
समीर गायकवाड2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
‘द बॉक्स’मधील एक दृश्य.
व्हेनेझुएलातील विख्यात पटकथा लेखक आणि दिग्दर्शक लॉरेन्झो विगास यांचा Mubi प्लॅटफॉर्मवर आलेला ‘द बॉक्स’ (ला काजा) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. एक किशोरवयीन मुलगा मेक्सिको सिटीमधून उत्तर मेक्सिकोतील एका सामूहिक कबरीत दफन केल्या गेलेल्या आपल्या वडिलांचे उर्वरित अवशेष मिळवण्यासाठी प्रवास करतो. पण. नशिबाने तिथे भलतेच घडते. त्याच्या वडिलांसारखा दिसणारा माणूस त्याला भेटतो आणि काही काळ भांबावून गेल्यावर तो त्याच्यामागे जाण्याचा निर्णय घेतो… या सिनेमाची स्टोरी लाइन अशी काहीशी गोंधळात टाकणारी आणि त्याचवेळी अस्वस्थ करणारीही आहे.
सिनेमाची सुरूवात मेक्सिको सिटीतील हॅट्झिन (नवोदित अभिनेता – हॅट्झिन नॅवरेटे) या हटके स्वभावाच्या किशोरवयीन मुलापासून होते, जो आपल्या वडिलांचे – एस्टेबान एस्पिनोझा लेव्हा यांचे अवशेष गोळा करण्यासाठी बसने उत्तर मेक्सिकोला निघालेला असतो. हॅट्झिनने वडील हयात असताना त्यांच्यासोबत फारसा वेळ घालवलेला नसतो. मात्र, आपले वडील एक स्थलांतरित कामगार होते आणि त्यांचा मृत्यू एका औद्योगिक अपघातात झाला, हे त्याला ठाऊक असते. अगदी धीरोदात्तपणे तो आपल्या वाट्याला आलेलं दु:ख आणि वडिलांच्या अकाली जाण्याने झालेली हानी यांचा सामना करतो. सिनेमातील अनेक फ्रेम्समध्ये त्याच्या खोल उदास डोळ्यात तरळलेलं पाणी सहज दिसतं! सामुदायिक कबरीपाशी आल्यानंतर संबंधित महिला अधिकारी त्याची कागदपत्रे तपासते आणि अत्यंत अनौपचारिकपणे त्याच्या हाती एक पत्र्याचा बॉक्स देते. त्या बॉक्समध्ये त्याच्या वडिलांच्या वस्तू आहेत, असे त्याला सांगितले जाते. अत्यंत आत्मीयतेने हा बॉक्स घेऊन जड पावलांनी तो तेथून निघून येतो. दरम्यान आपल्या आजीला तो फोनवरती त्याविषयीची माहिती देतो. तिलाही ते एेकून समाधान वाटते. मात्र, नियतीला हे मान्य नसते. घराकडे परतत असताना अचानक त्याला फूटपाथवर एक माणूस दिसतो, जो हुबेहूब त्याच्या दिवंगत वडिलांसारखा दिसत असतो. त्याला पाहताच हॅट्झिन आधी भ्रमित होतो, त्याचा विश्वासच बसत नाही. मात्र, काही वेळातच भानावर येऊन तो बसमधून उतरतो. त्या माणसाच्या मागेमागे जातो. हॅट्झिन त्याच्याशी संवादही साधतो. मात्र, तो माणूस आपली वेगळीच ओळख सांगतो, तो स्वतःचे नाव मारिओ एन्डरले (हर्नान मेंडोझा) असे सांगतो. त्यानंतर हॅट्झिन सातत्याने त्याचा पिच्छा पुरवतो. तरीही तो माणूस, ‘मी तुझा बाप नाहीय!’ हेच त्याला सांगतो. हॅट्झिनचा मात्र काही केल्या त्यावर विश्वास बसत नाही. त्या माणसाने विरोध करूनही त्याचा आपल्या वडिलांशी काही संबंध आहे का, याची तो चाचपणी करत राहतो. त्याच्या जिद्दीपुढे अखेरीस नमते घेत मारिओ त्याला आपल्या पंखाखाली घेतो! मारिओप्रमाणेच हॅट्झिनही प्रतिकूल परिस्थितीत दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कपड्यांचे उत्पादन करणाऱ्या स्थानिक युनिट्समध्ये स्थलांतरित कामगारांचे ट्रक उतरवण्यात गुंततो. मारियो, त्याची गरोदर पत्नी आणि त्याच्या मुलासोबत तो मारिओच्याच घरात राहू लागतो. ‘चिनी लोकच आपले खरे शत्रू आहेत!’ असे तिथे काम करणाऱ्या लोकांना सातत्याने सांगितले जाते. वास्तवात हे वसाहतवादी भांडवलशाहीवरचे भाष्य आहे. ज्यांची तोंडओळख देखील नाही, अशा लोकांना भीती बसावी म्हणून या वल्गना केल्या जातात. काम जाण्याच्या भीतीने कामगार अधिक वेगाने कार्यरत राहावेत, यासाठीचा हा फंडा! आपण दारिद्र्यात ढकलले जाऊ नये, म्हणून मेक्सिकन आणि लॅटिन अमेरिकन लोकांमध्ये जाणीवपूर्वक स्पर्धा निर्माण केली जाते. तिथे काम करताना विचारी मनाच्या हॅट्झिनला यामागचं तथ्य उमगतं. कपड्याच्या कारखान्यांतील स्थलांतरित कामगारांचे शोषण आणि त्यांना घातली जाणारी भीती यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्याचा तो प्रयत्न करतो. तिथे गायब झालेल्या एका तरुण मुलीचा तो शोध घेतो. तिथलं शोषण जाणून घेतो. अधूनमधून तिथे उठणाऱ्या विद्रोही आवाजांची धीरगंभीर शांतता त्याला चकित करते. तो त्यांना मदत करू शकत नाही, मात्र आपल्या वडिलांच्या मृत्यूशी या घटना ताडून पाहतो. व्हेनेझुएलाने हा सिनेमा ‘ऑस्कर’साठी पाठवला होता. ‘द बॉक्स’ मेक्सिकोतील स्थलांतरित कामगारांच्या दुरवस्थेवर लक्ष वेधून घेतो. क्राइम थ्रिलर जॉनरमध्ये हा सिनेमा येतो. ‘वापरा आणि टाकून द्या’ या तत्त्वावर मानवी आयुष्ये पणाला लावली जातात, तेव्हा कोणती जीवनमूल्ये मागे उरतात, याचा शोध यात घेतला आहे. नवोदित हॅट्झिनने या थ्रिलर क्राइम ड्रामामध्ये बाजी मारली आहे. संपूर्ण सिनेमात साधे स्मितहास्यही न करता त्याने आपल्या अभिनयातून भूमिकेत जीव ओतला आहे. त्याच्या भूमिकेतील संयम आणि विचारातील लवचिकता मारिओच्या व्यक्तिरेखेला पूरक आहे, जो स्वतःचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी एका घाणेरड्या व्यवसायाचे नेतृत्व करत असतो. सतत उफाळून येणारी संशयास्पद मानसिकता नि त्याच वेळेस दिसणारे आशेचे किरण यात दोलायमान जीवन जगणाऱ्या जगभरातील स्थलांतरित कामगारांची दुर्दशा आणि हे कामगार हरवल्यानंतर त्यांच्या मुलांवर होणारा त्याचा दु:खद परिणाम ‘द बॉक्स’मध्ये दिसतो. जगभरातील स्थलांतरितांचा प्रश्न गंभीर बनलेला असताना हा सिनेमा रिलीज झालाय, हे विशेष!
संपर्क : 9766833283 sameerbapu@gmail.com






