कबीररंग: आतम ज्ञान बिना जग झूठा…

0
20
कबीररंग: आतम ज्ञान बिना जग झूठा…


हेमकिरण पत्की7 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

कबीरांच्या अमुक गीतातून हा दाखला दिला आहे किंवा त्यांच्या तमुक दोह्यातून तो दृष्टांत आला आहे, या विधानामागची अभ्यासकाची दृष्टी कोणती आहे, ते आपल्याला जाणवतं. खरं वाचन पुस्तकी जिज्ञासेतून होतं की, ते जीवनरसानं ओथंबलेल्या हृदयातून होतं, हा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कबीरांसारख्या फकीर वृत्तीच्या माणसाची स्थिती आपली कशी असेल! आपण कधी भौतिक वस्तूंच्या इच्छेनं तळमळत असतो, तर कधी मानसिक शांतता आणि समाधानाच्या प्राप्तीच्या इच्छेनं व्याकूळ होत असतो. आपलं मन कधीच इच्छेवेगळं नसतं. मग आपल्या मनाची तहानभूक ही कबीरांची तहानभूक कशी असेल? याचं तात्पर्य असं आहे की, आपले मूलभूत प्रश्न आपल्याला उमजायला हवेत. कबीरांनी जे प्रश्न त्यांच्या गीत-दोह्यांतून मांडले आहेत; ते त्यांच्या साधनेच्या भावस्थितीतून जन्माला आले आहेत. कबीरांचे प्रश्न, त्यांची भावस्थिती आणि अभिव्यक्ती ही सर्वथा त्यांचीच आहे. गीत-दोहे वाचताना ती आपल्यारीतीनं समजून घेणं, हे शुद्ध आकलन नाही आणि त्यांचा शब्दांपलीकडचा बोधही नाही.

स्वतःला समजून घ्यायचं असेल, तर कबीर आपल्याला सहायक होऊ शकतात, मार्गदर्शक होऊ शकतात. कबीरांचं हृद्गत आरशासारखं आहे. आपण त्यात आपलं स्वरूप पाहू शकतो. हाच तर आपल्या रंजल्या-गांजल्या मनासाठीचा अभ्यास आहे. आता कबीरांचं हे गीत पाहा… पानी बीच मीन पियासी, मोंही सुन सुन आवै हाँसी। घर में वस्तु नजर नहिं आवत, बन बन फिरत उदासी। आतम ज्ञान बिना जग झूठा, क्या मथुरा क्या कासी? आपल्या प्रापंचिक, व्यावसायिक अडचणी असलेले कितीएक श्रोते कबीरांना भेटत असावेत. त्यांच्या अडचणी त्यांच्याच परिभाषेत ऐकल्यावर कबीरांना आक्रित वाटत असावं. जलाशयातली मासोळी तहानलेली कशी? तिला तर तहान पाण्याची आणि तिच्या अवतीभवती पाणीच पाणी. मग शोष कसला, तहान कसली!

खरं ‘मी’पण न उमजलेला माणूस घराबाहेर पडतो. वनावनांत फिरतो. उदास होतो. हे ‘मी’पण त्याच्या आत असतं की बाहेर? मग हा बहिर्मुख होऊन केलेला शोध कशाचा? खऱ्या ‘मी’चा शोध घेत पद, प्रतिष्ठा, मानसन्मान, लौकिक यामागं माणूस आयुष्यभर वणवण करत फिरतो. या साऱ्या ‘मी’पणाच्या उपाधी तर असतात! त्या उपाधी जाणिवेत येत नाहीत. त्यांचे स्वच्छ आकलन होत नाही. मग मनाच्या मागं धावून धावून कुठला ठाव गाठणार! जलाशयातल्या मासोळीला आपली तहान उमजणं हाच तिच्यासाठी पाणीदार बोध असतो. मासोळीला पाण्यावेगळं अस्तित्व नाही. म्हणूनच तिच्यासाठी हा जलबोध महत्त्वाचा आहे. कबीरांनी आत्मज्ञानाचं महत्त्व विशद करण्यासाठी पाण्यात राहूनही तहानलेल्या मासोळीची प्रतिमा या गीतात योजली आहे. ती यथार्थ आहे. देहभावात रमलेला, मनोभावात हरवलेला आणि निरंतर आत्मभावाला पारखा असलेला मूढ माणूस या मासोळीसारखाच तर आहे! कबीरांनी वर्णिलेली मूढ माणसाची ही मन:स्थिती ज्यानं त्यानं स्वतः जाणून घेत घेत हृदयाच्या निवांतपणात अवश्य पाहावी अशीच आहे. पाहणाऱ्याला आत्मरूपाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.

कबीरांसारख्या संतांचे शब्द सूर्यासारखे दाहक आणि संजीवक असतात. ते अभावग्रस्त जाणिवेला जाळून टाकतात आणि भावग्राही बोध उजळवतात. तेरा साईं तुज्झ में ज्यो पुहूपन में बास। कस्तूरी का मिरग ज्यों फिर फिर ढूंढे घास।। आपल्या देहात नांदणारं चैतन्य फुलातल्या दरवळासारखं आहे. ते फुलाच्या आकारात असूनही मोकळं आहे. कस्तुरीमृगाच्या नाभीतच कस्तुरीगंध असतो आणि तरीही तो रानोमाळ धावत त्याचा शोध घेत राहतो. ही धाव त्या तहानेचा उगम न उमजलेल्या जलाशयातल्या मासोळीसारखीच तर आहे‌! तहान म्हणजे मनात निर्माण होणारी इच्छा. ती शमवायची, शमवत राहायची की, जाणत्याचा निर्देश उमजून घेऊन निवारायची, याचा विवेक आपल्याच हाती आहे, असा कबीरांचा अनुभव आहे. हे जीवनसूत्र देहात नांदणाऱ्या चैतन्याशी जोडलं, तर इच्छेला शाश्वताचा रंग येतो. मन बाहेरल्या वस्तुप्राप्तीत संतोष शोधत नाही. ते चैतन्याच्या ठायी स्थिर होतं. अर्थात ही स्थिती संतांच्या चित्ताची असते. आपलं मन सक्तीनं आत वळत नाही. शाब्दिक आकलनानं स्थिरावत नाही. कबीरांच्या गीतातल्या, दोह्यांतल्या भावदर्शनानं घटकाभर आपलं मन सुखावतं. पुन्हा प्रश्नांकित होतं, दुःखांकित होतं. कबीरांच्या वृत्तीच्या अभ्यासयोगाचं आपण निरंतर चिंतन करत राहू आणि आपल्याच भावस्थितीच्या केंद्राला आत्मभावानं पाहू तर कबीरांच्या हितोपदेशानं रसरसलेला एखादा दोहा आपली अनुभूती होईल.

हेमकिरण पत्की hemkiranpatki@gmail.com संपर्क : ९४०३७६८८९१



Source link