारिकताही रांगोळ्या काढून, नटराजाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि टाळीबाज भाषणं ठोकून साजरी होईल. पण, नटराजाच्या प्रतिमेला वंदन करताना, नटराजाने पायाखाली दाबलेल्या आणि अपप्रवृत्तीचे प्रतीक असलेल्या असुराकडेही लक्ष जायला हवं.. त्याचे प्रकटीकरण रंगभूमीवर झाले, तर किती बरे होईल ! आजच्या मराठी रंगभूमी दिनानिमित्त नाट्य क्षेत्राकडून असलेल्या अपेक्षा आणि वास्तव यांचा घेतलेला वेध…
मानवाचा ‘माणूस’ म्हणूनचा उत्क्रांतीचा इतिहास आणि ललित कलांचा विकास या घटना सोबतच घडलेल्या असाव्यात. पशुमानवाचं मानव म्हणून आणि मानवाचं नागरिक म्हणून झालेल्या परिवर्तनात कलांचा वाटा मोठा आहे. विविध ललित कलांविषयी मानवी शोधवृत्ती ही त्याच्या माणूस म्हणून पूर्णत्वाला जाण्याच्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाची सांस्कृतिक प्रगती आहे. अन्न ही त्याची मूलभूत गरज होतीच, पण सुरक्षितता हीदेखील त्याची महत्त्वाची गरज ठरायला लागली. मग तो गुहेत राहू लागला. मात्र, त्यानंतर त्याला महत्त्वाची वाटायला लागली ती मानसिक गरज आणि ती होती मनोरंजनाची. हा त्याच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचा महत्त्वाचा टप्पा होता. त्याने गायला सुरुवात केली, सभोवतालच्या पर्यावरणातून वाद्ये संशोधित केली. त्यात ताल शोधला. तालासोबत नृत्य आले.
या हजारो वर्षांच्या प्रवासात या सगळ्या कलांना एकत्रित करील असा संमिश्र कलाप्रकार शोधण्याचा तो प्रयत्न करीत होता आणि त्याच्या हाती नाटकासारखं काही तरी लागलं. त्यात कथेचे कथन होते, संवाद होता, घटना होत्या, नृत्य, गायन होतं, जे त्याच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग तर होतेच; पण पुढे ते ईश्वराला प्रसन्न करून घेण्याचे उपासना माध्यमही झाले. याच प्रक्रियेतून उगम झाला तो लोककलांचा. लोककलांमध्ये सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा उन्मेष, त्याचं जगणं, त्याच्या प्रथा – परंपरा प्रतिबिंबित होतात. लोककलांच्या माध्यमातून ग्रामदेवतेची उपासना करून तो ईश्वराच्या सान्निध्याचा अनुभव करू लागला. मग वासुदेव, जागरण – गोंधळ, वाघ्या – मुरळी, भारूड, पोतराज, डिंडार यांसारख्या लोककलांच्या मिश्रणातून आजचे अभिजात नाटक उभे राहत गेले.
जे नाटक मानवी उत्क्रांतीच्या सोबतच विविध रूपात होते, ज्या नाटकाची कुळकथा लोककलांच्या उपासना नाट्यातून जन्मते आणि पुढे ती एक श्रेष्ठ संमिश्र कला म्हणून महत्त्वाचे मनोरंजन माध्यम ठरते, ते नाटक सिनेमाचा उदय झाल्यानंतर संपले काय? टीव्ही आल्यानंतर लयास गेले काय? मोबाइलमुळे अस्तित्वहीन झाले काय? किंवा आजच्या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे धोक्यात येईल काय? अर्थात या सर्व प्रश्नांचे उत्तर ठामपणे ‘नाही’ असेच आहे. पण एक मात्र खरे की, सिनेमा, टीव्ही, मोबाइल, ओटीटी प्लॅटफॉर्म यांसारख्या माध्यमांचा नाटकावर गुणात्मकतेच्या दृष्टीने परिणाम होत आहे. परिणामी ज्या मराठी रंगभूमीने अत्यंत वैभवशाली नाटकाचा काळ पाहिला, त्याच रंगभूमीला आता सुमार नाटकांना गोंजारत बसण्याची वेळ आली आहे. विनोदी नाटक आवश्यक आहेच, पण हास्य हाच एकमेव जीवनरस नाही. पण, कोणत्याही कलेचा जेव्हा व्यवसाय होतो, तेव्हा त्या कलेच्या सादरीकरणात दर्जा नव्हे, तर गल्ला महत्त्वाचा ठरतो. ही गल्लाभरू वृत्ती त्या कलेच्या मूळ उद्देशाला आणि तिच्या पावित्र्याला मागे रेटण्याचे काम करते. वर्तमानकाळातील नाटकाचे व्यावसायिकीकरण हे त्याचे उत्तम उदाहरण ठरू शकेल.
नाटक हे समाजप्रबोधनाचं, समाजपरिवर्तनाचं माध्यम आहे, असं मानणारा मोठा रंगवर्ग देशात आहे. नाटक हे समाजमनाचा आरसा असेल आणि समाजाचं प्रतिबिंब त्यात पडत असेल, तर अशा सामाजिक आशयाच्या नाटकांकडे समाजच का पाठ फिरवतो? महत्त्वाच्या जीवनवादी नाटकांकडे पाठ फिरवून अत्यंत सुमार नाटकांना प्रेक्षक गर्दी का करतात? हा आजच्या घडीचा मूळ प्रश्न आहे. प्रेक्षकांची ही कृतीदेखील समाजमनाचंच प्रतिबिंब म्हणायला हवी.
