Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रबारामतीत १४ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला; मृत्यूचे गूढ कायम, पोलिसांकडून तपास सुरू

बारामतीत १४ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला; मृत्यूचे गूढ कायम, पोलिसांकडून तपास सुरू

बारामती : शहरातील रुई परिसरातील साईनगर येथे १४ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अवनी अजित दशावतारे असे या मुलीचे नाव असून ती इयत्ता नववीत शिक्षण घेत होती. ती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांची मुलगी असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री किरकोळ कारणावरून मुलीचे आईसोबत वाद झाले होते. त्यानंतर ती घरातून बाहेर पडली. बराच वेळ होऊनही ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. तसेच ती बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.

दरम्यान, रविवारी सकाळी साईनगर परिसरात मुलीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

प्राथमिक परिस्थितीवरून आत्महत्येची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी मुलीने आत्महत्या केली की तिच्या मृत्यूमागे अन्य कोणते कारण आहे, याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. हत्या असल्याचेही सध्या स्पष्ट झालेले नाही.

मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून या प्रकरणाच्या सर्व बाजू तपासल्या जात असून, मुलगी घराबाहेर पडल्यानंतर नेमके काय घडले, याचाही तपास केला जात आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार रोहित पवार हे बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. अल्पवयीन मुलीच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबीयांसह साईनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments