Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रमाझ्या हिश्श्याचे किस्से: देवानंद; ऐंशी वर्षाच्या वयातही अगदी उत्साहात सलमानला करून दाखवत...

माझ्या हिश्श्याचे किस्से: देवानंद; ऐंशी वर्षाच्या वयातही अगदी उत्साहात सलमानला करून दाखवत होते नृत्याच्या स्टेप्स

माझ्या हिश्श्याचे किस्से: देवानंद; ऐंशी वर्षाच्या वयातही अगदी उत्साहात सलमानला करून दाखवत होते नृत्याच्या स्टेप्स

[ad_1]

रूमी जाफरी15 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

एका चित्रीकरणादरम्यान देव आनंद आणि सलमान खान.

एक दिवस मी सलमान खानसोबत त्याच्या घरी बोलत बसलो होतो, तेव्हा देव साहेबांचा फोन आला. ते म्हणाले, ‘सलमान, मी देवानंद बोलतोय आणि मला तुला भेटायचंय. सांग, कधी आणि कुठं येऊ?’ सलमान म्हणाला, ‘सर, तुम्ही नका येऊ, मीच येतो.. तुम्हीच सांगा मी केव्हा आणि कुठं येऊ..?’

माझ्या हिश्श्यातील किश्श्यांमध्ये या वेळी गोष्ट देवानंद साहेबांची. २६ सप्टेंबरला त्यांची जयंती आहे. पंजाबच्या शकरगड तालुक्यात (जि. गुरुदासपूर) २६ सप्टेंबर १९२३ ला त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव किशोरीलाल आनंद होते. मोठे भाऊ मनमोहन आनंद वकील होते आणि त्यांच्यानंतरचे भाऊ चेतन आनंद, तर विजय आनंद सर्वात छोटे भाऊ. शेखर कपूर हे देवानंद यांच्या बहिणीचे पुत्र. देवानंद यांनी लाहोरमध्ये बीएची पदवी घेतली आणि १९४० च्या सुमारास ते मुंबईत आले. ते नोकरी करत होते, पण त्यांच्या मनात एक कलाकार दडलेला होता. मोठे बंधू चेतन आनंद इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनचे (इप्टा) सदस्य होते.

‘अछूत कन्या’मधील अशोककुमार यांच्या अभिनयाने देव साहेब खूप प्रभावित झाले आणि त्यांच्यातही अभिनय करण्याची इच्छा निर्माण झाली. त्याच वेळी प्रभात फिल्म स्टुडिओच्या बाबूराव पै यांच्याशी त्यांची गाठ पडली. देव साहेबांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, पै साहेबांनी त्यांना ब्रेक दिला. देव साहेबांचे निखळ हास्य आणि बोलक्या डोळ्यांनी पै साहेबांच्या मनात घर केले. हा मुलगा अभिनेता होण्यासाठीच बनला आहे हे तेव्हाच त्यांच्या लक्षात आले होते. प्रभात फिल्मच्या चित्रपटाचे नाव “हम एक है’ होते आणि तो हिंदू – मुस्लिम एकतेवर आधारित होता. अभिनेता रेहमान आणि दिग्दर्शक पी. एल. संतोषी यांचाही हा पहिलाच चित्रपट होता. देव साहेबांच्या आयुष्यातील बहुतेक किस्से आपल्याला त्यांच्याविषयीच्या पुस्तकांतून, त्यांचे दिग्दर्शक आणि त्यांना ओळखणाऱ्यांकडूनच माहीत झालेले असतात. पण, मी तुम्हाला ते सांगणार आहे, जे मी स्वत: पाहिले आहे. देव साहेबांना मी चार वेळा भेटलो आहे. सर्वांत आधी फ्लाइटमध्ये. मी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या शूटिंगसाठी मॉरिशसला जाणार होतो, त्या वेळी देव साहेबही फ्लाइटमध्ये होते. ते त्यांच्या ‘मैं सोलह बरस की’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात होते. त्या वेळी माझ्या त्यांच्याशी खूप गप्पा झाल्या. पण, इथे मी जो किस्सा सांगणार आहे, तो बहुधा २००२ चा आहे.

