Wednesday, September 9, 2026
Homeमहाराष्ट्रबारामतीत महिला शिक्षिकेचा राहत्या घरी दुर्दैवी मृत्यू; विविध बाजूंनी पोलिसांचा तपास सुरू

बारामतीत महिला शिक्षिकेचा राहत्या घरी दुर्दैवी मृत्यू; विविध बाजूंनी पोलिसांचा तपास सुरू

बारामती : शहरात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असतानाच, बारामती शहरातील बानप शाळा क्रमांक ५ येथे कार्यरत असलेल्या एका महिला शिक्षिकेचा श्रीरामनगर, भिगवण रोड परिसरातील राहत्या घरी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रासह संपूर्ण बारामती शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित शिक्षिका मानसिक तणावाखाली असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी पोलिसांकडून विविध बाजूंनी सखोल तपास करण्यात येत आहे.

घटनास्थळी पोलिसांना एक हस्तलिखित चिठ्ठी आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या चिठ्ठीत मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये तसेच मुलांची काळजी घेण्यासंदर्भात उल्लेख असल्याचे समजते. मात्र, चिठ्ठीतील इतर वैयक्तिक मजकूर सार्वजनिक करणे उचित नसल्याने तो जाहीर करण्यात आलेला नाही.

दरम्यान, या चिठ्ठीमुळे तपासाला काही धागेदोरे मिळण्याची शक्यता असली तरी, केवळ चिठ्ठीच्या आधारे मृत्यूचे कारण निश्चित करता येणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. कामाचा ताण, वैयक्तिक कारणे किंवा अन्य कोणते घटक या घटनेमागे आहेत का, याचाही तपास पोलीस करीत आहेत.

घटनेची माहिती मिळताच बारामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या दुर्दैवी मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर मानसिक तणाव किंवा कामाच्या दबावातून जाणाऱ्या व्यक्तींनी एकट्याने संघर्ष न करता कुटुंबीय, मित्र, सहकारी अथवा विश्वासू व्यक्तींशी संवाद साधावा आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

बारामती पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments