“समतेच्या लढ्यात समता सैनिक दलाचे योगदान ऐतिहासिक” — आयु. दादासाहेब भोसले
समता नगर (विडणी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या सामाजिक समता व मानवी हक्कांच्या चळवळीत समता सैनिक दलाचे योगदान ऐतिहासिक आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याचे संघटक, समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर तथा पुणे व सातारा जिल्हा प्रभारी आयु. दादासाहेब भोसले यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी पदाधिकारी यांच्या वतीने समता नगर (विडणी) येथे आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील चौथ्या पुष्पात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, शैक्षणिक व धम्मकार्याचा आढावा घेताना त्यांनी ब्रिटिश राजवटीतील गुलामगिरीसोबतच भारतीय समाजातील जातीय विषमता व अस्पृश्यतेच्या सामाजिक गुलामगिरीवर भाष्य केले. सयाजीराव गायकवाड व राजर्षी शाहू महाराज यांनी बाबासाहेबांच्या शिक्षण व सामाजिक कार्याला दिलेल्या योगदानाचा तसेच माणगाव परिषदेत शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या नेतृत्वाबाबत व्यक्त केलेल्या दूरदृष्टीचा त्यांनी उल्लेख केला.
महाडचा २० मार्च १९२७ चा चवदार तळे सत्याग्रह हा मानवी प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि समानतेच्या अधिकारासाठीचा ऐतिहासिक संघर्ष होता, सलग 5 वर्षे काळाराम मंदिर सत्याग्रह केला. असे सांगून महाड सत्याग्रहापासून बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणापर्यंत समता सैनिक दलाने बजावलेल्या संरक्षण, शिस्त व संघटनात्मक भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच महार रेजिमेंटचा शौर्य, पराक्रम आणि देशसेवेचा दैदिप्यमान इतिहास त्यांनी अधोरेखित केला.
भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून ममतासागर महाउपासिका मीराताई आंबेडकर तसेच समता सैनिक दलाचे प्रमुख व भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धम्मप्रचार व प्रसाराच्या कार्याची माहिती देताना त्यांनी BSI Mission 25 अंतर्गत धम्मशिक्षण, धम्मप्रशिक्षण, बौद्धाचार्य व धम्मप्रचारक घडविणे, संघटन विस्तार आणि समाजातील विविध घटकांपर्यंत बुद्ध-धम्माचा संदेश पोहोचविणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला.
समता सैनिक दलाच्या शताब्दी वर्षानिमित्त २० मार्च 2027 रोजी महाड येथे प्रत्येक जिल्हा व तालुक्यातून हजारो समता सैनिक सहभागी व्हावेत, यासाठी गावागावांत व तालुकास्तरावर प्रशिक्षण शिबिरे घेऊन संघटन मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप यांनी आजच्या सामाजिक परिस्थितीत धम्माचे आचरण आणि मुलांवर धम्मसंस्कार करण्याची गरज स्पष्ट केली. विविध समकालीन घटना व प्रसंगांचा संदर्भ देत पालकांनी मुलांना बुद्ध-धम्माचे विचार, विवेक, नैतिकता आणि समतेची शिकवण द्यावी, असे आवाहन केले. “आचरणो परमो धम्मो” या विचारानुसार धम्म जीवनात उतरविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याचे माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयुष्यमान रामचंद्र मोरे यांनी केले. यावेळी समतानगर येथील अनया अतुल मोरे व
आयुनी प्रतीक्षा शिवाजी झोडगे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थित बौद्ध उपासक-उपासिकांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयुष्यमान सोमीनाथ घोरपडे, शाखा फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप, माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु रामचंद्र मोरे, माजी संघटक तथा प्रमुख मार्गदर्शक आयु. राजेंद्रकुमार गायकवाड यांच्यासह समता नगर (विडणी) येथील न्यू पंचशील तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, बौद्ध उपासक-उपासिका, बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
