Tuesday, October 6, 2026
Homeफलटणफलटणमध्ये आजपासून शिवाजी विद्यापीठाचा ४६ वा मध्यवर्ती युवा महोत्सव

फलटणमध्ये आजपासून शिवाजी विद्यापीठाचा ४६ वा मध्यवर्ती युवा महोत्सव

४२ कलाप्रकारांच्या स्पर्धांतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळणार व्यासपीठ; ९ ऑक्टोबरला समारोप

फलटण, प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आयोजन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे ६ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. कला, साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य आणि सर्जनशीलतेचा सुरेख संगम घडवून आणणाऱ्या या महोत्सवासाठी फलटण नगरी सज्ज झाली आहे.

महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता मुख्य व्यासपीठावर शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू प्रा. डॉ. श्रीमती जे. पी. जाधव यांच्या हस्ते होणार आहे. फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

उद्घाटन सोहळ्यास संस्थेचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. आर. व्ही. गुरव, प्रा. डॉ. बी. एस. सातपुते, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. एस. जी. घाणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

४२ कलाप्रकारांत रंगणार स्पर्धा

चार दिवस चालणाऱ्या या युवा महोत्सवात तब्बल ४२ कलाप्रकारांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. लोकसंगीत वाद्यवृंद, भारतीय समूहगीत, लोककला, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सुगम गायन, शास्त्रीय गायन, नाट्यसंगीत, एकपात्री अभिनय, मूकनाट्य, नकला, पथनाट्य, वक्तृत्व, वादविवाद, प्रश्नमंजुषा, लघुपट, छायाचित्रण, रांगोळी, मेहंदी, मातीकाम, कातरकाम, व्यंगचित्र, स्थळचित्रण तसेच सर्जनशील रचनाकृती अशा विविध कलाप्रकारांमध्ये विद्यार्थी आपली कला व कौशल्य सादर करणार आहेत.

शोभायात्रेने होणार महोत्सवाला सुरुवात

मंगळवारी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत सहभागी विद्यार्थ्यांची नोंदणी होणार आहे. त्यानंतर संघ व्यवस्थापकांची बैठक घेऊन विविध स्पर्धांमधील सादरीकरणाचा क्रम निश्चित केला जाणार आहे.

दुपारी २ वाजता मुधोजी महाविद्यालयाच्या मैदानापासून मुख्य व्यासपीठापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर उद्घाटन सोहळा पार पडेल. लोकसंगीत वाद्यवृंदाच्या सादरीकरणाने महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे.

दोन दिवस विविध ठिकाणी स्पर्धांचा जल्लोष

बुधवार, ७ ऑक्टोबर आणि गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयाच्या मुख्य व्यासपीठासह प्राचार्य शिवाजीराव भोसले सभागृह आणि विविध कक्षांमध्ये एकाचवेळी विविध स्पर्धा पार पडणार आहेत. त्यामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसरात कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत पाहायला मिळणार आहे.

शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी प्रश्नमंजुषा स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. आर. के. कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप व पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर राहणार आहेत.

कलागुणांसोबत व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना

युवा महोत्सव हा केवळ स्पर्धांचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या कलात्मक अभिव्यक्तीला, नेतृत्वगुणांना, संघभावनेला आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी एकत्र आल्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण, सर्जनशीलता आणि निकोप स्पर्धेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एल. सी. वेळेकर, प्रा. डॉ. ए. एन. शिंदे, प्रा. डॉ. टी. पी. शिंदे, श्री. आर. वाय. गायकवाड, कु. ए. एस. आडके यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments