Saturday, October 31, 2026
Homeमहाराष्ट्रजनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर; प्रभाग क्रमांक १० चा हक्काचा आवाज बनल्या मनिषाताई...

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर; प्रभाग क्रमांक १० चा हक्काचा आवाज बनल्या मनिषाताई तिकोटे!

नगरविकासाच्या कामांसोबत मतदार नोंदणी, एस.टी. पास शिबिर, मोफत नेत्रतपासणी अशा विविध उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपली; वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा

अकलूज | साहस Times अकलूज नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मधील कार्यतत्पर नगरसेविका मनिषाताई मोहन तिकोटे यांनी नगरसेविका म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून प्रभागाच्या विकासासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याला विशेष प्राधान्य दिले आहे. नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी तत्पर राहणाऱ्या आणि सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या मनिषाताई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजवरच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.

मतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळावा, या उद्देशाने मनिषाताईंनी नवीन मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते. त्याचबरोबर मतदार यादीतील नावांमध्ये आवश्यक बदल व दुरुस्ती करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली. या शिबिराचा प्रभाग क्रमांक १० मधील तसेच इतर भागांतील अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. नागरिकांनी या उपक्रमाबद्दल मनिषाताईंचे आभार मानत त्यांच्या पुढाकाराचे कौतुक केले.

एस.टी. पास शिबिरातून नागरिकांना दिलासा

विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना एस.टी. प्रवासासाठी पास मिळविताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी एस.टी. पाससंबंधित शिबिर आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला. या माध्यमातून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.

मोफत नेत्रतपासणीचा आरोग्यदायी उपक्रम

नागरिकांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असल्याची जाणीव ठेवून त्यांनी मोफत नेत्रतपासणी कार्यक्रमाचे आयोजन केले. आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना अशा उपक्रमांचा लाभ मिळावा, हा यामागील सामाजिक दृष्टिकोन होता.

प्रत्येक समाजघटकाच्या मदतीला धावणारे नेतृत्व

प्रभागातील कोणत्याही समाजातील नागरिकांचा प्रश्न असो, सामाजिक कार्यक्रम असो किंवा गरजू व्यक्तीला मदतीची आवश्यकता असो, मनिषाताई मदतीचा हात पुढे करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची भूमिका त्यांच्या कार्यातून दिसून येते.

नगरविकासाची जबाबदारी सांभाळताना प्रभागातील विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि सामाजिक उपक्रम यांचा समतोल राखण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून केवळ पदापुरते मर्यादित न राहता नागरिकांशी थेट संपर्क ठेवून त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, ही त्यांच्या कार्यपद्धतीची जमेची बाजू आहे.

पदापेक्षा जनतेचा विश्वास महत्त्वाचा!

वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून एखाद्या व्यक्तीच्या कार्याचा आढावा घेण्याचीही संधी असते. मनिषाताई मोहन तिकोटे यांनी आजवर राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांतून जनतेशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभागातील नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणाऱ्या मनिषाताईंच्या पुढील वाटचालीसाठी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जनसेवेचा हा प्रवास असाच अखंड सुरू राहो, हीच सदिच्छा!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments