अधिकृत कामकाजात हस्तक्षेप झाल्यास माहिती देण्याच्या सूचना; उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
फलटण | प्रतिनिधी : फलटण नगरपरिषदेच्या कामकाजात महिला नगरसेविकांच्या पती, नातेवाईक अथवा इतर व्यक्तींकडून होणाऱ्या अनधिकृत हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण कार्यालयीन आदेश जारी केला आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा संदर्भ देत जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार, महिला नगरसेविकांच्या अधिकृत कामकाजात त्यांच्या पती, नातेवाईक किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने हस्तक्षेप करू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश नगरपरिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
महिला नगरसेविकांच्या प्रभागातील विकासकामे तसेच नगरपरिषदेच्या कार्यालयीन कामकाजासंदर्भातील पाठपुरावा संबंधित महिला सदस्यांनी स्वतः नगरपरिषद कार्यालयात उपस्थित राहून करावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांच्या वतीने पती किंवा नातेवाईकांनी प्रत्यक्ष हस्तक्षेप करू नये, असेही नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, अशा व्यक्तींकडून अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास त्यास बळी न पडता त्याची माहिती तातडीने मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या स्वाक्षरीने हा कार्यालयीन आदेश जारी करण्यात आला असून, नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांना त्याची प्रत देण्यात आली आहे.
महिला लोकप्रतिनिधींना त्यांच्या अधिकारानुसार स्वतंत्रपणे अधिकृत कामकाज करता यावे आणि नगरपरिषदेच्या प्रशासकीय प्रक्रियेत अनधिकृत हस्तक्षेप होऊ नये, या दृष्टीने हा आदेश महत्त्वाचा मानला जात आहे. आदेशामुळे फलटणच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.
