न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाच्या पुढाकाराने बुद्धवंदना, सूत्रपठण आणि वैचारिक मंथनास प्रारंभ
विडणी (समतानगर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या ‘दर रविवारी चला बुद्धविहारी’ या विचाराला कृतीची जोड देत मौजे समतानगर (विडणी) येथील न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाने नियमित बुद्धवंदना आणि धम्मविचारांच्या मंथनाचा उपक्रम सुरू केला आहे.
समतानगर येथील पंचशील बुद्धविहारात बुद्धमूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तसेच बौद्ध उपासक-उपासिकांनी हा उपक्रम नियमितपणे राबविण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार आज रविवारी बुद्धविहारात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात बुद्धपूजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बौद्ध उपासक, उपासिका, बालक-बालिका आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिक बुद्धवंदना व सूत्रपठणानंतर भगवान बुद्धांच्या विचारांसह महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचे मंथन करण्यात आले.
या वेळी भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेचे माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे यांनी बुद्धवंदना व सूत्रपठणाचे संचलन केले.
बुद्धमूर्तीचे दान करणारे सुरवडी गावचे सुपुत्र तथा समाजभूषण आयु. तुषार मोहिते सर यांनी बुद्धमूर्ती प्रतिष्ठापनेच्या वेळी बुद्धविहारात नियमित कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाने ‘दर रविवारी चला बुद्धविहारी’ हा उपक्रम प्रत्यक्षात सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, पुढील रविवारपासून बुद्धविहारात बौद्ध धम्मातील विविध ग्रंथांचे क्रमशः वाचन सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून धम्माचे आकलन, वैचारिक जागृती, सामूहिक अध्ययन आणि नव्या पिढीमध्ये बुद्धविचारांची रुजवणूक करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.
बुद्धविहार हे केवळ धार्मिक उपासनेचे केंद्र न राहता ते ज्ञान, प्रबोधन, समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाचे केंद्र बनावे, या भावनेतून सुरू झालेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. ‘दर रविवारी चला बुद्धविहारी’ या संकल्पनेतून समतानगरमध्ये नियमित धम्मसंस्कार आणि वैचारिक चळवळीची नवी सुरुवात होत आहे.