एक दिवस मी सलमान खानसोबत त्याच्या घरी बोलत बसलो होतो तेव्हा देव साहेबांचा फोन आला. ते म्हणाले, ‘सलमान, मी देवानंद बोलतोय आणि मला तुला भेटायचंय. सांग, कधी आणि कुठं येऊ?’ सलमान म्हणाला, ‘सर, तुम्ही नका येऊ, मीच येतो.. तुम्हीच सांगा मी केव्हा आणि कुठं येऊ..?’ मग सलमान देव साहेबांना भेटायला गेला. दोन दिवसांनी सलमानला भेटलो तेव्हा देव साहेबांनी त्याला का बोलावलं होतं ते विचारलं. त्याने सांगितलं की, देव साहेब ‘लव्ह अॅट टाइम स्क्वेअर’ नावाचा चित्रपट बनवत आहेत आणि त्यात पाहुणा कलाकार म्हणून मी एक गाणं करावं, अशी त्यांची इच्छा आहे. मी सलमानला विचारले, ‘तू काय म्हणालास?’ यावर सलमानने सांगितलं, ‘मी त्यांना म्हणालो की, फक्त एका अटीवर हे गाणे करेन आणि ती म्हणजे मी या चित्रपटाचं मानधन घेणार नाही. मी हे काम विनामूल्य करेन’. हे ऐकून देव साहेब खूप भावुक झाले. कारण याच गाण्यासाठी दोन अभिनेत्यांनी त्यांना नकार दिला होता. देव साहेबांचा आदर करण्याची ही सलमानची स्वत:ची वेगळी पद्धत होती. काही महिन्यांनी एके रात्री मला सलमानचा फोन आला. तो म्हणाला, ‘रूमी भाई, तुम्हाला इतिहासाचा भाग बनायचंय का?’ मी म्हणालो, ‘हो, काय झालं?’ यावर सलमान म्हणाला, ‘इकडे या. मी तुम्हाला अशी गोष्ट दाखवतो, जी पुन्हा पाहायला मिळणार नाही.’ मी ‘कुठं येऊ?’ असं विचारलं. सलमान म्हणाला, ‘आर. के. स्टुडिओत या.’ मग मी आर. के. स्टुडिओत पोहोचलो, तर तिथे टाइम स्क्वेअरचा सेट लागला होता. गणेश आचार्य नृत्य दिग्दर्शक होते आणि सलमान तेच गाणं करत होता. मी पोहोचल्यावर सलमानने माझी देव साहेबांशी भेट घालून दिली. मी लक्षपूर्वक पाहत होतो की, गणेश आचार्य सलमानला ज्या नृत्याच्या स्टेप्स, हालचाली सांगत होते त्या देव साहेब स्वत:च करून दाखवत होते. गाण्याचा मूड समजावून सांगत होते. सारे एक्सप्रेशन्स करून दाखवत होते आणि तेही पूर्ण एनर्जीने, तितक्याच जोशात! मी बसल्या बसल्या विचार करत होतो.. ‘क्या बात है!’ वयाच्या ८० व्या वर्षीही त्यांच्यामध्ये इतका उत्साह टिकून आहे.

असो. तो शॉट झाला आणि त्यानंतर थोडा गॅप होता. लायटिंग बदललं आणि मला देव साहेबांजवळ बसून बोलायची संधी मिळाली. मी त्यांना विचारलं की, तुम्ही या वयात एवढी मेहनत करताय… तर ते म्हणाले, ‘हा माझा छंद आहे, माझा जोश, आवड आहे. माझ्या आयुष्याचा, माझ्या जगण्याचा उद्देशच चित्रपट बनवत राहावं हा आहे. मग त्यात फायदा होतो की तोटा याची फिकीर मी करीत नाही. काहींना संपत्तीचं व्यसन असतं, काहींना मदिरेचं, तर काहींना कामिनीचं व्यसन असतं. मला चित्रपट बनवण्याचं व्यसन आहे. मी जिवंत असेपर्यंत चित्रपट बनवत राहावे हीच माझी इच्छा आहे.’

देव साहेबांबद्दल बोलत असताना मला एक शेर आठवला…
इत्तेफ़ाक़ अपनी जगह, ख़ुश-क़िस्मती अपनी जगह,
ख़ुदा बनाता है जहां में आदमी अपनी जगह।

मला कधी विचारण्याची संधी मिळाली नाही, पण मी वाचले आहे की, ते काळा कोट आणि पांढऱ्या शर्टमध्ये इतके स्मार्ट दिसायचे की, काही मुलींनी त्यांच्या प्रेमात वेड्या होऊन आत्महत्या केली. त्यामुळे कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला आणि देवानंद यांनी सार्वजनिक ठिकाणी काळा कोट आणि पांढरा शर्ट घालून जाऊ नये असे सांगावे लागले. देव साहेबांची जवळपास सगळीच गाणी हिट आहेत. पण, आज माझ्या आवडीचे हे गाणे ऐका. चित्रपट आहे प्रेम पुजारी…
फूलों के रंग से, दिल की कलम से,
लिखी रोज़ पाती।

स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.

रूमी जाफरी
बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments