नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन कांबळे-पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; संविधानिक मूल्ये आचरणात आणण्याचे आवाहन
फलटण / प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचा जागर करत फलटण शहरात संविधान रॅली व संविधान जनजागृती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित या उपक्रमातून संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि लोकशाहीतील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी यांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. रॅली आणि जागराच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा जयघोष करण्यात आला.
या कार्यक्रमात फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा भक्कम आधारस्तंभ असल्याचे सांगितले. संविधानाने समाजातील प्रत्येक घटकाला समान अधिकार आणि प्रगतीची संधी दिली आहे. त्यामुळे संविधानाचा केवळ गौरव करण्यापेक्षा त्यातील तत्त्वे दैनंदिन जीवनात आचरणात आणणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाने संविधानाचा सन्मान राखून लोकशाही मूल्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार सचिन कांबळे-पाटील यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव केला. बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशाला दिलेली देणगी अमूल्य असून, त्यांनी संपूर्ण देशाला जणू अमृतच दिले आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. संविधानामुळे सामान्य माणसाला सन्मानाने जगण्याचा, शिक्षण घेण्याचा, स्वतःचे अधिकार बजावण्याचा आणि जीवनात प्रगती करण्याचा मार्ग उपलब्ध झाला. त्यामुळे या संविधानाचे संरक्षण आणि त्यातील मूल्यांची जपणूक करणे ही प्रत्येक भारतीयाची सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी संविधानामुळे देशात निर्माण झालेली लोकशाही व्यवस्था, प्रशासनाची जबाबदारी आणि नागरिकांचे अधिकार याविषयी मार्गदर्शन केले. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी आपल्या अधिकारांसोबत कर्तव्यांचीही जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
फलटण उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत संविधानाचे महत्त्व सोप्या शब्दांत विशद केले. संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार मिळाला असून शिक्षण, स्वातंत्र्य आणि न्यायाच्या माध्यमातून प्रगतीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच संविधानाचा अभ्यास करावा, त्यातील मूल्ये समजून घ्यावीत आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक श्री. बल्लाळ साहेब, फलटण तालुक्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुबनवळ, फलटण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले, नगरसेवक सचिन आहिवळे, राहुल भैया निंबाळकर, नगरसेविका स्मिताताई लोंढे, मोहिनी हेंद्रे, अर्पणाताई आहिवळे, मीनाताई काकडे, जितेंद्र आप्पा सरगर, संजय गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधानिक मूल्यांच्या जपणुकीचा संकल्प!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या या संविधान जागराने सामाजिक समता, बंधुता आणि लोकशाहीच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून प्रत्येक भारतीयाच्या हक्कांचे, स्वातंत्र्याचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण करणारी देशाची मूलभूत चौकट आहे. संविधानाची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचावी, नव्या पिढीमध्ये संविधानिक विचारांची रुजवण व्हावी आणि नागरिकांनी संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबत कर्तव्यांचेही पालन करावे, हा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत संविधानिक मूल्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार या कार्यक्रमातून व्यक्त झाला.