बहुसंख्य लोक आपली मान शहामृगाप्रमाणे वाळवंटात खुपसून सभोवतालच्या वादळापासून वाचण्याचा भाबडा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे शहामृगाला वादळ दिसत नाही हे खरे, पण ते तर येणारच आहे. त्यात शहामृग पालापाचोळ्याप्रमाणे उद्ध्वस्त होणार आहे. जेव्हा समाजच आपले प्रश्न पाहू इच्छित नाही, त्या जागी स्वस्त दर्जाचे सुमार मनोरंजन जवळ करतो आणि त्याला नाट्य क्षेत्रातील कथित जबाबदार मंडळी तितकेच दर्जाहीन मनोरंजन पुरवतात, तेव्हा ते नाटकाचाच नव्हे, समाजाचाही घात करीत असतात. अशा वेळी नाटक स्वत:चा उद्देश हरवून बसते. नाटक असो वा साहित्य; कोणत्याही स्थितीत, कोणत्याही कालखंडात समाजाला मार्गदर्शन करण्याची सांस्कृतिक जबाबदारी नैसर्गिकरीत्या या माध्यमांवरच आहे. पण, या माध्यमात प्रबोधनाऐवजी धन आणि मार्गदर्शनाऐवजी केवळ दर्शन उरते, तेव्हा भीती वाटायला लागते की, नाटकाला प्रेक्षकांच्या तुलनेत नाटकवाल्यांकडूनच जास्त धोका आहे की काय?
जोपर्यंत मराठी भाषा टिकेल, तोपर्यंत मराठी नाटक टिकेल. पण, हे खरे की मराठी रंगभूमीचा आधार नाटकाचा व्यवसाय करणारे नव्हे, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेली आणि रुजलेली हौशी रंगभूमी आहे. एकीकडे केवळ मनोरंजनाच्या हेतूने नाट्यव्यवसाय करणारी मंडळी, तर दुसरीकडे नावीन्याच्या ध्यासाने झपाटलेली हौशी रंगभूमी, एकीकडे सामाजिक बांधिलकी वगैरे झुगारून खोऱ्याने पैसा ओढणारी गल्लाभरू नाटके, तर दुसरीकडे स्वत:च्या कष्टाचा पैसा नाटकासाठी खर्च करून विशिष्ट भूमिकेने नाटक करणारी हौशी रंगभूमी असे स्पष्ट चित्र महाराष्ट्रात दिसते. त्यातही मायबाप सरकार व्यावसायिक नाटकांना लक्षावधी रुपयांचे अनुदान देते. स्पर्धेतही व्यावसायिक नाटकांची बक्षिसे हौशी नाट्य स्पर्धेच्या तुलनेत लाखो रुपयांनी जास्त असतात. नाटकाची गुणवत्ता न पडताळता त्यातील कथित सेलिब्रिटींना भुलल्याने ही तफावत आली असणार. पण, राज्य नाट्य स्पर्धेतील काही नाटके ही व्यावसायिक नाटकाच्या कितीतरी पुढची असतात, हे आता सिद्धच झाले आहे. जेव्हा जे पोषक आहे, ते त्याज्य ठरते आणि जे त्याज्य आहे, त्याचे उदात्तीकरण होते, तेव्हा त्या – त्या कलांच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहतो. हौशी, प्रयोगशील रंगभूमी जगली, तरच खरे नाटक जगेल, हे अंतिम सत्य आहे.
व्यावसायिक रंगभूमी असो वा हौशी रंगभूमी; मुळात गेल्या दशकापासूनचा विचार केला तर समाजात घडणाऱ्या, समाजमन हादरून टाकणाऱ्या अनेक घटनांकडे या दोन्ही रंगभूमीच्या प्रवाहांनी कानाडोळाच केल्याचंदिसतं. हिंसाचार, बलात्कार, अत्याचारांतून उमटणाऱ्या किंकाळ्या मराठी नाटकवाल्यांच्या कानावर आदळत नाहीत, मॉब लिंचिंगचा आक्रोश त्यांना ऐकू येत नाही, अलीकडे वाढत चाललेला जातीयवाद त्यांना जाणवत नाही, जात आणि धर्माच्या नावानं होणाऱ्या दंगली त्यांच्या गावी नाहीत, सहनशीलतेपलीकडे गेलेला राजकीय निबरपणाही त्यांना दिसत नाही. हा मतिमंदपणा कशातून पाझरलाय? संवेदना आणि जाणिवांच्या अभावातून की सर्वत्र पसरलेल्या अनामिक भीतीतून? जेव्हा समाज भ्यालेला असतो, तेव्हा नाटक नावाचा एल्गार पुकारून नाटकवाल्यांनी त्याला ऊर्जा द्यायला हवी. पण, जेव्हा समाजातील ज्वलंत प्रश्न नाटकवाल्यांनाच जाणवत नाहीत, तर त्यांच्यात ऊर्जा कोण भरणार?
आपण सगळेच तसे औपचारिकताजीवी माणसं असतो. त्यामुळं रंगभूमी दिनाची औपचारिकताही रांगोळ्या काढून, नटराजाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि टाळीबाज भाषणं ठोकून साजरी होईल. पण, नटराजाच्या प्रतिमेला वंदन करताना, नटराजाने पायाखाली दाबलेल्या आणि अपप्रवृत्तीचे प्रतीक असलेल्या असुराकडेही लक्ष जायला हवं.. त्याचे प्रकटीकरण रंगभूमीवर झाले, तर किती बरे होईल!
(संपर्क – salunkedrsatish@gmail.com)






