कालकथित जाईबाई सर्जेराव निकाळजे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांची भावपूर्ण आदरांजली
गिरवी : उपक्रमशील व प्रयोगशील शिक्षक तथा उत्कृष्ट खेळाडू आयु. पांडुरंग सर्जेराव निकाळजे यांच्या मातोश्री कालकथित जाईबाई सर्जेराव निकाळजे यांचा प्रथम स्मृतिदिन गिरवी येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी बौद्ध धम्मातील अनित्यवाद, अनात्मवाद व दुःख या त्रिसूत्रीवर मार्गदर्शन केले. बौद्ध धम्मातील वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करताना त्यांनी कालकथित जाईबाई सर्जेराव निकाळजे यांच्या जीवनकार्याचा आणि कुटुंबाच्या जडणघडणीत त्यांनी दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. आई म्हणून त्यांनी केलेले संस्कार, त्याग आणि कुटुंबासाठी घेतलेले कष्ट यांना उजाळा देत त्यांच्या विचार व कार्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली.
भारतीय बौद्ध महासभा या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मातृसंस्थेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या स्मृतिदिनाच्या संस्कार विधीचे संचलन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष, बौद्धाचार्य तथा समाजप्रबोधनकार आयु. महावीर भालेराव यांनी केले. यावेळी त्यांनी आईच्या प्रेमावर आधारित हृदयस्पर्शी कविता सादर करून उपस्थितांना भावूक केले. तसेच बौद्ध धम्मातील संस्कार विधीचा मराठी अर्थ समजावून सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
माण तालुक्यातील माणभूषण शाहीर, माणदेश कला मंचचे कवी व गायक शाहीर महावीर नामदेव शिंदे यांनी बुद्ध-भीम गीतांच्या माध्यमातून प्रबोधन केले. जाईबाई निकाळजे यांनी आपल्या कुटुंबाच्या जडणघडणीत दिलेले योगदान, त्यांचे संस्कार व कार्य गीतांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडत त्यांनी आदरांजली अर्पण केली.
या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी पुष्प अर्पण करून कालकथित जाईबाई सर्जेराव निकाळजे यांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
आदरांजली वाहणारे मान्यवर : जिल्हा परिषद सदस्य सह्याद्री कदम, गावच्या सरपंच वैशाली कदम, भूपेश कदम, जगदीश कदम, छ. शिवाजी हायस्कूल गिरवीचे प्राचार्य चंद्रकांत सुतार, सामाजिक कार्यकर्ते मोहनराव डांगे, विजयासिंह कदम (पैलवान), संजय मदने, प्रशांत अहिवळे, प्रगत शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी सोमीनाथ घोरपडे, सोनबा भोसले, महेश कदम, बाजीराव निकाळजे, सर्कल योगेश धेंडे, ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड, केंद्रप्रमुख बबन निकाळजे, नितीन निकाळजे, गोरख कदम, वसंतराव रणदिवे, दादा रणदिवे, रायाजी भोसले, ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य यांनी पुष्प अर्पण करून कालकथित जाईबाई सर्जेराव निकाळजे यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
