नागरिकांना सात दिवसांत राडारोडा हटविण्याचे आवाहन; कचरा टाकल्यास ५०० रुपये दंडाचा इशारा, मात्र रस्त्यांवरील खोदकाम, मुरमाचे ढीग आणि सुरक्षेच्या अभावाबाबत ठेकेदारांवरही कारवाई होणार का?
फलटण : प्रतिनिधी :- फलटण शहरात सार्वजनिक ठिकाणी बांधकामाचा राडारोडा टाकणाऱ्या नागरिक, बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार आणि विकासकांविरोधात नगरपरिषदेने कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक रस्ते, पदपथ, नाले, गटारे आणि मोकळ्या जागांवर टाकलेला बांधकामाचा राडारोडा सात दिवसांच्या आत स्वतःच्या खर्चाने हटवावा, अन्यथा नगरपरिषदेमार्फत तो हटवून संबंधितांकडून खर्च वसूल करण्यासह दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारण्याचाही निर्णय नगरपरिषदेने स्पष्ट केला आहे.
नगरपरिषदेच्या या भूमिकेचे स्वागत होत असतानाच शहरातील सुरू असलेल्या विकासकामांमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडेही गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कारण शहरात एकीकडे नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी राडारोडा आणि कचरा टाकू नये, अशा सूचना दिल्या जात आहेत; तर दुसरीकडे विविध विकासकामांसाठी करण्यात आलेल्या रस्त्यांच्या खोदकामानंतर निघालेला मुरूम, माती आणि बांधकामाचे साहित्य अनेक ठिकाणी रस्त्यांवरच पडून असल्याचे चित्र दिसत आहे.
नागरिकांना नियम, मग ठेकेदारांना वेगळे निकष का?
फलटण शहरात रस्ते, गटारी, पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन तसेच अन्य पायाभूत सुविधांची कामे विविध ठिकाणी सुरू आहेत. शहराच्या विकासासाठी ही कामे निश्चितच आवश्यक असून, विकासकामांबाबत नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. मात्र, विकासकामे करताना नियोजन, कामाचा वेग आणि नागरिकांची सुरक्षितता यांनाही तितकेच महत्त्व देणे गरजेचे आहे.
काही ठिकाणी रस्त्यांची खोदाई केल्यानंतर निघालेला मुरूम व माती रस्त्यावरच पसरलेली किंवा ढिगाऱ्यांच्या स्वरूपात ठेवलेली दिसते. काही ठिकाणी खोदकाम सुरू असल्याबाबत सूचना फलक, सुरक्षिततेसाठी बॅरिकेड्स किंवा वाहनधारकांना पर्यायी मार्गदर्शन करणारी व्यवस्था पुरेशा प्रमाणात दिसून येत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच काही कामे संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अपघाताची शक्यता; दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
रस्त्यांवर पडलेला मुरूम, मातीचे ढीग, उघडे खड्डे आणि अपूर्ण खोदकाम यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अशी परिस्थिती धोकादायक ठरू शकते. रात्रीच्या वेळी खोदकामाचा अंदाज न आल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांनाही या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होणे योग्य नाही. काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक सूचना फलक लावणे, बॅरिकेड्स उभारणे, रात्रीच्या वेळी प्रकाश किंवा परावर्तित सुरक्षा चिन्हांची व्यवस्था करणे आणि खोदकामानंतर रस्ता तातडीने सुरक्षित करणे ही संबंधित यंत्रणा व ठेकेदारांची जबाबदारी आहे.
नगरपरिषदेने ठेकेदारांनाही सक्त सूचना द्याव्यात!
नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना राडारोडा हटविण्याबाबत सात दिवसांची मुदत दिली आहे. त्याच धर्तीवर नगरपरिषदेच्या विकासकामांची जबाबदारी असलेल्या ठेकेदारांनाही स्पष्ट आणि सक्त सूचना देण्याची गरज आहे. कामातून निघालेला मुरूम, माती आणि बांधकामाचे अवशेष रस्त्यांवर अनिश्चित काळासाठी ठेवण्यास परवानगी नसावी. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित परिसर स्वच्छ करून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याची जबाबदारी निश्चित करावी.
नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन कामांचा दर्जा, गती, सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि ठेकेदारांकडून पाळल्या जाणाऱ्या नियमांची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारांना नोटीस देऊन आवश्यक ती दंडात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नगराध्यक्षांनी स्वतः लक्ष घालण्याची नागरिकांची अपेक्षा
फलटण शहराच्या विकासासाठी नगरपरिषदेकडून सुरू असलेल्या कामांना नागरिकांचा विरोध नाही. उलट शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विकासकामे वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, अशीच सर्वांची अपेक्षा आहे. मात्र, विकासकामे करताना ठेकेदारांची बेफिकिरी आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे होणारे दुर्लक्ष खपवून घेतले जाऊ नये.
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी या प्रश्नात स्वतः लक्ष घालून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. केवळ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून स्वच्छता आणि शिस्त राखण्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही; तर नगरपरिषदेच्या अखत्यारीतील विकासकामांमध्येही तितकीच शिस्त आणि जबाबदारी दिसली पाहिजे.
शेवटी प्रश्न एकच…
शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची आहे, हे निश्चित; परंतु विकासकामे सुरक्षित, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांचीही आहे. नियम सर्वांसाठी समान असावेत. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकू नये, तसेच ठेकेदारांनीही खोदकामाचा राडारोडा आणि मुरूम रस्त्यांवर टाकून नागरिकांची गैरसोय करू नये.
फलटणला विकास हवा आहे; मात्र तो नागरिकांच्या सुरक्षिततेची किंमत मोजून नको! स्वच्छ शहरासोबत सुरक्षित रस्ते आणि जबाबदार विकासकामे हीच फलटणकरांची अपेक्षा आहे.
