Saturday, August 22, 2026
Homeसातारासातारा : शाही दसरा सोहळा झाला नयनरम्य | पुढारी

सातारा : शाही दसरा सोहळा झाला नयनरम्य | पुढारी

सातारा : शाही दसरा सोहळा झाला नयनरम्य | पुढारी

[ad_1]

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  राजधानी सातार्‍यात मंगळवारी पार पडलेल्या शाही दसरा सोहळ्याने उपस्थित सार्‍यांच्याच डोळ्यांचे पारणे फेडले. विजयादशमीचा हा सीमोल्लंघन सोहळा उत्साहपूर्ण, मंगलमय वातावरणात व अलोट गर्दीत पार पडला. प्रारंभी जलमंदिर येथे इतिहासात पहिल्यांदाच भवानी तलवारीस पोलिस विभागाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर जलमंदिर, राजवाडा ते पोवई नाका, शिवतीर्थपर्यंत शाही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमधील हत्ती, घोडे, उंट, ढोलताशा पथक सातारकरांचे विशेष आकर्षण ठरले.

सुरुवातीला जलमंदिर येथे भवानी देवीच्या मंदिरामध्ये खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. यावेळी जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सातारावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सायं. 5 वा. शाही मिरवणुकीला प्रारंभ झाला. जलमंदिर येथून शाही मिरवणूक बाहेर पडताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या मिरवणुकीमध्ये गजीनृत्य सादर करण्यात आले. तसेच मिरवणुकीत सहभागी हत्ती, उंट, घोड्यांवर बाल मावळे स्वार झाले होते. ढोल -ताशा पथक, हलगी पथक, सनई चौघडे, तुतारी वाद्याच्या गजरात मिरवणूक मार्गस्थ झाली. यावेळी सजवलेल्या वाहनात पालखी ठेवण्यात आली होती. त्यामध्ये भवानी तलवार ठेवण्यात आली. जलमंदिर ते पोवई नाका अशी शाही मिरवणूक काढण्यात आली. शाही मिरवणुकीमध्येही आबालवृद्धांसह सातारकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शाही थाटातच दसरा सोहळ्याची मिरणवूक शिवतीर्थ येथे दाखल झाली.

शिवतीर्थ परिसर विद्युत रोषणाई नटला होता. पोवई नाका येथे शिवकालीन अफजलखान वधाचे पोवाडा गायन सुरू होते. पोवाडा ऐकण्यास सातारकरांनी गर्दी केली होती. मर्दानी खेळामध्ये लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, अग्निखेळ सादर करण्यात आले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय,  अंबामाता की जय, तुळजाभवानी माता की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून भवानी तलवारीला शासकिय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी भवानी तलवारीचे पूजन केले. आरती करण्यात आली. त्यांनतर पुन्हा जलमंदिराकडे मिरवणूक मार्गस्थ झाली. दरम्यान, शाही सीमोल्लंघनाचे लाईव्ह प्रक्षेपण विविध सोशल माध्यमांवर दाखवण्यात आले. मिरवणुकीदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला होता.

फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी…

शाही दसर्‍यानिमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये करण्यात आलेल्या फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी सातारकरांसाठी खास आकर्षण ठरली. विविध टप्प्यांवर फुटणार्‍या फटाक्यांच्या आकाशातील प्रकाशझोतामुळे डोळ्यांचे पारणे फिटले. चिमुकल्यांसह अबालवृद्धांनीही शाही मिरवणुकीसह फटाक्यांंची आतषबाजी ‘याची देही याची डोळा’ अनुभवली. अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात ही क्षणचित्रे कैद केली.

मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी

राजघराण्याचा दसरा उत्सव व पारंपरिक वाद्याचा गजर, शिंग, तुतारी, छत्र, चामरे, हत्ती घोड्यांसह निघालेली भवानी तलवारीची शाही मिरवणूक पाहण्यासाठी सातारकरांनी मिरवणूक मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी सातारकर मुख्य रस्त्यावर आले होते. राजवाडा, मोती चौक परिसर गर्दीने बहरून गेला होता. ही मिरवणूक पाहताना प्रत्येकाचा उर अभिमानाने भरून आला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments