Tuesday, August 25, 2026
Homeफलटणवीर धरण शंभर टक्के भरले; नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ऊस लागवडीला...

वीर धरण शंभर टक्के भरले; नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ऊस लागवडीला मिळणार बळ

वीर धरण शंभर टक्के भरले; नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ऊस लागवडीला मिळणार बळ

फलटण | प्रतिनिधी

संपूर्ण जून महिना पावसाच्या प्रतीक्षेत गेलेल्या नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरण १०० टक्के भरले असून धरणात सुमारे ९.४०८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त होत असून ऊसासह इतर पिकांच्या लागवडीला मोठा आधार मिळणार आहे.

धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नवीन ऊस लागवडीसाठी तसेच आंबवणीसाठी आवश्यक पाणी सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ऊस पिकाची वाढ चांगली होण्यास मदत होईल. सिंचनाची खात्री निर्माण झाल्याने आगामी हंगामात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.

सध्या वीर धरणात २२४ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून सांडव्यावरून कोणताही विसर्ग केला जात नाही. मात्र नीरा डावा व नीरा उजवा कालवा या दोन्ही कालव्यांमधून सिंचनासाठी पाणी सोडले जात असल्याने नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी नीरा नदीपात्रात सुमारे ६ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. मात्र धरणातील परिस्थिती स्थिर झाल्यानंतर गुरुवार सकाळपासून नदीपात्रातील हा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

दरम्यान, नीरा खोऱ्यातील चार प्रमुख धरणांमध्ये मिळून २९.५७२ टीएमसी (६१.१८ टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ३४.२८२ टीएमसी (७०.९३ टक्के) इतका होता.

भाटघर धरणात ४५९ मिमी पावसाची नोंद झाली असून तेथे ११.३६३ टीएमसी (४८.३५ टक्के) पाणीसाठा आहे. नीरा देवघर धरणात ६.६४३ टीएमसी (५६.५४ टक्के) तर गुंजवणी धरणात २.१५८ टीएमसी (५८.४८ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास नीरा खोऱ्यातील इतर धरणांतील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असून याचा थेट फायदा शेती, सिंचन आणि पिण्याच्या पाणीपुरवठ्याला होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments