
शेखर गायकवाड3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
प्रशासनात सर्वसाधारणपणे सोयीचे, वशिल्याचे काम झटपट, तर सर्वसामान्यांचे काम उशिराने होते. ‘काही माणसे समान असतात, तर काही जरा जास्त समान असतात,’ या जगप्रसिद्ध लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या वचनाचा प्रत्यय इथे पदोपदी येतो. आपल्या फायद्याच्या, निवडक अशा गोष्टींसाठीच स्वीकारल्या जाणाऱ्या अशा सोयिस्कर वेगामुळे काळ – काम – वेगाची शाळेत शिकलेली सगळी गणिते व्यवहारामध्ये मात्र उलटीसुलटी झाल्याचा अनुभव येऊ लागतो!
सर्वसाधारणपणे कामाच्या दिवशी कधी सायंकाळी पाच वाजता तर सोडाच, पण कार्यालयीन वेळेतही राज्याच्या दुर्गम भागातील शासकीय कार्यालयात कोणीही फोन उचलत नाही. परंतु, चुकून शासनाने पाच टक्के महागाई भत्ता वाढवण्याचे आदेश सायंकाळी साडेसहा वाजता मंत्रालयातून काढले, तर कार्यालयीन वेळेनंतर सुद्धा गडचिरोली, सिरोंचा, राधानगरी, मेळघाटातील धारणी अशा अतिशय दुर्गम भागातही त्याची प्रत वायुवेगानं पोहचते आणि रात्री नऊपर्यंत ट्रेझरीत बिलसुद्धा दाखल होते! पण, ‘दुष्काळी कामासाठी किंवा नैसर्गिक आपत्तीसाठी, मुख्यमंत्री मदत निधीत जमा करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार कपात करावा,’ असे आदेश शासनाने काढल्यास हे आदेश सहा महिन्यानंतरही अशा भागात पोहचत नाहीत! मूळ प्रत मिळाली नाही, शाईच्या सहीची प्रत मिळाली नाही, अशा सबबी सांगून अशी बिलं ट्रेझरीत टाकली जात नाहीत.
बऱ्याच वेळा साहेबांचं काम अर्ध्या तासात, तर सहकाऱ्यांचं काम आठ दिवसांत पण होत नाही. शासनात असलेल्या या सोयीच्या अतिवेगाचा किंवा गैरसोयींच्या वेगाचा मिनिटा-मिनिटाला प्रत्यय येतो. दौऱ्यावर जाताना ड्रायव्हर गाडी हळू चालवतो आणि मुख्यालयात परतताना जोरात! कडक साहेबाला भेटायला जाताना स्टाफचा स्पीड कमी आणि बाहेर पडल्यावर जास्त!! सोयीच्या ठिकाणी बदली झाल्यावर रुजू होण्याचा कालावधी कमी म्हणजे काही तासांचा आणि गैरसोयीच्या ठिकाणी बदली झाल्यावर जास्त म्हणजे पूर्ण सात दिवसांचा असतो! या ट्रांझिट पिरीयडमध्ये सारी वैयक्तिक आणि कौटुंबिक कामं निवांतपणे उरकून हा काळ सत्कारणी लावला जातो.
साखर कारखान्यांना अनुदान, सूत गिरणीसाठी अनुदान, शाळेसाठी जागा, आश्रमशाळेसाठी शासकीय जागा मिळवण्यासाठीचे प्रस्ताव अर्ज केल्यावर ज्या वेगाने तालुका पातळीवरुन राज्य पातळीवर पोहोचतात, त्याचा वेग एखाद्या पॉवरफुल्ल नेत्याच्या पदाशी सुसंगत असतो. त्याविरुध्द प्रकरण नाकारण्याचा वेग हा ‘सामान्य ’ नागरिक असण्याशी सुसंगत असतो. कधी कधी कामाच्या स्वरुपावरही वेग अवलंबून असतो. एखाद्या कर्मचाऱ्याने फार चांगले काम केले आणि साहेबांनी जर त्याला प्रशस्तिपत्र देण्यास सांगितले, तर कार्यालयीन अधीक्षक लगेच होय म्हणतो, परंतु, पाच-दहा वेळा साहेबांनी सांगितले, तरी प्रशस्तिपत्राचा ड्राफ्ट काही लिहून त्यांच्याकडे पाठवत नाही! कार्यालयातील कोणत्या कर्मचाऱ्याला चांगले म्हणायचे, या पेटंटवर जणू अधीक्षकाचा हक्क असतो. एखाद्या कंत्राटदाराकडून काम करुन घेताना स्पीड जास्त आणि त्याचे बिल मंजूर करताना स्पीड कमी होतो! दुसऱ्या कर्मचाऱ्याला कार्यमुक्त करताना स्पीड जास्त आणि हजर करुन घेताना तो कमी असतो! वशिल्याच्या व्यक्तीची नेमणूक होताना स्पीड जास्त, तर त्याला नोकरीतून काढतानाची प्रक्रिया अतिशय हळू असू शकते. ॲडव्हान्स मंजूर करताना स्पीड कमी आणि वसूल करताना जास्त असतो. विभागीय चौकशी सुरू करताना अतिशय संथ गतीने, तर ती बंद करताना घाईघाईने निर्णय होतो. स्पर्धा घेताना घाई, तर पारितोषिक वितरण कार्यक्रम उशिराने होतो. नवीन रस्ता तयार करताना कामाची घाई असते; परंतु भूसंपादन मोबदला शेतकऱ्यांना विलंबाने मिळतो. परीक्षा लवकर येते आणि निकाल उशिरा. शेताची मोजणी लवकर आणि हद्दी दाखवायला विलंब. विहीर लवकर खांदून होते आणि वीज कनेक्शन उशिरा! धरणातील उजव्या कॅनालमधून जास्त वेगाने पाणी वाहते की डाव्या कॅनालमधून, हे पाटबंधारे अभियंते हिशेब करुन सांगू शकत असले, तरी प्रत्यक्षात मात्र पॉवरफुल्ल पुढाऱ्याची जमीन धरणापासून किती अंतरावर आहे, त्यावर पाण्याचा वेग ठरू शकतो, हे अनुभवाने अनेकांना माहीत असते.
पोलिस विभागात गैरसोयीच्या ठिकाणी बदली झाल्यावर काही अधिकारी नव्या पदावर रुजूच होत नाहीत. त्याला ते ‘सिकमध्ये’ आहे, असे म्हणतात. त्याचा अर्थ ‘कागदोपत्री आजारी’ असा आहे. विशेष म्हणजे, आजारी असतानाच ते बदली रद्द करण्यासाठी हेलपाटे मारीत असतात. त्यावेळचा आजारी असतानाचा त्यांचा चपळपणा वाखाणण्यासारखा असतो! आजारी असताना असलेला अंगातील हा चपळपणा आणि बदली इच्छित ठिकाणी करताना केलेली धडपड, पळापळ ही भल्याभल्या पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल ऑफिसरच्या डिग्री व ज्ञानाला मोठे आव्हान वाटावे! विशेष म्हणजे, अशा चपळ अधिकाऱ्याचे ‘गुण’ हेरणारे वरिष्ठही त्याला जागोजागी भेटतात. एकूणच, प्रशासनात सर्वसाधारणपणे सोयीचे, वशिल्याचे काम झटपट, तर सर्वसामान्यांचे काम उशिराने होते. ‘काही माणसे समान असतात, तर काही जरा जास्त समान असतात,’ या जगप्रसिद्ध लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या वचनाचा प्रत्यय इथे पदोपदी येतो. आपल्या फायद्याच्या, निवडक अशा गोष्टींसाठीच स्वीकारल्या जाणाऱ्या अशा सोयिस्कर वेगामुळे काळ – काम – वेगाची शाळेत शिकलेली सगळी गणिते व्यवहारामध्ये मात्र उलटीसुलटी झाल्याचा अनुभव येऊ लागतो!
shekharsatbara@gmail.com





