Monday, October 19, 2026
Homeफलटणफलटणमध्ये महावितरणच्या मनमानीला चाप! नगरपरिषदेच्या परवानगीशिवाय कामे केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा...

फलटणमध्ये महावितरणच्या मनमानीला चाप! नगरपरिषदेच्या परवानगीशिवाय कामे केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा नगराध्यक्षांचा इशारा

शहरातील विद्युत कामांसाठी नगरपरिषदेची NOC बंधनकारक करण्याची मागणी; विकासकामांशी समन्वय राखण्यावर भर

फलटण | प्रतिनिधी फलटण शहरातील वीज वितरण व्यवस्थेच्या कामांवरून आता नगरपरिषद आणि महावितरण यांच्यातील समन्वयाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नवीन वीजवाहिन्या टाकणे, विद्युत खांब उभारणे अथवा स्थलांतरित करणे आणि ट्रान्सफॉर्मर बसविणे यांसारखी कामे करताना नगरपरिषदेच्या परवानगीची प्रक्रिया पाळली जात नसल्याचा आक्षेप नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतला आहे. यापुढे नगरपरिषदेची परवानगी न घेता किंवा अनधिकृतपणे कामे केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.

फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या उपस्थितीत १५ ऑक्टोबर २०२६ रोजी नगरपरिषद कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत शहरातील विविध नागरी समस्यांसह महावितरणच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर महावितरणच्या फलटण विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून विद्युत कामांच्या नियोजनाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

विकासकामांना अडथळा होऊ नये, ही नगरपरिषदेची भूमिका

शहरातील वाढती लोकसंख्या, व्यापारी पेठांचा विस्तार आणि भविष्यातील औद्योगिक गरजा लक्षात घेता विद्युत पायाभूत सुविधांचे नियोजन आवश्यक आहे. मात्र, रस्ते, सार्वजनिक सुविधा आणि इतर नागरी विकासकामांचा विचार न करता विद्युत खांब उभारणे, नवीन वाहिन्या टाकणे किंवा खांबांचे स्थलांतर करणे यामुळे नियोजित विकासकामांमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे महावितरणने आपल्या कामांचे नियोजन करताना नगरपरिषदेशी समन्वय साधावा, संबंधित कामांसाठी आवश्यक परवानग्या घ्याव्यात आणि शहराच्या विकास आराखड्याशी सुसंगत पद्धतीने कामे करावीत, अशी भूमिका नगरपरिषदेने मांडली आहे.

फेब्रुवारीतील पत्राकडे दुर्लक्ष झाल्याचा आक्षेप

नगरपरिषदेने यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही या संदर्भात पत्रव्यवहार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही विनापरवाना विद्युत कामे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महावितरणने नियुक्त केलेले काही ठेकेदार आपल्या सोयीनुसार कामे करीत असल्याने नागरी विकासाच्या नियोजनावर परिणाम होत असल्याचे नगरपरिषदेचे म्हणणे आहे.

शहरातील विद्युत कामे ही नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि सार्वजनिक सुविधांशी संबंधित असल्याने त्यामध्ये नियोजन, परवानगी आणि प्रशासकीय समन्वयाला महत्त्व देणे आवश्यक असल्याचेही नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.

अनधिकृत कामे केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

नगरपरिषदेच्या हद्दीत यापुढे आवश्यक परवानगीशिवाय किंवा अनधिकृतपणे विद्युत कामे करण्यात आल्यास संबंधित महावितरण अधिकारी आणि ठेकेदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्याचा इशारा नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.

महावितरणने नगरपरिषदेच्या सूचनांची दखल घेऊन प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करावी आणि भविष्यातील सर्व कामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेशी समन्वय राखावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

आता महावितरण या इशाऱ्याची कितपत दखल घेते आणि शहरातील विद्युत कामांच्या नियोजनात कोणते बदल होतात, याकडे फलटणकरांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments