Wednesday, October 21, 2026
Homeफलटणधम्मचक्र प्रवर्तन दिनाचा आनंद घराघरांतून आणि मनामनांतून फुलवा” : बाबासाहेब जगताप

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा आनंद घराघरांतून आणि मनामनांतून फुलवा” : बाबासाहेब जगताप

समता नगर (विडणी) येथे बुद्धवंदना, धम्मविचार आणि आतिषबाजीने मंगल दिनाचा उत्साहपूर्ण जागर

फलटण (विडणी) : धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोका विजयादशमी हा केवळ उत्सवाचा दिवस नसून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि आत्मसन्मानाच्या विचारांचे स्मरण करून ते आपल्या आचरणात आणण्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस तथा बौद्धाचार्य आयु. बाबासाहेब जगताप यांनी केले.
समता नगर (विडणी) येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोका विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन भारतीय सामाजिक इतिहासात नवा अध्याय निर्माण केला, याचे महत्त्व विशद केले.
“आज आपण ज्या सन्मानाने आणि अभिमानाने समाजामध्ये वावरतो, विविध क्षेत्रांत पदांवर जातो, शिक्षण घेतो आणि आपले हक्क व अधिकार बजावतो, त्यामागे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान योगदान आहे. त्यांनी आपल्याला केवळ धम्माची ओळख दिली नाही, तर माणूस म्हणून जगण्याचा आत्मसन्मान दिला,” असे आयु. जगताप यांनी सांगितले.
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध समाजासाठी अत्यंत मंगल आणि ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगत त्यांनी हा दिवस घराघरांतून साजरा करण्याचे आवाहन केले. या निमित्ताने सकाळपासून विविध घरांमध्ये बुद्धवंदना, बुद्धपूजा आणि महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. विहारांमध्येही धम्मविधी व बुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे समता नगर परिसरात सकाळपासूनच मंगलमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा, शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन उपासक-उपासिकांनी आपल्या घरी आणि कुटुंबामध्ये कशा पद्धतीने साजरा करावा, याबाबत मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, हा दिवस केवळ औपचारिक कार्यक्रम म्हणून न साजरा करता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मविचारांचे स्मरण, आत्मपरीक्षण आणि आचरणाचा दिवस म्हणून साजरा केला पाहिजे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन बुद्धवंदना करावी, त्रिशरण-पंचशीलाचे पठण करावे, तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करावे. तसेच धम्मग्रंथांचे वाचन करून मुलांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची आणि महामानवांच्या विचारांची ओळख करून द्यावी.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा खरा आनंद धम्माचे आचरण करण्यामध्ये आहे. त्यामुळे या दिवशी मैत्री, करुणा, समता, प्रज्ञा आणि बंधुभाव वाढविण्याचा संकल्प करावा. आपल्या घरातील आनंद नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांसोबत वाटावा. घरामध्ये गोड पदार्थ तयार करून परस्परांना द्यावेत, गरजू व्यक्तींना मदत करावी आणि धम्मविचारांचा प्रसार करावा. “धम्मवंदना आपल्या दैनंदिन आचरणात उतरली आणि घरातील उत्सव समाजातील मैत्रीत रूपांतरित झाला, तरच या मंगल दिवसाचे खरे सार्थक होईल,” असे आयु. घोरपडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी दोन्हीही मोरे परिवाराच्या वतीने उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मंगल दिनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी फटाक्यांची आतिषबाजी करून उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपासिका अश्विनी मोरे व आयु. बाबासाहेब जगताप यांनी भीमगीत गायले आणि वातावरण निर्मिती केली. बुद्धवंदना, धम्मविचार, परस्परांना शुभेच्छा आणि आनंदाची देवाणघेवाण यामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुक्याचे प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे, न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाचे पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, बौद्ध उपासक-उपासिका तसेच बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments